सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
आज होता ट्रेकचा तिसरा दिवस... लवकरच उठलो आणि पोहे आणि चहा असा नाश्ता बनवला. खाउन सगळे आटोपले आणि राजगडाकड़े कूच करायला तयार झालो. गावाबाहेर पडलो तशी सगळीकड़े भात शेती दिसत होती. बांधा-बांधावरुन वाट काढत आम्ही नदीच्या दिशेने सरकत होतो. एके ठिकाणी झाडावर ५०-६० सुगरणीचे खोपे दिसले. अगदी हाताला लागतील इतके खाली. आख्खे झाड़ खोप्यांनी लगडलेले होते. ते बघत-बघत पुढे सरकतोय तोच माझा डावा पाय एका बांधावरुन सरकला आणि मी डाव्या बाजूवर जोरात पडलो. लागले काहीच नाही पण आख्खी डावी बाजू चिखलाने माखून निघाली. ह्या ट्रेकला आम्ही कोण किती सरकते - कोण किती पड़ते ते मोजायचे ठरवले होते त्यामुळे मी आता लीडिंग रन स्कोरर होतो. काही वेळातच आम्ही नदीकिनारी येउन पोचलो. नदीला कमरेच्या थोड़े खालपर्यंत पाणी होते. काही मिनिट्स मध्ये आम्ही नदीच्या त्यापार होतो. आता आम्ही विंझर गावामध्ये पोचलो होतो. गावत दुकाने आहेत. कोणाला काही सामान घ्यायचे असल्यास हे ठिकाण उत्तम आहे. तिथून डांबरी रस्त्यावरुन राजगडाच्या पायथ्याला असलेल्या गुंजवणे गावाकड़े निघालो.
९ वाजत आले होते. गुंजवणे गावापासून राजगड चढायला सुरवात केली. लक्ष्य होते पद्मावती माचीवर निघणारा चोर दरवाजा. डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची, त्यात असलेले नैसर्गिक नेढ आणि झुंझार बुरुज, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसत होते. आम्ही राजगडला पहिल्यांदाच येत होतो त्यामुळे ते दृश्य पाहून मी पुरता भारावलो होतो. आता आम्ही गावापासून चढायला सुरवात केली. काही वेळामध्ये एके ठिकाणी दम घेण्यासाठी बसलो. तितक्यात कुठूनसा एक कुत्रा आला आणि आमच्याभोवती घोटाळायला लागला. जसे आम्ही पुढे निघालो तसा तो पण आमच्यासोबत निघाला. काही वेळामध्ये पहिला चढ चढून गेलो की काहीवेळ सपाटी लागते. ह्या सपाटीवरुन समोरचा पूर्ण चढ आणि वरपर्यंतची वाट दिसते. आता इथून चढ सुरु झाला की वळणा-वळणाची खड्या चढणीची वाट आहे. कुठेही सपाटी नाही. एक लक्ष्यात घ्यायला हवे की हा राजगडचा राजमार्ग नसून चोरवाट आहे त्यामुळे वेळ कमी लागत असेल तरी पुरता दम काढते. अगदी सावकाश गेलो तरी तास- दिड तासामध्ये आपण कड्याखाली असतो. इकडून वाट आता गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकड़े कड्यावरुन वर चढते. ह्याठिकाणी एक छोटेसे पाण्याचे टाक आहे. येथपासून ६० फुट वरती तटबंदीमध्ये चोरदरवाजा बांधला आहे. वर जाईपर्यंत सर्व कोरीव पायऱ्या आहेत. हा टप्पा तसा सोपा आहे त्यामुळे कसलेल्या ट्रेकरला काहीच प्रश्न यायला नको. नवशिके आणि इतर लोकांना चढायला सोपे पडावे म्हणुन उजव्या हाताला रेलिंग बांढलेली आहे. ५ मिं. मध्ये हा टप्पा पार करून ३-४ फुट उंचीच्या आणि तितक्याच रुंद अश्या छोट्याश्या दिंडीमधून गडामध्ये प्रवेश करते झालो.
