Submitted by भूत on 12 November, 2010 - 02:16
एका कवितेवर(?) सुरु असलेल्या चर्चेत हा विषय निघाला ...
"कविता" म्हणजे काय ?
त्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी असे अनेक लोकांचे मत आल्याने हे स्वतंत्र पान उघडत आहे .
इथे कविता / कवी म्हणजे काय ? या विषयावर आपली सीरीयस मते मांडावीत ...
गुलमोहर:
शेअर करा
आवडला हा प्रतिसाद उल्हासराव!
आवडला हा प्रतिसाद उल्हासराव!
धन्यवाद!
मर्यादित शब्दांत गहरा आशय ज्यातून व्यक्त होतो आणि त्या आशयाची अनुभूती रसिकाला होते अशा
रचनेला कविता म्हणायला हवं असं मला वाटतं>>>> एक चांगले मत आहे हे!
वास्तविक माझ्यासारख्या नवख्याची काही बोलण्याची पात्रता नाही. तरी देखील..... थोडे अकलेचे तारे तोडतो. >>>
असे उगीच काहीतरी म्हणू नयेत कृपया!
उल्हासराव, आपल्याप्रमाणेच
उल्हासराव,
आपल्याप्रमाणेच इतरही जाणकारांनी आपली मते मांडावीत हीच अपेक्षा. आपणही यात असेच सहभागी होऊन आपली मते मांडत रहा.
प्रगो, > ( इथे यमक नसलेली पण
प्रगो,
> ( इथे यमक नसलेली पण वृत्त छंद बध्द मराठी कविता उदाहरण म्हणुन सुचत नाहीये ...)
माझ्याच एका कवितेचे उदाहरण देतो (मग मी पण मागे नाय हटणार... ह.घ्या सगळ्यांनीच)
सुचते काही, अनाम दुःखाहून खोलसे,
परंतु लिहितो सगळ्यांना जे रुचते-पटते।
इमान नाही दुःखांशीही, शब्दांशीही,
इमान माझे उरले नाही माझ्याशीही ।
कुठे तळाशी मनात आता, अतीव निश्चल
सुचलेली ती अनाम दुःखे, शब्द तयांचे...
वरवर असते रिमझिम कविता, अतीव चंचल,
आवडते जी सगळ्यांना, अन् शब्द तिचेही ।
ह्यांच्या मध्ये बोथटलेली जाणिव माझी-
-गोठुन असते, युगायुगांच्या अंधारासम !
वागवते ती ओझे केवळ त्या कवितांचे,
जपते बहुदा त्या दुःखांचा अनाम ठेवा ।
कवितेइतका मीही दिसतो जगास हसरा,
आवडतो अन् तोच चेहरा हसरा त्याला...!
'अनाम दुःखे अनाम असणे हेच चांगले'
कळते आहे त्या चेहऱ्याला, अन् कवितेला...!
वरील रचना ही कविताच आहे ह्याबद्दल कुणाचे दुमत नसावे. (असले तरी मला फरक पडत नाही)
कविता म्हणजे काय? हा प्रश्न फारच जनरल आहे असे माझे मत.
एखाद्या गोष्टीची व्याख्या आपण करतो तेव्हा त्या गोष्टीची सामान्यपणे आढळणारी लक्षणे लक्षात घेतली जातात. तसे जर काव्याची व्याख्या करायची झाली तर काव्यशास्त्र सांगते, 'वाक्यं रसात्मकं काव्यं' - ज्यात 'रस' आहे असं वाक्य, म्हणजे काव्य.
आता 'वाक्य' ह्याची व्याख्या काय? कर्ता+कर्म्+क्रियापद यांचा वापर करून अर्थबोध होईल असा शब्दसमुच्चय म्हणजे वाक्य. काव्य म्हणजे, केवळ अर्थबोध करवून न देता, त्याही पुढे ज्यात 'रस' हा आत्मा आहे, असे वाक्य म्हणजे काव्य. आता 'रस' म्हणजे काय? ह्यावर चर्चा व्हावी (जर वाक्यं रसात्मकं काव्यं वर बोलणार असू तर, नसेल तर राहु दे.)
प्रगो, जी सविता नाही ती कविता
प्रगो,
जी सविता नाही ती कविता !
मुक्तछंदाचे उत्तम उदाहरण
मुक्तछंदाचे उत्तम उदाहरण म्हणजे कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता.
मुक्त छंदात सुंदर कविता असतात हे आपल्याला मान्य करायलाच हवे.
