कविता म्हणजे काय?

Submitted by भूत on 12 November, 2010 - 02:16

एका कवितेवर(?) सुरु असलेल्या चर्चेत हा विषय निघाला ...

"कविता" म्हणजे काय ?

त्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी असे अनेक लोकांचे मत आल्याने हे स्वतंत्र पान उघडत आहे .

इथे कविता / कवी म्हणजे काय ? या विषयावर आपली सीरीयस मते मांडावीत ...

गुलमोहर: 

.

अरे टिंब्या, मुळ प्रश्न कवी म्हणजे काय आणि उपप्रश्न कविता म्हणजे काय????
तर, त्यावेळी उपस्थित नसलेल्या "ज्येष्ठांनी" आता मतप्रदर्शन करावे....... फक्त ज्येष्ठात "शिमगा" होणार नाही याची काळजी घ्या... Proud

प्रिय मित्र प्रसाद गोडबोले,

काल हा धागा सुरू करा म्हटल्यानंतर आपण 'आमी नाय जा Blush ' म्हणालात.

आज माझ्याकडून.... 'आमी नाय चर्चा करणार जा' Light 1 Rofl

बाकी जेष्ठ कविंच्या पंगतीत तुमचा स्वतःचाच मान बराच मोठा आहे. वर त्या ग्रे कलरच्या पट्टीमधे माझे नाव दिसते आहे. ते माझ्या परवानगीशिवाय तुम्ही वापरले आहे. मी मला आपल्याएवढा जेष्ठ समजत नसल्याने ते नाव तिथे नसावे ही विनंती.

-हणमंत शिंदे

अरे टिंब्या, मुळ प्रश्न कवी म्हणजे काय आणि उपप्रश्न कविता म्हणजे काय???? ज्येष्ट, कनिष्ठ भेद हवाच कशाला .जो तो ज्याला जसं लिहायचे तसं लिहतो, आणि ज्याला जसा प्रतिसाद द्यायचा तसा तो देतो. इथे ज्येष्ट, कनिष्ठ चा काहीही संबंध नाही.

च्यायला तुम्हा लोकांना चर्चा करायची नव्हती तर मला धागा कशाला काढायला सांगितला ? Angry

हे नेहमीचं हाय तुमचं ...मागं तुम्हाला सगळ्यांना भांडायची खुम्खुमी आली म्हणुन मी "नळ " काढला ....अन तो उडवला गेला ...अन माझं नाव झालं "आगलाव्या" म्हणुन ...:राग:

करके गया गाव ...और बाबुराव का नाव ....

____________________________________________________________________________

सीरीयसली चर्चा करणार नसाल तर सांगा ... कारण न देता दुसर्‍या कोणीतरी धागा उडवण्या पेक्षा मीच उडवेन Angry

.
.

ज्येष्ठ कनिष्ठ हे बाजूला ठेवायला हवे.

प्रतिसाद देणार्‍यांनी 'कवी म्हणजे काय' यावर मत मांडावे.

ग्रे पट्टीत कुणाची नावे आहेत असे मला दिसले नाही. कोणती ग्रे पट्टी?

प्रसादराव, श्री भुंगा आणि हणमंतराव, आपण आपली मते का दिली नाहीत? आपण सगळे एवढ्या कविता रचतो, तर कवी म्हणजे काय यावर आपले एकेक मत तरी असेलच की?

मी आपले माझे मत लिहीतो.

कवी -

बाह्यजगतातील विविध आघातांनी प्रतिभाशक्ती उद्दीपीत होऊन त्यामुळे नियमीत आवर्तन स्वरुपात अशा आघातांवर शब्दबद्ध प्रतिक्रिया देणारे मन लाभलेला सजीव माणूस!

मात्र, प्रकाशित केलेली कविता ही संस्कारीत होण्याची प्रक्रिया नैसर्गीकच असते व त्यामुळे ती कवीने किमान 'रंजक' तरी करावीच! (ही एक 'माझ्यामते असलेली' अट आहे, व्याख्या नव्हे. व्याख्या वर लिहीली.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बाह्यजगतातील विविध आघातांनी प्रतिभाशक्ती उद्दीपीत होऊन त्यामुळे नियमीत आवर्तन स्वरुपात अशा आघातांवर शब्दबद्ध प्रतिक्रिया देणारे मन लाभलेला सजीव माणूस>>>>

बाह्यजगत - जगातील कोणतीही बाब, जी आपण पाहतो, वाचतो, ऐकतो, अनुभवतो किंवा इतर कुणीतरी अनुभवल्याचे / पाहिल्या - ऐकल्याचे आपल्याला समजते.