आत गेल्या-गेल्या वाट ९० अंशात डावीकड़े वळते आणि लगेच १०-१५ पायऱ्या चढून वर जाते. आपण वर येतो ते थेट पद्मावती तलावासमोर. तलावाच्या डाव्याबाजूला काही पडके बांधकाम आहे. आधी ही बहूदा राहती घरे असावीत. अजून थोड़े वर चढून गेलो की हल्लीच बांधलेले विश्रामगृह लागते. ह्यामध्ये ३० जण सहज राहू शकतात. आम्ही मात्र पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये राहणार होतो. ह्या देवळामध्ये सुद्धा ५० एकजण सहज राहू शकतात. आम्ही वर पोहचेपर्यंत १२ वाजत आले होते. बॅग्स देवळामध्ये ठेवल्या आणि देवीचे दर्शन घेतले.
आता आज आणि उद्यापण निवांतपणा होता. राजगडाच्या तिनही माच्या आणि बालेकिल्ला आरामात बघून मगच आम्ही गड सोडणार होतो. आज फ़क्त पद्मावती माचीचा विस्तार बघायचा होता. त्याआधी मात्र आम्ही देवळाबाहेर चुल मांडली, २ दिवस पुरतील इतकी सुकी लाकडे गोळा केली आणि दुपारचे जेवण बनवायला घेतले. देवळाच्या बाजूला पाण्याची २ टाकं आहेत. त्यामधले पाणी पिण्यायोग्य आहे.
राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी. खुद्द मासाहेब जिजामाता, शिवाजीराजे आणि त्यांचे कुटुंब यांचे गडावर कायम वास्तव्य. त्यामुळे लश्करीदृष्टया तो अभेद्य असावा अश्या पद्धतीने त्याची बांधणी केली गेली आहे. गडाच्या तिन्ही माच्या स्वतंत्रपणे लढवता येतील अशी तटबंदी प्रत्येक २ माच्यांच्या मध्ये आहे. प्रत्येक माचीला स्वतंत्र मुख्य दरवाजा आहे. पद्मावती माचीला 'पाली दरवाजा', जो राजगडचा राजमार्ग देखील आहे. संजीवनी माचीला 'अळू दरवाजा' तर सुवेळा माचीला गुंजवणे दरवाजा, जो सध्या बंद स्थितिमध्ये आहे. शिवाय प्रत्येक माचीला स्वतंत्र चोर दरवाजे आहेत. पद्मावती माचीच्या चोर दरवाजामधून तर आम्ही गडावर चढून आलो होतो. संजीवनी माची आणि सुवेळा माचीकड़े आम्ही उदया जाणार होतो. आम्ही आता पद्मावती माची बघायला निघालो.
पद्मावती माचीचा विस्तार हा इतर दोन्ही माच्यांच्या मानाने कमी लांबीचा पण जास्त रुंद आहे. माची ३ छोट्या टप्यात उतरत असली तरी गडावरील जास्तीतजास्त सपाटी ह्याच माचीवर आहे. सर्वात खालच्या टप्यामध्ये पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा आहे. मधल्या टप्यामध्ये विश्रामगृह, शंकर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. शिवाय देवळासमोर एक तोफ आणि एक समाधी आहे (ही समाधी राजांची थोरली पत्नी 'महाराणी सईबाई' यांची आहे असे म्हटले जाते. ५ सप्टेंबर १६५९ रोजी त्यांचा राजगडावर किंवा पायथ्याला मृत्यू झाला होता.) देवळासमोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक स्तंभ आहे. विश्रामगृहापासून डावीकडे म्हणजेच माचीच्या पूर्व भागात गेल्यास अधिक सपाटी आहे. टोकाला तटबंदी असून एक भक्कम बुरुज आहे. येथून पूर्वेला सुवेळामाचीचे तर पश्चिमेला गुंजवणे गावापासून येणाऱ्या वाटेचे सुंदर दर्शन होते. माचीवर सर्वात वरच्या टप्प्यामध्ये राजसदन, राजदरबार, सदर, दारूकोठार, पाण्याचा तलाव अशी बांधकामे आहेत. ज्याठिकाणी आता सदर आहे त्याखाली काही वर्षांपूर्वी एक गुप्त खोली सापडली. आधी ते पाण्याचे टाके असावे असे वाटले होते पण तो खलबतखाना निघाला. ७-८ अति महत्वाच्या व्यक्ति आत बसून खलबत करू शकतील इतका तो मोठा आहे. त्या मागे असलेल्या राजसदनामध्ये राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.
(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये... त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटी सारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणुन तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे.