मला वाटते 'लय' या शब्दाच्या अर्थाबाबत गफलत ही 'लिहिलेली' कविता 'मनात वाचणे'; आणि कवीने (किंवा सादरकर्त्याने) 'मोठ्याने वाचलेली' कविता 'ऐकणे' यात होत असावी. जी लय कवीला अभिप्रेत असते ती वाचकापर्यंत पोचत नाही. कारण कविता सादर करताना काही ओळी, काही शब्द परत म्हटले जातात; वेगळ्या टोनमध्ये म्हटले जातात. ही गोष्ट कविता लिहिताना शक्य होत नाही. पण त्यामुळे मुक्तछंदातील कवितांचे महत्व कमी होते असा अर्थ आपण काढू शकत नाही.
'वाक्यं रसात्मकं काव्यं' -
'वाक्यं रसात्मकं काव्यं' - ज्यात 'रस' आहे असं वाक्य, म्हणजे काव्य.
>>>> म्हणजे मग रस असला की बास ? वृत्त.... छंद ...गेयता ..यमक.....काही नको ???
व्याखेवर परत एकदा विचार व्हावा !
( इथे समर्थांचा कविते विषयीचा एक श्लोक स्मरतो ... त्यांनी कवितेचे ३ प्रकार सांगितलेत
धीट : बहुतेक आजकाल याला आपण कविता पाडणे म्हणतो
पाठ : तंत्र (= वृत्त , छंद ई.) माहीत आहे ...पाठ आहे म्हणुन उगाचच त्यात शब्द घुसडडुन काव्यात्कार करणे
उत्स्फुर्त ...ह्या विषयी ...अधिक बोलणे न लगे ...साक्षात ..........देणे इश्वराचे !!
|| सकळ करणे जगदीशाचे | अन कवित्वची काय मानुशाचे ?
ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घावे ||
)
>>>> म्हणजे मग रस असला की बास
>>>> म्हणजे मग रस असला की बास ? वृत्त.... छंद ...गेयता ..यमक.....काही नको ???
भट्टो़जी दीक्षितांना विचारायला पाहिजे.
पण माझ्यामते, तो 'रस' आणण्याचे कार्यच हे , वृत्त, छंद, गेयता वगैरे फॅक्टर करत असावेत.
>>>> म्हणजे मग रस असला की बास
>>>> म्हणजे मग रस असला की बास ? वृत्त.... छंद ...गेयता ..यमक.....काही नको ???
वृत्त , छंद , गेयता, यमक याशिवाय रसनिष्पत्ती होत असेल तर ते पुरेशी नाही की काय? की रस प्याल्याला तोंड लावून पिणे, चमच्याने पिणे, स्ट्रॉने पिणे किंवा घडा तोंडाचा आ करून त्यात उपडा करणे या वेगवेगळ्या प्रकारे पिण्याने वेगवेगळी चव येते? किंवा येत नाही?
केवळ वृत्त, छंद, गेयता, यमक यांनी रसनिष्पत्ती होईल का?
आशयाच्या दृष्टिने कवितेत समकालीनता यावी, वाचकाला नवे काही मिळावे अशी भाषा वाचायला मिळते. तोच आशय व्यक्त व्हायला फॉर्म मात्र जुनाच असावा हा अट्टाहास का? नुकसान अर्थातच वाचकाचे!
मी इथे थोडे आधी 'आता काही देणे घेणे उरले नाही' अशी एक रचना टाकलीय. त्यात यमके आहेत. ८ मात्रांचे प्रत्येकी ४ संच आहेत. झाली का रसनिष्पत्ती?
अजूनही तोच तोच मुद्दा येत
अजूनही तोच तोच मुद्दा येत आहे. पण असो!
छंदोबद्ध कविता असली की 'तीच' कविता असे कुणीच म्हणत नाही आहे. हे मी पुन्हा लिहीत आहे. मुक्तछंदाला कविता म्हणावे की नाही यावर चर्चा आहे तूर्तास!
रस प्याल्याला तोंड लावून पिणे, चमच्याने पिणे, स्ट्रॉने पिणे किंवा घडा तोंडाचा आ करून त्यात उपडा करणे या वेगवेगळ्या प्रकारे पिण्याने वेगवेगळी चव येते? किंवा येत नाही?>>>
नक्कीच वेगवेगळी चव येणार नाही. पण तो रस आणि हा रस भिन्न नाही का? वाक्यातील (काव्यपंक्तीतील ) रस ही मुख या इंद्रियाने चाखण्याची बाबच नाही. ती आहे मेंदूशी संबंधीत! (येथे मेंदू = मन असे गृहीत धरत आहे.)
तेव्हा मनाला / मेंदुला एखादी गोष्ट फक्त 'काय' सांगते याचबरोबर 'कशा शैलीत सांगते' याच्याशीही संबंध असतोच!