आघात - ऐकणे, वाचणे, पाहणे, स्पर्श व चव अशा सर्व माध्यमांमधून ज्या बाबी मेंदूपर्यंत पोचतात ते आघात!

प्रतिभाशक्ती - ही विकसीत करण्याची बाब नाही. ती असते किंवा नसते. प्रतिभा हा फक्त साहित्य / काव्य याच्याशी निगडीत असलेला गुण नव्हे! तेंडुलकर, अमिताभ, किशोर कुमार व पु.ल. हे सर्वच अफाट प्रतिभावान! (लताऐवजी किशोरचे नाव घेण्याचे कारण किशोर कुमार खरोखरच अफाट होता, फक्त गायक नव्हे, पण तो वादाचा विषय नाही.) मात्र असलेली प्रतिभाशक्ती चांगल्यासाठीच वापरली जाणे महत्वाचे आहेच! जक्कलने त्याची बुद्धी खून करण्यासाठी वापरली होती.

नियमीत आवर्तन - छंद! कोणत्याही माणसाला सर्वात पहिल्यांदा कविता आवडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ती लयीत म्हणता येते. पाढे पाठ करताना मुले जे 'बे एके बे ए' असे म्हणतात त्यतील शेवटचा 'ए' हा लयीसाठीच असतो. कारण पुढील 'चार, सहा, आठ, दहा' या 'बे दुणे' मधे येणार्‍या आकड्यांबरोबर पहिल्या बे एक बे नंतर 'ए' घेणे हे तालबद्ध असल्यामुळे सोपे वाटते. प्रतिभाशक्ती स्वतः कधीही अनियमीत आवर्तनात प्रकट होऊ इच्छीत नसते. तिला तालातच प्रकट व्हायचे असते. आणि हे नैसर्गीक आहे. यावर नियंत्रण नाही.

शब्दबद्ध प्रतिक्रिया - प्रतिक्रिया हातवारे करूनही देता येते. ओरडून, रडून, हासून, निश्वास सोडून, नुसतेच डोळे वटारून किंवा मायबोलीच्या परिभाषेत चित्रविचित्र बाहुले देऊनही! पण कवी प्रतिक्रिया शब्दात व्यक्त करतो.

वर्ल मते माझी वैयक्तीक मते आहेत. मी त्याबाबत ठाम असलो तरी इतर कुणी असायलाच हवे हे म्हणण्याचा मला अधिकार नाही याची जाणीव आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी,
आपण मांडलेली व्याख्या आवडली.

विषयांतर करून मी काही पोस्ट वर टाकलेल्या आहेत म्हणून ही मला वाटणारी एकच कल्पना मांडत आहे.

दुसर्‍याच्या वेदनांनी हळवा होणारा, दुसर्‍याच्या सुखात हसणारा... आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला सुक्ष्मपणे निरखून तो पुरेपूर भोगण्याची आणि आपल्याच सुख दुखःशी लोभस भाषेत बोलण्याची शक्ती लाभलेला निष्कपट मनाचा, स्वतःमधेच मश्गुल राहणारा, काहिंच्या मते वेगळा तर काहिंच्या मते वेडा माणूस म्हणजे कवी.

कवी कुणाला म्हणावे हा मोठा गहन प्रश्न आहे. त्याचे कारण म्हणजे त्यात काळं पांढरं करता येत नाही. करड्या रंगाच्या हजारो शेड असतील. बेफिकीर म्हणतो त्याप्रमाणे 'प्रतिभाशक्ती उद्दीपित होणे' हा एक भाग आहे; पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचा भाग म्हणजे 'प्रत्यक्षात कविता लिहिणे'. माझ्यामते 'स्फुरणे' जर १०% असेल तर 'लिहिणे' याला ९०% महत्व आहे. कुणीतरी म्हटलय : "Poetry is 10% inspiration and 90% industry." मी या वाक्याशी सहमत आहे.

कवीमनाची ह.बा. ने केलेली व्याख्या छान आहे. Happy

"Poetry is 10% inspiration and 90% industry." >>> येस मीही सहमत आहे. या व्याख्या बीए मराठीच्या पुस्तकात आहेत. रचनाकौशल्य ही अभ्यासाची/शिकण्याची बाब आहे. त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास व प्रचंड वाचन आवश्यक आहे.

शरदराव,

मला असे वाटते की 'लिहीणे' ही एक संस्काररुपी प्रक्रिया आहे केवळ!

उदाहरणार्थ!

माझे दोन शेर लिहीत आहे.

मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा

आणि

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

दोन्हीतील मुद्दा काही प्रमाणात सारखाच आहे. हे दोन शेर रचण्यात अनेक महिन्यांची गॅप आहे व दोन भिन्न अनुभवांमुळे हे दोन शेर रचले होते मी!

आता जर 'लिहिणे' नव्वद टक्के असेल तर हे शेर लिहिताना मी विचार करेन जमीनीचा! आणि त्यात ते बसवेन! हे तांत्रिक संस्कार झाले असे माझे मत! मुळात कवितेतील हा विचार माझ्या मनात आधीच निर्माण झालेला आहे.

फक्त, होताना तो किती प्रमाणात प्रकाशित ओळीसारखा होता यावर दर्जा ठरावा!

अगदी याच दोन शेरांबाबत म्हणायचे तर ते जवळपास तसेच्या तसे सुचले होते. पण कित्येक शेर मी असे रचले आहेत की दोन दोन दिवस किंवा अधिक काळ (काही शेर अनेक महिने) घोळवतच बसलो होतो. आणि एवढे करूनही ते एक तर जमले तरी नाहीत किंवा रद्दच केले मी!

मग असे म्हणता येईल का? की मनात आलेला विचार अधिकाधिक नियमीत आवर्तनस्वरुपी असावा व तो जास्तीता जास्त मूळ स्वरुपात प्रकाशित करण्याच्या पात्रतेचा असावा.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

प्रत्येक कविता व्याकरणाच्या कुठल्या ना कुठल्या चौकटीत बसतेच जर ती तशी नसेल तर ती नवी मांडणी वाचकाला पटणारी, सहज पेलणारी, रंजक किंवा स्विकारण्या योग्य वाटायला हवी. शब्दांच्या निवडीबाबत आणि त्यांच्या जागेबाबत कवीने नेहमीच दक्ष असायला हवे. 'एक्झॅक्ट वर्ड इन एक्झॅक्ट प्लेस' असेही काहितरी वाचल्याचे आठवते आहे. यमक हे कवितेच्या सौंदर्याचे एक महत्वाचे लक्षण आहे. तो कवितेचा दागिणा आहे असे म्हटले तरी चालेल. त्याचा योग्य वापर रसिकाला लयबध्दतेची वेगळी अनुभुती देऊ शकतो. यमक महत्वाचे की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. ते महत्वाचेच आहे हे जगातल्या सर्वाधिक प्रसार झालेल्या इंग्रजी भाषेमधल्या कविता वाचतानाही लक्षात येते. ती केवळ सोय आहे हे कुणीही म्हणाले असले तरी मला मान्य करावेसे वाटत नाही.

शब्दांची जाण नसणारे, नुकतेच लिहू लागलेले आणि कुणाच्या तरी प्रभावाने एका शैलिच्या मागे लागलेले कवी शब्दांची चुकिची निवड करू शकतात. पण जाणिवा समृध्द होण्यासाठी अनुभव व वाचनाची आवश्यकता असते जो काळाच्या ओघात होत जातो. त्यामुळे अशा कवितेतून त्या कविच्या अनुभववुश्वाचं वय काय आहे? त्याचा शब्दसंग्रह किती मोठा आहे? त्याच्या रचनाकौशल्यात काही नवे पणा आहे का? तो कोणत्या शैलित लिहीतो किंवा त्याची स्वतःची वेगळीच धाटणी आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न व्हावा.

काही कवींच्या कविता वाचताच हा जन्मभर सुधारणे शक्य नाही असेही वाटू शकते. त्या कवितांचे विषय जाणून बुजून क्ष पट्टीतील असतील तर पुर्ण विचारांती मनसोक्त विनोद करावेत पण ते विनोद त्या कविच्या त्या कवितेविषयी असावेत. एकुणच कविता या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावरचे नसावेत.

ती केवळ सोय आहे हे कुणीही म्हणाले असले तरी मला मान्य करावेसे वाटत नाही>>>

या विधानाशी व संपूर्ण पोस्टशी सहमत आहे!

यामुळेच काल मीही लिहीले होते की 'माधव ज्युलियन हे एक सोंग आहे या माझ्या जुन्या मताला पुष्टी मिळाली'.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अगदी याच दोन शेरांबाबत म्हणायचे तर ते जवळपास तसेच्या तसे सुचले होते.>>> हा अनुभवाचा किंवा त्या काव्यप्रकारावर असलेली हुकूमत आणि विपूल शब्दसंपत्ती याचा परीणाम असावा.