इतका वेळ इतिहासावर गप्पा मारत आम्ही तिघेजण राजसदनाच्या मागे तटबंदीवर बसलो होतो. सूर्यास्त होत आला होता. आम्ही परत फिरून देवळाकड़े निघालो. जेवणाची तयारी करत-करत परत गप्पा मारू लागलो. पायथ्यापासून आमच्या सोबत आलेला कुत्रा अजून सुद्धा आमच्या सोबत होता. एव्हाना अभिने त्याला 'वाघ्या' असे नाव सुद्धा ठेवले होते. आम्ही जेवण झाल्यावर त्याला सुद्धा थोड़े खायला दिले. रात्री देवळामध्ये झोपायच्या ऐवजी देवळाबाहेर झोपायचे आम्ही ठरवले. आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही राजगडावरील निरव रात्र अनुभवणार होतो. दिवसभराच्या भटकंतीनंतर शांत झोप लागली. आता उदया सकाळी लवकर उठून राजगडावरील सूर्योदय पहायचा होता...
दिवस ४ -
आज चौथ्या दिवशी आम्हाला निघायची काही घाई नव्हती. आज दिवसभर राजगड बघायचा होता. पण राजगडावरील सूर्योदय पहायचा होता म्हणुन लवकरच उठलो आणि सदरेवर गेलो. खरंतर बालेकिल्ल्याच्या दरवाजामध्ये जायचे होते पण उशीर झाला. सूर्योदय बघून परत आलो आणि मग सकाळच्या आवरा-आवरीला लागलो. नाश्ता बनवला आणि तयार होउन ८ वाजता बालेकिल्ला बघायला निघालो.
राजसदनावरुन पुढे गेलो की वाट जराशी वर चढते. इथे उजव्या हाताला ढालकाठीचे निशाण आहे. अजून पुढे गेलो की २ वाट लागतात. उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याच्या कड्याखालून उजव्याबाजूने संजीवनी माचीकड़े निघते. तर डावीकडची वाट बालेकिल्ला आणि पुढे जाउन सुवेळा माचीकड़े जाते. सकाळी गुंजवणे दरवाजा, बालेकिल्ला आणि सुवेळा माची बघायचा प्लान असल्याने आम्ही डाव्याबाजूने निघालो. जसे बालेकिल्ल्याच्या कड्याखाली आलो तशी लगेच पद्मावती माची आणि सुवेळा माची यांच्यामध्ये असलेली आडवी तटबंदी लागली. येथील प्रवेशद्वार मात्र पडले आहे. उजव्या हाताला एक झाड़ आहे त्या पासून वर ७०-८० फूट प्रस्तरारोहण करत गेले की एक गुहा आहे. आम्ही मात्र तिकडे काही चढलो नाही.
प्रवेशद्वारावरुन पुढे गेलो की परत २ वाटा लागतात. उजवीकडची वाट वर चढत बालेकिल्ल्याकड़े जाते. तर डावीकडची वाट गुंजवणे दरवाज्यावरुन पुढे सुवेळा माचीकड़े जाते. आम्ही आमचा मोर्चा आधी गुंजवणे दरवाज्याकड़े वळवला. येथील बरेच बांधकाम पडले आहे तर काही ढासळत्या अवस्थेत आहे. त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. पायऱ्या उतरुन खाली गेलो की दरवाजा आहे. दरवाजावरच्या बुरुजावर जाण्यासाठी डाव्या बाजूने वाट आहे. पण शक्यतो जाऊ नये कारण बांधकाम ढासळत्या अवस्थेत आहे. आम्ही दरवाज्यामधून पुढे गेलो. ह्या वाटेने कोणीच खाली उतरत नाही किंवा चढून येत नाही कारण पुढची वाट मोडली आहे. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही वाट वापरत होती हे आप्पा उर्फ़ गो.नी. दांडेकरांच्या 'दुर्ग भ्रमणगाथा' ह्या पुस्तकातून कळते. जमेल तितके पुढे जाउन आम्ही परत आलो. पायऱ्या चढून मागे आलो आणि बालेकिल्ल्याकड़े निघालो.