उसाच्या गुर्हाळ वाल्याने एखाद्याला युरीन पॉटमध्ये उसाचा रस प्यायला दिला तर त्या माणसाला ते चालेल का? चव तीच! पण नाही चालणार! अगदी गिर्हाईका समोर दुकानातून नवीन पॉट आणून त्यात रस ओतला तरीही नाही चालणार!
-'बेफिकीर'!
मी इथे थोडे आधी 'आता काही
मी इथे थोडे आधी 'आता काही देणे घेणे उरले नाही' अशी एक रचना टाकलीय. त्यात यमके आहेत. ८ मात्रांचे प्रत्येकी ४ संच आहेत. झाली का रसनिष्पत्ती?>>>>
तांत्रिकदृष्ट्या शुद्ध शब्दरचना फक्त 'पद्य' असू शकते. कविता'च' असण्यासाठी त्यातील आशयही काव्यमय असावा लागतो. हे विधान याच धाग्यावर मी आता पाचव्यांदा करत आहे. तेव्हा कृपया, मुक्तछंद ही कविता नाही, असे म्हणणारे 'फक्त तंत्रालाच कविता समजत आहेत' असा गैरसमज करून घेण्याची घाई करू नये व तो मोह टाळावा.
<<<मुक्तछंद ही कविता नाही,
<<<मुक्तछंद ही कविता नाही, असे म्हणणारे 'फक्त तंत्रालाच कविता समजत आहेत' असा गैरसमज करून घेण्याची घाई करू नये व तो मोह टाळावा>>>
पण मुक्तछंद कविता नाही असे म्हणणारे तंत्राशिवाय कविता नाही असे म्हणतात त्याचे काय?
"वृत्त , छंद , गेयता, यमक याशिवाय रसनिष्पत्ती होत असेल तर ते पुरेसे नाही काय?" हा मुद्दाही मी कितव्यांदातरी मांडत आहे.
मुक्तछंदाला कविता मानणारे मुक्त आणि वृत्तबद्ध अशा दोन्ही प्रकारांचा आस्वाद(लेखन वाचन दोन्ही तर्हेने) घेऊ शकतात आणि घेतात. मुक्तछंदाला कविता न मानणारे मात्र या आनंदाला पारखे होतात. तेव्हा विचारांच्या मोकळेपणाची गरज कोणाला आहे ते त्यांनीच ठरवावे.
सृजनशीलतेच्या क्षेत्रात आपण वावरतो असे ज्यांना वाटते त्यांची दृष्टी स्वागतशील असावी अशी अपेक्षा करणे गैर आहे का?
<<नक्कीच वेगवेगळी चव येणार नाही. पण तो रस आणि हा रस भिन्न नाही का? वाक्यातील (काव्यपंक्तीतील ) रस ही मुख या इंद्रियाने चाखण्याची बाबच नाही. ती आहे मेंदूशी संबंधीत! (येथे मेंदू = मन असे गृहीत धरत आहे.)>>
काव्यातील रस पिण्याची वृत्त, यमक, गेयता ही जशी साधने आहेत तसेच मुक्तछंद हेही एक साधन आहे. घडा तोंडात उपडा करण्याशी त्याचे साधर्म्य कुणाला वाटू शकेल.
बेफिकीर, ही सूचना किंवा आक्षेप नाही. फक्त निरीक्षण आहे. इतर मंडळींनी मांडलेल्या मुद्द्याला दिलेले उत्तर आपण स्वतःला घेतल्याने तोच मुद्दा परत परत येतो आहे, असे आपल्याला वाटत असावे.
प्रगो :चर्चेचा धागा आपण सुरू केलात. पण ती पूर्ण वाचलीत का?
वसंत बापटांच्या 'फुंकर, सावंत' या कविता वाचून त्यांचा आनंद घेणार का आपण?
आरती प्रभूंची 'खार' ही आपली एक आवडती कविता आहे. ती वृत्तात नाही, तीत यमक नाही, अनुप्रास मात्र आहे. तिला अजूनही कविता म्हणणार का?
एवढे होऊनही पुन्हा मुक्तछंद म्हणजे कविता नाहीच असे कुणी म्हणणार असतील तर म्हणोत बापडे. मुक्तछंदाला कविता मानणार्यांच्या वाचनानंदात आणि लेखनानंदात त्याने उणीव येणार नाही.
(वृत्तात आणि यमक जुळवून लिहिता आले म्हणजे आपल्याला कविता लिहिता आली असा गैरसमज होऊ शकतो याचे ठसठशीत उदाहरण सध्या गुलमोहरावर दिसते आहे.)