यमका विशयीचे ते मत ...या पुस्तकात कुठेशी वाचल्याचे स्मरते ...

http://www.sureshbhat.in/node/1704

सुंदर शब्दात व्यकत केलेल्या सुंदर भावना म्हणजे कविता असे माझे मत आहे ...आणि जो ते करु शकतो तो कवी ..आता सुंदर हे फारच व्यक्ती सापेक्ष आहे .

यमका बाबत बोलायचं झालं तर मला ते गरजेचे वाटतं नाही ....शंकराचार्यांच्या अनेक सोत्रात मला यमक दिसले नाही पण कविता म्हणुन ती कुठे कमी आहेत असे म्हणता येणार नाही ..... छंद / वृत्त / गेयता मात्र असली पाहिजे असे वाटते . शिवाय इतर काही विशेष प्रयोग असल्यास ही कविता भावते ...

मुक्तछंद हा नक्कीच स्वतंत्र विषय आहे ...<वैयक्तीक मत > .मुक्तछंदाला कविता म्हणणे ....माझी वरील व्याख्या पाहीली तर ...चालेल ...पण ललित म्हण्णे जास्त चांगले असे वाटते ....

लांडोर ला पिसारा नसलेला मोर म्हणण्या पेक्षा लांडोर म्हणणेच सोप्पे नाही का ?

पिसारा नसलेला मोर म्हणल्याने ...लांडोर मोठ्ठी होत नाही की मोर लहान होत नाही ... ज्याला जे सोप्पे वाट्टे त्याने तसे म्हणावे !

मुक्तछंदाला कविता म्हणणे ....माझी वरील व्याख्या पाहीली तर ...चालेल ...पण ललित म्हण्णे जास्त चांगले असे वाटते ....
>>> ललित हा वेगळा साहित्यप्रकार आहे. आणि मुक्तछंद हा बहुमान्य काव्यप्रकार आहे. एखाद्या लेखनाला आपण एकतर ललित म्हणू शकता किंवा मुक्तछंदातील कविता म्हणू शकता.

मुक्तछंदात लिहीलेले ललित असे म्हणने हा भयानक हास्यास्पद प्रकार होईल.

मुक्तछंदात लिहीलेले ललित

>>>> असे नाही म्हणायचे ....मला वाट्टते की मुक्तछंद : कविता आणि ललित यांच्या अगदीच सीमारेशेवर आहे ...no mans land ही म्हणता येईल !!

किंव्वा अजुन चांगली उपमा ...मुक्तछंद POK सारखा आहे ... काही जण म्हणतात कविता ...काही म्हणतात ललित .... अन मला वाटतय ...ज्याला जे सोप्पे वाट्टे त्याने तसे म्हणावे ... अगदीच " मुक्तछंद हा स्वतंत्र साहित्यप्रकार आहे ." ह्या मताला ही माझा विरोध नाही .

< वैयक्तिक मत > मला ललित म्हण्णे सोप्पे वाट्ते म्हणुन ललित म्हणतोय

या चर्चेत विषय निघाला आहे तर...

मुक्तछंद म्हणजे काय याबाबत मत मांडावे अशी विनंती मी हणमंतराव व प्रसादरावांना करतो...

माझ्यामते, मुक्तछंदालाही एक स्वतःची लय एक छंद असतो...... काव्यवाचनापुरता का होईना.....!

खरेतर अश्या ना लय ना छंद असलेल्या प्रकाराला "छंदमुक्त" च म्हणायला हवे......

मला ललित म्हण्णे सोप्पे वाट्ते म्हणुन ललित म्हणतोय>>> कुणाचातरी सल्ला घ्या. आपण असे म्हणू शकत नाही. साहित्य विश्वाने दोन वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना दिलेली ती नावे आहेत. त्यांची वेगळी वैशिष्ठ्यै आहेत. रचना पध्दती वेगळ्या आहेत. ललित वाचताना आलेला अनुभव किंवा वातावरण तुम्हाला मुक्तछंद वाचताना आला असेल तर दोन्हीत शब्दयोजना किंवा निर्माण होणारे वातावरण सारखे असू शकेल (तुमच्यासाठी) पण हे साहित्याचे दोन वेगळेच प्रकार असल्याने मुक्तछंद काव्याला तुम्ही ललित म्ह्णू शकत नाही. तुम्हाला फारच म्हणावे वाटले तर स्वतःशी म्हणू शकता. सार्वजनीक ठिकाणी त्या शब्दांना समाजाने वेगळी ओळख व अर्थ दिला आहे.

मुक्तछंदातली कविता : http://www.maayboli.com/node/21156

ललित : http://www.maayboli.com/node/21157

अनुभवातून्,अनुभुतीतून अथवा जाणीवेतून आलेल्या भावना छंदबद्ध शब्दांत व्यक्त करणे,म्हणजे कविता करणे. व अश्या रचनेस ''कविता'' म्हणावे असे मला वाटते.