इकडे आल्यावर कळले की राजगडचा बालेकिल्ला का अभेद्य आहे ते. आधी पूर्ण उभ्या चढाच्या आणि मग उजवीकड़े वळून वर महादरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या अप्रतिमरित्या खोद्ल्या आहेत. त्या चढायला सोप्या नाहीत. हाताला आधार म्हणुन काही ठिकाणी लोखंडी शिगा रोवल्या आहेत. अखेर पायऱ्या चढून दरवाज्यापाशी पोचलो. उजव्या-डाव्या बाजूला २ भक्कम बुरुज आहेत. राजगडचा बालेकिल्ला हा अखंड प्रस्तर असून पूर्व बाजुस योग्य ठिकाणी उतार शोधून मार्ग बनवला गेला आहे. काय म्हणावे ह्या दुर्गबांधणीला... निव्वळ अप्रतिम ... !!! महादरवाजासमोर देवीचे मंदिर असून हल्लीच त्या मंदिराचे नुतनीकरण झाले आहे. असे म्हणतात की महादरवाजाच्या डाव्या बाजुच्या कोनाडयामध्ये अफझलखानाचे डोके पुरले गेले आहे. आता पुढे वाट उजवीकड़े वर जात बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोचते. इकडे उजव्या हाताने गेलो तर ब्रम्हर्षीचे मंदिर आहे. त्याशेजारी अतिशय स्वच्छ अशी पाण्याची २-३ टाकं आहेत. राजगडाचे मुळ नाव 'मुरुमदेवाचा डोंगर'. खरंतर ब्रम्हदेव ... बरुमदेव (गावठी भाषेत) ... आणि मग मुरुमदेव असे नाव अपभ्रंशित होत गेले असावे. राजगड हे नाव ठेवल शिवाजीराजांनी. बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षीचे मंदिर आणि त्याची पत्नी पद्मावती हिचे खाली माचीवर मंदिर हे संयुक्तिक वाटते.
आम्ही आता उजव्या हाताने बालेकिल्ल्याला फेरी मारायला सुरवात केली. ब्रम्हर्षीच्या मंदिरासमोर कड्याला लागून जमीनीखाली एक खोली आहे. टाक आहे की गुहा ते काही आम्हाला कळले नाही. खालच्या त्या प्रवेशद्वारापासून प्रस्तरारोहण करून वर चढून आलो तर थेट इकडे येता येते बहुदा... तिकडून दक्षिणेकड़े पुढे गेलो की उतार लागतो आणि मग शेवटी आहे बुरुज. त्यावरुन पद्मावती माचीचे सुंदर दृश्य दिसते. ह्या बुरुजाच्या डाव्या कोपऱ्यातून बाहेर पड़ायला एक चोर दरवाजा आहे. ती वाट बहुदा खालपर्यंत जाते पण तितकी स्पष्ट नसल्याने आम्ही फार पुढे सरकलो नाही. आता आम्ही डावीकड़े सरकलो आणि बालेकिल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोचलो. आता समोर दूरवर पसरली होती संजीवनी माची आणि त्या मागे दिसत होता प्रचंड 'जेसाजी कंक जलाशय'.
ह्या बुरुजापासून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर यायला पुन्हा थोड़े वर चढावे लागते. ह्या मार्गावर आपल्याला दारूकोठार आणि अजून काही पाण्याची टाकं लागतात. एकडून वर चढून आलो की वाड्याचे बांधकाम आहे. हा गडाचा सर्वोच्च बिंदू. ह्याठिकाणी सुद्धा राहते वाड्यांचे जोते असून उजव्या कोपऱ्यामध्ये भिंती असलेले बांधकाम शिल्लक आहे. उत्तरेकडच्या भागात तटबंदीच्या काही कमानी शिल्लक असून तेथून सुवेळा माची आणि डूब्याचे सुंदर दृश्य दिसते. एव्हाना १० वाजत आले होते. आल्या वाटेने आम्ही बालेकिल्ला उतरलो आणि सुवेळा माचीकड़े निघालो. इकडे मध्ये एक मारुतीची मूर्ति आहे. आता आपण पोचतो सुवेळा माचीच्या सपाटीवर.
ह्याठिकाणी सुद्धा काही वाड्यांचे जोते असून ही स्वराज्याच्या लष्करी अधिकार्यांची घरे होती. तर प्रशासकीय अधिकार्यांची घरे पद्मावती माचीवर होती. पुढे निघालो तशी वाट निमुळती होत गेली आणि मग समोर जी टेकडी उभी असते तिला 'डूबा' म्हणतात. इकडे उजव्या बाजूला खाली 'काळकाईचा बुरुज' आहे. आम्ही त्या बाजुस न जाता पुढे निघालो. डूब्याला वळसा घालून झुंझार बुरुजापाशी पोचलो.