तांत्रिकदृष्ट्या शुद्ध
तांत्रिकदृष्ट्या शुद्ध शब्दरचना फक्त 'पद्य' असू शकते. कविता'च' असण्यासाठी त्यातील आशयही काव्यमय असावा लागतो. >>>
बेफिकीरजी,
तांत्रीकता असणे व काव्यमयता असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत व त्या दिन्ही असतील तरच ते काव्य हे आपल्या विधानावरून समजते. काव्यमयता म्हणजे गेयता असे आपणास म्हणावयाचे आहे का? तसे असल्यास गाता येते तीच कविता असा अर्थ घ्यायचा का? तसे कैलास गायकवाड यानी मांडलेही आहे. जर असे असेल तर गीत आणि कविता या दोहोंमधे फरक आहे की दोन्ही एकच आहे? एकच असल्यास दोन नावे का? भारत माझा देश आहे ही आपली प्रतिज्ञा गद्य की पद्य? जन गण मन तांत्रिक दृष्ट्या पद्य आहे का?
आपल्या पहाटे ये सकाळी मोकळा असतो दुपारी या गझलेला चाल लावून पाहिली का? चाल लागेल हो पण चालित म्हणावी अशी ती रचना आहे का? असेच बर्याच रचनांबाबत घडते. फक्त आपल्या नव्हे सर्वांच्याच. रचना वाचायला उत्तम वाटते. तंत्रात असते. काव्य म्हणून आवडावी अशीही असते. पण त्याला चाल लावावी वाटत नाही किंवा तो बालिशपणा ठरतो.
जस की
"तुमच्या रेशनकार्डावरती नाव माझं लावाल का?
सांगा आवंदाला डांगडिंग वाजवाल का?"
हे शब्द खजगीत प्रेयसिने गमतीने प्रियाला तिच्या वकुबानुसारच्या काव्यात विचारणे ठिक आहे. यमकही छान जुळते आहे. तंत्रही असेल्च. गेयताही भरपूर आहे. पण ह्याचे गाणे करून लोकांचा माणसिक छळ करणे याशिवाय काय साधले?
'हाक आली बेडकांच्या बैलस्वप्नांची' या आपल्या गझलेला किंवा 'मी वेड्यांच्य जत्रेमध्ये मांडून बसलो पाल' या गझलेला कोणत्या रागात चालबध्द करता येईल? चाल दिल्यास गाणे श्रवणीय होईल का?
कैलासजी,
गीत आणि कविता या दोहोंमधे फरक आहे की दोन्ही एकच आहे?
-हणमंत शिंदे
कोणतेही गीत ही मुळात कविता
कोणतेही गीत ही मुळात कविता असतेच परंतू संगीतकाराच्या दृष्टीमुळे ती "गीत" म्हणून सादर होते, मग गीतकार आणि संगीतकार एकच असेल किंवा भिन्न व्यक्ती.
मी पप्पांचा ढापून फोन
फोन केले एकशेदोन........
ह्याला चाल लावून कवितेचे जर गीत / बालगीत करता येते तर ती ताकद संगीतकाराची आहे, ती दृष्टी संगीतकाराची आहे. त्यामुळे उद्या कदाचित 'मी वेड्यांच्य जत्रेमध्ये मांडून बसलो पाल' यालासुद्ध्द्दा एखाद्याने संगीतकाराच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास एखादी श्रवणिय चाल लागूही शकते, जी मुळ कवीला अभिप्रेत नसेल किंवा सुचलीही नसेल. आणि मग आपणही सहज ते गुणगुणून "गीत" या सदरात ते अॅक्सेप्ट करू...... कदाचित. त्यामुळे एखाद्या कवितेला गीतरूप द्यायचे श्रेय किंवा ती भुमिका संगीतकाराचीच आहे असे मला वाटते. मग ते गीत आधी रचलेल्या चालीवर असो, किंवा कवितेला नंतर लावलेली चाल असो.
त्यामुळे कवितेला "गीत" रूप देणे हा सर्वस्वी संगीतकाराच्या भुमिकेचा भाग आहे. पुन्हा व्यक्ती तीच असेल किंवा भिन्न. कदाचित कवीला आपल्या कवितेचे गीत होइइल याची कल्पनाही नसेल.
उदा. डॉक्टरांच्या एका गझलेला त्यांना अपेक्षित नसताना एका मान्यवराने उत्तम चाल लावलेली आहेच.
(आता कृपया गीत आणि गझल यावर वाद नको. मी फक्त एक ताजे उदाहरण दिले एवढच.)
एकंदर इथे आता भुमितितले "प्रमेय" आणि "व्यत्यास" यांचा खेळ सुरू झालाय.... पण अमृतमंथन चालू द्या.... आम्ही एखाददुसरे अमृताचे थेंब गवसले तर घ्यायला उत्सुक आहोत.....!!