अप्रतिम बांधणीचा हा बुरुज सुवेळा माचीला २ भागांमध्ये विभागतो. बुरुजाच्या उजव्या बाजूने माचीच्या दुसऱ्या टप्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे. म्हणजेच माचीचा टोकाचा भाग पडला तरी हा दरवाजा बंद करून झुंझार बुरुजावरुन शत्रुशी परत २ हात करता येतील अशी दुर्गरचना येथे केली आहे. थोड पुढे उजव्या हाताला तटबंदीमध्ये एक गणेशमूर्ति आहे. ह्या जागी आधी 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ होता असे म्हणतात. गडाच्या ह्या किल्लेदाराने मुघल फौजेवर असा काही मारा केला होता की मुघल फौजेची दाणादण उडालेली बघून खुद्द औरंगजेब हतबल झाला होता. त्या लढाईमध्ये एक तोफगोळा वर्मी लागुन संताजींचे निधन झाले. ज्या प्रस्तरावर झुंझार बुरुज बांधला आहे त्यास 'हत्ती प्रस्तर' असे म्हटले जाते कारण समोरून पाहिल्यास त्याचा आकार हत्ती सारखा दिसतो. ह्याच ठिकाणी आहे राजगडावरील नैसर्गिक नेढ़ (आरपार दगडामध्ये पडलेले भोक) उर्फ़ 'वाघाचा डोळा'. आम्ही तिकडे चढणार त्याआधी आमच्या सोबत असलेला वाघ्या तिकडे जाउन पोचला सुद्धा. ह्याठिकाणी कड्याच्या बाजूला मधाची पोळी आहेत त्यामुळे जास्त आरडा-ओरडा करू नये. काही वेळ एकडे थांबून आम्ही माचीच्या टोकाला गेलो. माचीचा हा भाग दुहेरी तटबंदी आणि शेवटी चिलखती बुरुज असलेला आहे. भक्कम तटबंदीच्या बुरुजावरुन सभोवताली पाहिले. उजव्या हाताला दुरवर 'बाजी पासलकर जलाशय' दिसतो.
आता आम्ही परत फिरलो आणि आमचा मोर्चा काळकाई बुरुजाकड़े वळवला. ह्याठिकाणी उतरताना काही पाण्याची टाक आणि त्या शेजारी मुर्त्या लागतात. अगदी टोकाला बुरुज आहे आणि तिकडून खालचे गर्द रान दिसते. उजव्या बाजूला जरा मान वळवून पाहिले तर संजीवनी माचीची लांबी लक्ष्यात येते. आता आम्ही उजवीकडे सरकत संजीवनी माचीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण मातीचा आणि गवताचा घसारा इतका होता की प्रयत्न सोडून आम्ही पुन्हा आल्या मार्गी मंदिरामध्ये पोचलो. बघतो तर मंदिरामध्ये बरीच गर्दी होती. कळले की साताऱ्यावरुन 'श्री शिवप्रतिष्टान' चे ३०-४० कार्यकर्ते 'राजगड - तोरणा - रायगड' असा ट्रेक करण्यासाठी जमली होती. त्यांच्याशी जरा गप्पा मारल्या. 'भेटूच पुढचे ३ दिवस' असे बोलून आमच्या तयारीला लागलो. जेवण बनवले, खाउन सगळे आवरून घेतले आणि 'संजीवनी माची' बघायला निघालो.
राजसदनावरुन पुढे जाउन उजव्या बाजूच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघलो. आता सुवेळा माची आणि संजीवनी माचीमधली तटबंदी लागली. त्यातले प्रवेशद्वार पार करून पुढे निघालो. आता वाट एकदम दाट झाडीमधून जाते आणि बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस निघते. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. मध्ये-मध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात तर उजव्या आणि डाव्या बाजूला उतारावर अनेक ठिकाणी जसे आणि जितके जमेल तितके पाणी जमवण्यासाठी टाक खोदलेली आढळतात.