""कोणतेही गीत ही मुळात कविता
""कोणतेही गीत ही मुळात कविता असतेच परंतू संगीतकाराच्या दृष्टीमुळे ती "गीत" म्हणून सादर होते, मग गीतकार आणि संगीतकार एकच असेल किंवा भिन्न व्यक्ती""
भुंगा, प्रवाद असा नाही.
१) सध्यातरी, म्हणजे चित्रपट, ध्वनिमुद्रणासाठी गीतलेखन व्हायला लागल्यापासून गीत हे एका बाह्य प्रेरणेने लिहिले जाते. कविता ही कवीच्या अंतर्मनाचा हुंकार असते.
ध्वनिमुद्रणाच्या पूर्वीच्या काळात गीत हा कवितेचा एक प्रकार मानला जात असावा.
गजानन वाटवे स्वतःला काव्यगायक म्हणवून घ्यायचे.गीतगायक नाही.
२) बहुसंख्य गीतांना (चांगले) काव्य मानले जात नाही. उदा: सराफ बेर्डे युगातील चित्रपटगीतांना कविता म्हणण्याचे धाडस कोणी करेल का?
३) मराठीत पं हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, यशवंत देव , श्रीनिवास खळे , सी रामचंद्र यांनी अनेक कविता स्वरबद्ध केल्या, तरी त्या मूळ कविता म्हणूनच लिहिल्या गेल्या होत्या. ( भा रा तांबे, आरती प्रभू, सुरेश भट, अनिल, वा रा कांत इ.च्या)
४) गीत म्हणूनच लिहिले गेलेल्या रचनांमधे काव्यगुण मिळतातही. गीत रामायण आहेच. शांताबाईंची जिवलगा (एका बंदिशीवर बेतलेली) , काटा रुते कुणाला (उर्दू शेरावर बेतलेले नाट्यगीत) ही गीतेही सुंदर कविता आहेत.
हणमंतराव, काव्यमयता म्हणजे
हणमंतराव,
काव्यमयता म्हणजे गेयता नाही. या दोन्हीत फारच फरक आहे.
तसेच, माझी ती गझल 'दुपारी ये पहाटे, मोकळा आहे दुपारी' अशी आहे व त्याला चालही लावलेली आहे.
आपल्या माहितीसाठी - गेय व गायनानुकूल हे दोन वेगळे प्रकार आहेत. बाकी नंतर लिहीतो.
मागच्या दोन दिवसांत चर्चा
मागच्या दोन दिवसांत चर्चा बरीच पुढे गेलेली आहे आणि ती अगदी खेळीमेळीने(आतापर्यंत तरी) सुरु आहे ह्याचा आनंद झाला. त्यबद्दल प्रथम आपण सर्वांनी आपापले अभिनंदन करून घ्यायला हवे. चर्चेला पुढे नेत असताना खालील मुद्दे मांडावेसे वाटत आहे(माझा स्वतःचा कवी म्हणून इथवरचा प्रवास देत आहे ज्यातून बर्याच गोष्टी समोर याव्या असे वाटते.....कुणाला हे अनावश्यक वाट्ल्यास फारसे मनावर न घेता सोडून द्यावे)
१. नारायण सुर्व्यांनी माझ्या गावात 'तुमचच नाव लिवा' ह्या कवितेच्या(आता पुन्हा ती कविता आहे की नाही ह्यावर चर्चा न होईल तर बरे होईल) केलेल्या वाचनानंतर मला कविता हा साहित्यप्रकार आवडू लागला(माझे वय तेव्हा १७ वर्षे होते).
२. ह्या प्रसंगानंतर माझ्या मनात असे विचार सुरु झाले आणि मी जे सुचेल ते कविता म्हणून मांडू लागलो (त्याला मुक्तछंद म्हणतात हे मला नंतर साधारण दीड वर्षांनी कळले) - त्यावेळचे माझे क्लासमेट्स त्याचे कौतुकही करू लागले आणि मला असे वाटू लागले की मला कविता लिहीता येते.
३. काही वर्षांनी(साधारण एक-दोन), "पुढारी" ह्या आमच्या स्थानीक वृत्तपत्राने एक चारोळी सदर सुरू केले ज्यात शेवटची ओळ दिली जायची आणि पहिल्या तीन ओळी आम्ही पोस्ट करून पाठवायचो. ह्या सदरांतर्गत एकदा आलेली ओळ "पंछी मनाचा झुरून गेला" अशी होती..ह्यावर मी अगोदरच्या तीन ओळी अशा ओळी पाठवल्या होत्या
ह्या क्षणभंगूर सुखाने
जगण्याचा दिलासा दिला
डोंगराएवढे दु:ख झेलता
पंछी मनाचा झुरून गेला
आता ह्यात वृत्त, छंद आहे की नाही हे त्यावेळी मला समजले नव्हते पण ह्याच्या निर्मितीतला आनंद अगोदरच्या मुक्तछंदातील कवितांपेक्षा आधिक होता(निदान मला तरी).
४. म्हणून मी माझा मोर्चा छंदबद्ध कवितांकडे वळविला(वृत्तबद्ध नव्हे) - लय आणि यमक वगैरे गोष्टी पाळू लागलो.
५. ह्या दरम्यान मी माझा "अर्धसत्य" नावाचा काव्यसंग्रह प्रकाशीत केला ज्यात ६०% मुक्तछंद वापरला आहे.
६. काही वर्षांनी माझ्या लक्षात आले की आपण बर्याचदा तेच तेच विषय हाताळतो आहोत म्हणून मग दोन कवितांमधील अंतर एक एक वर्षांचे होऊ लागले.
७. २००४ नंतर एकही रचना मुक्तछंदात मी लिहीली नाहीये(ही अभिमानाची गोष्ट म्हणून नव्हे तर कवीची मानसिकता कशी बदलते हे अधोरेखीत करण्यासाठी लिहीले आहे)
८. कुठल्याशा एका वळणावर मला गझल भेटली आणि मला वाटले की कवी म्हणून आपल्याला कुठे भरपूर शिकायला मिळणार असेल तर ते गझल अभ्यासताना मिळेल. गझल शिकायची हे ठरवले आणि तंत्र अवगत झाले(बर्यापैकी), परंतु अजूनही रसिकांना १००% आवडेल अशी एकही रचना करू शकलो नाहीये(गेल्या सहा महीन्यांत).........
वरील सर्व स्थित्यंतरांत खालील गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात,
अ. फक्त तंत्र म्हणजे कविता नव्हे हे त्रिवार सत्य आहे परंतु तंत्र आणि मंत्र जर दोन्ही असतील तर ती कविता फक्त मंत्र असलेल्या रचनेपेक्षा उठून दिसते(माझ्या मतापुरते बोलतोय मी).
आ. कवी आपल्या स्वतःच्या प्रवासाचे सतत अवलोकन करत असतो आणि स्वतःला रूचेल असा मार्ग वेळोवेळी निवडत असतो परंतु ते "युनिव्हर्सल ट्रुथ" होत नाही. महान प्रस्थापितांनी केले तरीही नाहीच नाही.
इ. मूलतः प्रत्येक माणूस हा मनाने कवी असतो परंतु अभिव्यक्ती जमण्यासाठी काहीजणांकडे कौशल्याचा अभाव असतो, काहींकडे धाडस नसते(भीती असते म्हणा हवे तर) - तंत्र अवगत असल्यास दोन्ही गोष्टी सहज साध्य होतात.
ई. मनाची जागरूकता (मी त्याला "मन जिवंत असणे" म्हणतो) काळाबरोबर कवीच्या रचना रसिकांच्या दृष्टीने समृद्ध करीत असते).
धन्यवाद
-विजय दि. पाटील
भरतजी, मुद्दा पटला. पण
भरतजी, मुद्दा पटला. पण बाह्यप्रेरणेव्यतिरिक्त जेंव्हा एखादी कविता गीतात रुपांतर केली जाते, त्याबद्दल मी लिहिले होते.
शिवाय, एखादी कविता "गीत" म्हणून निवडली जाते, तेंव्हा काहीवेळा त्यावर आवश्यक ते बदलही केले जातात. म्हणजे त्या कवितेतील काही जड शब्द जे गीत ऐकताना कानाला खटकू शकतात ते मुळ कवीची परवानगी घेऊन किंवा त्यांनाच सांगून बदलले जातात. थोडक्यात कानांना खटकणार नाही अशी गोलाई आणली जाते, पर्यायी शब्द वापरून.
शांताबाई, गदिमा, विद्याधर गोखले यांची नाट्यपदे अगदी नव्या लोकांत प्रवीण दवणे यांची गीतरचना नेहमीच अश्या शब्दांची असते जी चाल लावताना किंवा गीत ऐकताना कानाला खटकत नाहीत, सुमधूर वाटतात. पण ही निसर्गदत्त देणगीच म्हणायला हवी. यातून एक वाटते की, गीत आणि कवितेत हा एक फरक असावा. कविता उत्स्फुर्तपणे लिहिली जाते आणि गीतरचना करताना या छोट्या छोट्या गोष्टींचे भान ठेवावे लागते किंवा आवश्यक असे बदल करावे लागतात.
पण हल्ली इतकी काळजी घेतली जाताना दिसत नाही. नुकतेच नातातल्याच एका "लिटिल चँपची" सीडी आलीये पुण्यात. ती गाणी काल ऐकताना प्रकर्षाने जाणवत होते की त्या कविता तश्याच्या तश्या स्वरबध्द केल्यात, आवश्यक तिथे पर्यायी शब्द (जे गीत अधिक सुमधूर होण्यास करणे सहज शक्य होते) वापरलेले नाहीत. नवीन चित्रपट गीतांतही तीच बोंब आहे.