पुढे गेलो की एक बुरुज लागतो आणि त्या पुढे जायला उजव्या कोपऱ्यामधून दरवाजा आहे. गंमत म्हणजे ह्या बुरुजाच्या मागे लागुन एक खोली आहे. म्हणजे वरुन उघडी पण चारही बाजूने बंद अशी. आता नेमक प्रयोजन माहीत नाही पण बहुदा पाण्याचे टाके असावे. तोपची (तोफा डागणारे) तोफा डागल्यानंतर त्यात उड्या घेत असतील म्हणुन बुरुजाच्या इतके जवळ ते बांधले गेले असावे. आम्ही उजव्या हाताच्या दरवाजाने पुढे निघालो. माचीची पूर्ण उतरती तटबंदी आता आपल्या दोन्ही बाजुस असते.
उजवीकडच्या जंग्यामध्ये लक्ष्यपूर्वक बघावे. (जंग्या - शत्रुवर नजर ठेवता यावी, तसेच निशाणा साधता यावा म्हणुन तटबंदीमध्ये असलेली भोके) एका जंग्यामधून खाली थेट दिसतो पुढच्या टप्याचा चोरदरवाजा. म्हणजेच पुढचा भाग जर शत्रुने ताब्यात घेतला तरी बारकूश्या चोरदरवाजा मधून शिरणाऱ्या शत्रुचे जास्तीत-जास्त सैनिक टिपता यावेत अशी दुर्गरचना येथे आहे.
आम्ही तिघे आता अजून पुढे निघालो. दोन्ही बाजूला उतरती तटबंदी होती. काही वेळातच दुसऱ्या टप्याच्या बुरुजापाशी पोचलो. ह्याला 'व्याघ्रमुख' म्हणतात. येथे सुद्धा पहिल्या टप्यासारखीच दुर्गरचना. फरक इतकाच की तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्यामध्ये जाणारा दरवाजा हा डाव्या बाजूने आहे. ह्या दरवाजापासून लगेच पुढे डाव्या बाजूला आहे संजीवनी माचीचा 'अळू दरवाजा'. इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार असणाऱ्या तटबंदीमुळे अळू दरवाज्याचा बाहेरचा दरवाजा आतून दिसत नाही तर बाहेरून आतला दरवाजा सुद्धा दिसत नाही. सकाळपासून दुर्गबांधणी मधले एक-एक अविष्कार पाहून आम्ही पुरते भारावलो होतो. आमच्या कडून भन्नाट रे ... सहीच.. मानला रे... अश्या कॉमेंट्स येत होत्या. पण आम्हाला ठाउक कुठे होते की ह्यापुढे अजून जबरदस्त अशी दुर्गरचना आपल्याला बघायला मिळणार आहे.
संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले.. ना कोणी करू शकेल.. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते.
मूळात गडाचा हा भाग तसा शत्रूला चढून यायला सर्वात सोपा म्हणुनच या ठिकाणची दुर्गबांधणी अतिशय चपखलपणे केली गेली आहे. दुहेरी तटबंदीमधली आतली तटबंदी मीटरभर जाड आहे. मध्ये एक माणूस उभा आत जाइल इतकी किंवा त्यापेक्षा थोडी मोठी जागा सोडली की बाहेरची तटबंदी आहे. बाहेरची तटबंदी सुद्धा मीटरभर जाड आहे. तिसऱ्या टप्यामधली ही दुहेरी तटबंदी शेवटपर्यंत इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार आहे. ह्यात टप्याटप्यावर खाली उतरणारे दुहेरी बुरुज आहेत. म्हणजे दुहेरी तटबंदीवर एक बुरुज आणि त्याखालच्या दरवाजा मधून तीव्र उताराच्या २०-२५ पायऱ्या उतरून गेल की खालचा बुरुज. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायर्यांसाठी दरवाजामधून प्रवेश केला की डाव्या-उजव्या बाजूला बघावे. दुहेरी तटबंदी मधल्या वक्राकर मोकळ्या जागेमध्ये येथून प्रवेश करता येतो. इतकी वर्ष साफ-सफाई न झाल्यामुळे आता आतमध्ये रान माजले आहे. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायऱ्या अक्षरशः सरळसोट खाली उतरतात. आता झाडी वाढल्यामुळे आत अंधार असतो त्यामुळे आत घुसायचे तर टॉर्च घेउन जावे.
आम्ही तिघेपण थोडा उजेड बघून अश्याच एका बुरुजामध्ये खालपर्यंत उतरलो. उतरताना लक्ष्यात आले की पायऱ्या सरळ रेषेत नाही आहेत. त्यासुद्धा वक्राकर. जेंव्हा पूर्ण खाली उतरून गेलो तेंव्हा खालच्या बुरुजाकड़े बाहेर निघणारा दरवाजा दिसला. तो जेमतेम फुट-दिडफुट उंचीचा होता. म्हणजे बाहेर निघायचे तर पूर्णपणे झोपून घसपटत-घसपटत जावे लागत होते. हूश्श्श... एकदाचे तिकडून बाहेर पडलो आणि खालच्या बुरुजावर निघालो. आता आम्ही दुहेरी तटबंदीच्या सुद्धा बाहेर होतो. कसली भन्नाट दुर्गरचना आहे ही. शत्रुने जर हल्ला करून खालचा बुरुज जिंकला तरी आत घुसताना शत्रूला झोपून घसपटत-घसपटत आत यावे लागणार. त्यात ते काय शस्त्र चालवणार आणि काय लढणार. अगदी आत आलेच तरी लगेच पुढे वक्राकर आणि सरळसोट वर चढणाऱ्या पायऱ्या. बरे तिकडून सुद्धा शत्रु पुढे आलाच तर दुहेरी तटबंदीमधल्या आतल्या तटबंदीचा दरवाजा बंद करून घेतला की शत्रु सैन्याला पर्याय राहतो तो फ़क्त उजवीकड़े किंवा डावीकड़े जाण्याचा म्हणजेच दुहेरी तटबंदीमधल्या मोकळ्या वक्राकर जागेमध्ये शिरायचा. आता ह्यात शिरणे म्हणजे जिवंत सुटणे नाही. कारण एकतर वर चढून येणे शक्य नाही आणि वरुन आपण गरम तेल, पाणी, बाण, भाले अश्या कशाने सुद्धा शत्रूला लक्ष्य करू शकतो. ह्या संपूर्ण मालिकेतून शत्रूला विजय मिळणे शक्य नाही. मिळेल तर तो मृत्युच.
आम्ही पुन्हा पायऱ्याचढून आतमध्ये आलो आणि शेवटच्या बुरुजाकड़े निघालो. अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या आहेत. अखेर पूर्ण माचीबघून आम्ही टोकाला चिलखती बुरुजाकड़े पोचलो. ६ वाजत आले होते. डाव्या बाजूस अथांग येसाजी कंक जलाशय होता. तर उजव्या हाताला दुरवर तोरणा उभा होता. त्यास मनातच म्हटले... 'उदया येतोय रे तुझ्याकड़े'. काहीवेळ तिकडेच बसलो. मागे दूरवर बालेकिल्ला आणि पद्मावती माची दिसत होती. आज राजगड बघून आम्ही भरून पावलो होतो. खरच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी राजगडला यावे आणि असे भरभरून बघावे. सूर्य अस्तात जात होता. आम्ही आमची पावले पुन्हा एकदा देवळाकड़े वळवली. भराभर पावले टाकत अळू दरवाजा पार केला आणि मग वरच्या टप्यावर येत बालेकिल्ल्याला भिडलो. कडयाखाउन येतायेताच पूर्ण अंधार पडला होता. आम्ही देवळाकड़े पोचलो तेंव्हा ७ वाजत आले होते. मंदिराच्या पायरीवर येउन बसलो.
आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. मस्तपैकी पुलाव आणि खीर असा बेत केला होता. पण जेवण बनवताना हर्षदकडून पुलावमध्ये चुकून रॉकेल पडले. त्याचे झाले असे की हा आपला बघतोय झाकण उचलून की भात शिजला आहे की नाही ते आणि बघताना उजेड हवा म्हणुन रॉकेलचा दिवा ठेवलाय झाकणावर. मग काय पडला ना तो आतमध्ये. आधी आम्हाला काही बोललाच नाही तो आम्हाला. पण नंतर सांगतो कसा,"जरा गडबड झाली आहे. भात परत बनवावा लागेल." मग आम्हाला सगळी स्टोरी सांगितली. आता भात परत लावला. खीर बनवली आणि मस्तपैकी जेवलो. दूसरीकड़े टाकुन दिलेला भात वाघ्याने कधीच खाल्ला होता. नशीब त्याला काही झाले नाही. अत्यंत महत्वाचा असा शिवपदस्पर्श आज अनुभवला होता. आता उदया लक्ष्य होते किल्ले तोरणा उर्फ़ प्रचंडगड...