"वृत्त , छंद , गेयता, यमक
"वृत्त , छंद , गेयता, यमक याशिवाय रसनिष्पत्ती होत असेल तर ते पुरेसे नाही काय?"
'पुरेसे' म्हणजे काय? व्याख्येप्रमाणे 'कविता' या नावाला पात्र होते म्हणून?
असा कुठे नियम आहे की व्याख्येत फक्त एकच निकष असावा? जर 'कविता' असायला चार गोष्टींची गरज असेल तर?
माझ्या मते कवितेची व्याख्या नि कमीत कमी लक्षणे घेऊन एखादे लिखाण 'कविता' होऊ शकते का, हा मुद्दा महत्वाचा नाही.
आपण फक्त 'चांगली' कविता कुठली याबद्दल बोलू या. त्यासाठी काय काय असायला पाहिजे ते बोलू या. आणि जर त्यासाठी एका हून जास्त गोष्टींची गरज असेल तर तसे मान्य करायला पाहिजे.
!
!
कवितेबद्दल ची माझी काही मत
कवितेबद्दल ची माझी काही मत ----
१) कवितेच सहज आकलन व्हाव.
(क्वचित प्रसंगी, आकलन व्हायला कठीण कवितांमध्ये ही जबरदस्त आशय असतो हे मान्य असल तरी)
२) शब्दातली सहजता अधिक परिणामकारक ठरू शकते.
३) कविला नक्की काय सांगायच आहे हे रसिकाला समजल पाहिजे. त्यासाठी स्वत:ला काय सांगायचय हे कवीच्या मनात पक्क असल पाहिजे
४) कवितेतील आशय, रसिकाला स्वत:च्या आयुष्याशी किंवा मानवी जीवनाशी निगडित आहे अस जाणवल तर कविता परिणामकारक होते.
५) कविता आशयघन असावी. मुक्तछंद तसच छंदबद्ध/गेय कविता देखील आशयघन असू शकते. (काही लोकांची अशी धारणा असते की अमुक एक प्रकारे लिहिलेली कविताच श्रेष्ठ)
६) जमल्यास एखाद्या कवितेमधून एखाद चिरंतन सत्य, समाजाभिमुख विचार मांडता आला तर उत्तम.
७) कविता शास्त्रीय संगीता सारखी डोक्यावरून जाणारी असता कामा नये. शास्त्रीय संगीत कितीही महान असल तरी ते सामान्य रसिकांच्या डोक्यावरून जात.
अशी असावी कविता, फिरून तशी
अशी असावी कविता, फिरून
तशी नसावी कविता , म्हणून
संगावया कोण तुम्ही कवीला
अहांत मोठे, पुसतो तुम्हाला.
युवा जसा युवतीस मोहे
तसा कवी हा कवितेस पाहे
तिला जसा तो करितो विनंती
तसा हिला हा करितो सुवृत्ती
करूनिया काव्य जनांत आणणे
न मुख्य हा हेटू तदीय मी म्हणे
करूनि ते दंग मनात गुंगणे
तदीय हा हेतु म्हणे मी
सभारुचि पाहुनि अल्प फार
रंगी नटी नाचवि सूत्रधार
त्याचे तयाला सुख काय होय?
ते लोकनिंदाभयही शिवाय
नटीपरी त्या कविता तयाची
जनस्तुती जी हृदयात याची
पढीक तीचे परिसुनी बोल
तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल?
स्वभावभूविष्ट जिचांत माधुरी
अशी तुम्हाला कविता रुचे जरी
कवीस सोडा कवितेबरोबरी
न जाच वाटेस तयचिया तरी
तयाचिया हो! खिडकीचिया उगे
खाली तुम्ही जाउनि हो रहा उभे
तिच्या तयाच्या मग गोड लीला
ऐकूनि पावाल तुम्ही मुदाला
--------------------------केशवसुत
कविता अशीच, अप्राप्य भलति, तो
कविता अशीच, अप्राप्य भलति, तो पोरखेळ नाही
शाईठिकाणि जो रक्त भरतो, त्याचीच बाजि होते
वेदनेच्या आतली सुविधा कळावी लागते
होत जख्मी वाट कवितेची मळावी लागते
फुग्यासारखा फुगतो कविते जगताना
सुईसारखी रोज रोज तू टोच मला
अता अक्षरशः तालावरी मी नाचतो
कधी कविता जणू वाटायची दाई मला
---------------------------- 'बेफिकीर'!
एवढा कशाचा माज तुझ्या चाफ्याला ?
गात्रांत तुझ्या कविता दरवळली माझी
लागले जरी शब्दांचे कुंटणखाने
पण अजूनही लेखणी न चळली माझी
----------------------------- चित्तरंजन भट (परवानगीशिवाय देण्यासाठी दिलगीर)
परवा परवा गुणगुणायची .. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी
------------------------------ वैभव जोशी (परवानगीशिवाय देण्यासाठी दिलगीर)
जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो
------------------------------ चित्तरंजन भट (परवानगीशिवाय दिल्यासाठी दिलगीर)
वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता
"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?
गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता
उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!
----------------------------- पुलस्ति (परवानगीशिवाय दिल्यासाठी दिलगीर)
इथे बहुतेक लोकांना अताशा वाचता येते
दिसावी फक्त एकाला अशी मिळते कुठे शाई
----------------------------- वैभव जोशी (परवानगीशिवाय दिल्यासाठी दिलगीर )
वाटते तसे हे सोपे; पण तसे किती हे अवघड...!
नेटके असावे लिहिणे...रोकडा असावा प्रत्यय... !!
एवढीच ओळख माझी; एवढाच माझा परिचय !
रोजच्याच शब्दांमधला मी नवा-निराळा आशय !
-------------------------- प्रदीपराव कुलकर्णी (परवानगीशिवाय देण्यासाठी दिलगीर)
काय साधणार ते कुलूप? या घरामधे रहायचा कवी
आत केवढेतरी भुयारही असेल, ते बुजायला हवे !
-------------------------- ज्ञानेश पाटील (परवानगीशिवाय देण्यासाठी दिलगीर )
विसावल्या वेदना मनाच्या तुझ्याच छायेमधे 'गझल'
तुझ्यामुळे आमचा उन्हाळा शिशीर झालेला आहे..
--------------------------- ज्ञानेश पाटील (परवानगीशिवाय देण्यासाठी दिलगीर )
वरील ओळी, द्विपदी, त्या त्या कवींना न विचारता नोंदवण्यासाठी दिलगीर आहे. पण यातूनही कवितेचे रंगरूप स्पष्ट होत असावे असे वाटते.
-'बेफिकीर'!
सुंदर चर्चा चाललीय. फार
सुंदर चर्चा चाललीय.
फार थोड्याशा, अल्पशा कारणांमुळे एखादी रचना कोणत्याही प्रचलीत वृत्तात, कोणत्याही प्रचलीत छंदात, मोडत नसेल पण ती रचना लय, गेयता टिकवून असेल आणि छंदबद्धता बर्यापैकी सांभाळून असेल तर त्या रचनेला मुक्तछंद म्हणता येईल.
उदा.
कसा बाळ माझा? श्याम सावळासा
जरासा जरासा, जरा साजरासा…!!
हे माझे अंगाईगीत श्याम ह्या एका शब्दामुळे भुजंगप्रयातात बसत नाहीये.
आणि
आली बघा आली, नीजराणी आली
मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
मिटमिट पापण्यांची यामुळे अक्षरछंदात पण बसत नाहीये.
मला हवा तसा आशय राखण्यासाठी मी शब्दांशी तडजोड स्विकारली नाही. त्यामुळे ही रचना भुजंगप्रयात
किंवा अक्षरछंदात बसली नाही.
त्यामुळे ह्या रचनेला मुक्तछंद म्हणता येईल.
(http://www.maayboli.com/node/13912)
मुक्तछंद म्हटले की त्यात छंदबद्धता असायलाच हवी ना?
ज्या रचनेत छंदबद्धता नसेल तीला मुक्तछंद तरी कसे म्हणता येईल?
फिल्मीगीते, भावगीतासारख्या रचना वृत्तात किंवा छंदात नसतात पण गेयतेशी इमान राखून असतात. त्यांनाही मुक्तछंद म्हणता येईल.
पण छंदाशी, लयीशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या रचनांना मुक्तछंद म्हणण्याचा अट्टाहास कशाला?
त्यांना मुक्तछंद म्हटले नाही तर त्या रचनेचे महत्व कमी होते असे थोडेच आहे?
शब्द, मांडणी आणि आशय दमदार असेल तर ती कविता वाचकांना आवडेलच.
मग त्या रचनेला कविता म्हणा की नका म्हणू, त्याने काहीही फरक पडणार नाही. रसिक त्या रचनेला कविताच म्हणणार आणि डोक्यावर घेणारच.
हा धागा मुद्दाम वर आणला
हा धागा मुद्दाम वर आणला
सुरूवातीच्या पोस्टस वाचल्या
सुरूवातीच्या पोस्टस वाचल्या आणि शेवटच्या काही. वेळ मिळाली कि निवांत पाहता येईल.
Pages