क्रमशः... सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ... !
रोहन, तुझे दुर्गभ्रमणवरचे
रोहन, तुझे दुर्गभ्रमणवरचे वृत्तांत वाचताना खरोखर एक वेगळाच अनुभव येतो. कारण तुझं लिखाण अन त्यातले बारकाईने नमुद केलेले ऐतिहासिक दाखले यातून दुर्गभ्रमणाविषयचं वेड लागून जातं रे. अन जेव्हा कधी या ठिकाणावर आपण जातो तेव्हा.. आवर्जून तू लिहिलेल्या या सगळ्या गोष्टी आपोआप आठवतात.
धन्स रे मित्रा.. असच भटकत रहा.. अन लिहित रहा.
भन्नाट..जबरदस्त तोरणा ते
भन्नाट..जबरदस्त
तोरणा ते रायगड करायचाय.. बघुया जानेवारीमध्ये जमतय का...
छान लिहीलय - चिलखती बुरुजात
छान लिहीलय - चिलखती बुरुजात जायला हव एकदा
[मायबोलीवरच कुणी लिहीलेल आहे फोटोसहीत की त्यान्नी गुन्जवणे दरवाज्याने चढाई केली (बहुतेक फेब्रु२००९/२०१० असेल - मी लिन्क शोधायचा प्रयत्न केला बराच पण मिळाली नाही, लेखकाची आयडी देखिल आठवत नाही )]
सापडली लिन्क...
http://www.maayboli.com/node/14312 विमुक्त आयडीने लिहीलेला हा लेख गुन्जवणे दरवाजा व राजगड करता बघा.
जमल्यास...
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/105342.html?1143086117
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/3026.html
या लिन्क वरील फोटो व (माझे) लेखन बघा
सगळे बारकावे उत्तम रित्या
सगळे बारकावे उत्तम रित्या टिपले आहेस... वेड लावणार गड... राजगड!
२००४ मधे आप्पा परबां सोबत राजगड प्रदक्षिणाचे भाग्य आम्हाले लाभले.
भटक्या..याही भागात खिळवून
भटक्या..याही भागात खिळवून ठेवलेस रे.. खूप खूप छान वाटत होतं वर्णन वाचताना..
भटक्या, तुमचं लिखाण आणि फोटो,
भटक्या, तुमचं लिखाण आणि फोटो, माहिती सर्वच एवढ छान असतं कि ते नंतर वाचेन अस करताच येत नाही.
अत्यंत डोळसपणे केलेली भटकंती
अत्यंत डोळसपणे केलेली भटकंती आहे ही. खरोखर संग्रही ठेवावा असा लेख आहे हा.
ह्या राजगडाबद्दल बोलायचे तर
ह्या राजगडाबद्दल बोलायचे तर एका चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याची ही खालील ओळ तोंडावर येते....
"मिलकेभी हम ना मिले तुमसे ना जाने क्यू...."
रोहन.. मस्तच रे.. संजिवनी माचीचे बांधकाम तर बस वेड लावण्यासारखे आहे.. आम्हीदेखील तशाच एका बुरुजाच्या खालपर्यंत जाउन पाहिले होते.. नि बस्स.. थक्क झालो होतो..
मी तर पहिल्याच भेटीत राजगडाच्या प्रेमात पडलोय.."कैसे बताये क्यू तुझको चाहे.. यारा बता ना पाये.. तू जाने ना.... !"
अतिशय सुंदर वर्णन. सगळे
अतिशय सुंदर वर्णन. सगळे बारकावे टिपलेत. मस्तच !
मस्तच वर्णन रे रोहन
मस्तच वर्णन रे रोहन
खास वर्णन रोहन, तुझे
खास वर्णन
रोहन, तुझे दुर्गभ्रमणवरचे वृत्तांत वाचताना खरोखर एक वेगळाच अनुभव येतो>>>>सुकीला मोदक
संजीवनी माचीच्या तिसऱ्या
संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले.. ना कोणी करू शकेल.. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते. >>>>> हे वाचून उर अभिमानाने भरुन आले .....
हे वर्णनही अतिशय सुंदर ......
खुपच डोळस भटकंती. रिलेट केलय
खुपच डोळस भटकंती.
रिलेट केलय मी जितकं फिरलो ते