व असा रचनाकार म्हणजे कवी होय.

आता बर्‍याच ग्राम्य्,अगम्य जाणीवा छंदबद्ध करुन पेश केल्या जातात व त्यांस कविता म्हणावे असा आग्रह धरला जातो. उदा.

सोचता क्या है कमीने कुत्ते
देखता क्या है कमीने कुत्ते

ये तो अपनीही तेरी परछाई
भौंकता क्या है कमीने कुत्ते

या रचनेस कविता म्हणावे का? छंदबद्ध आहे हे मान्य.

कवितेत्,भावना,वर्णन्,जाणीव्,अनुभुती..... यातील काहीतरी अभिव्यक्त केले असावे असे वाटते. असो.

मला असे वाटते की 'लिहीणे' ही एक संस्काररुपी प्रक्रिया आहे केवळ..... हे बेफिकीर यांचे विधान मान्य आहे.

त्यांनी दिलेले उदाहरण...... समान अर्थाच्या दोन शेरांचे ही पटले.

तश्याच प्रकारचे माझे दोन शेर आहेत...

न काही येता कसे जगावे,इथेच सारे कळून गेले
जरी न पोहावयास येते,हरेक सागर तरुन गेलो

पोहणे जरी न ज्ञात जाहले मला
जीवनात मी तरी असे तरुन

मुद्दा समान्, भिन्न अनुभव्,भिन्न काळ .... वगैरे तसंच आहे.

लांडोर ला पिसारा नसलेला मोर म्हणण्या पेक्षा लांडोर म्हणणेच सोप्पे नाही का ?

प्रगोच्या या विधानाशी सहमत आहे. मुक्तछंद गेय असेल व लयीत म्हणता येत असेल... तर त्यास कविता म्हणावेच. अन्यथा कोणतेही गद्य,'' मुक्तछंद'' या स्वरुपात लिहीता येइलच.

आपण ललित म्हणुन दिलेले साहित्य जरासे असे मांडले तर

एखादे झाड ओळखता आले नाही,...
कि मला उगाचच बैचैन व्हायला होते. ....
भारतात होतो, तोवर ठिक होते.
मोजकी असली तरी पुस्तके हाताशी होती, .....
त्यातही मोजके फोटो होते............................ निदान नाव तरी कळायचेच.

की ही मुक्तछंदातील कविता झाली ? Uhoh

(अवांतरःकुणाचातरी सल्ला घ्या>>> हे असे काहीसे बोलु नको ...तुझाच सल्ला घेतलाय ...अन स्वतःची मते स्वतः तयार करतोय ...!)

यमक, वृत्त, मात्रा, काव्यप्रकार इ. व्याकरणाच्या/ रूढ रचनाप्रकारांच्या व्याख्यांमधे किंवा नियमांमधे न बसणारा परंतू वाचणिय, काव्यमयता असणारा काव्यरचनेचा अधुनिक व मुक्त प्रकार म्हणून आपण मुक्तछंदाकडे पाहू शकतो. लयबध्दता, वाचणीयता, आशयघनता, रंजकता इ. गुणविशेष मुक्तछंदातही असतात व ते असणार्‍या कविताच कविता वाटतात.

मुक्तछंद गेय असेल व लयीत म्हणता येत असेल... तर त्यास कविता म्हणावेच. अन्यथा कोणतेही गद्य,'' मुक्तछंद'' या स्वरुपात लिहीता येइलच.
>>> या डॉ. कैलास यांच्या विधानाशी सहमत. याच विधानात प्रसादजी आपण केलेल्या मुक्तछंदाचे उत्तरही आहे. आपण लिहीलेल्या ओळींना मुक्तछंदातील कविता म्हणता येणार नाही पण म्हणून तिला ललित म्हणायचे असे नाही. कारण लिहीली जाताना ती कविता म्हणून लिहीली गेली. याचाच अर्थ आपण त्याला फसलेली/न जमलेली/निकृष्ट कविता म्हणू शकता. पण ती मुक्तछंदातील कविता ललित आहे असे म्हणू शकत नाही. अर्थात चेष्टेने जरूर म्हणू शकता.

आपण ललित म्हणुन दिलेले साहित्य जरासे असे मांडले तर

एखादे झाड ओळखता आले नाही,...
कि मला उगाचच बैचैन व्हायला होते. ....
भारतात होतो, तोवर ठिक होते.
मोजकी असली तरी पुस्तके हाताशी होती, .....
त्यातही मोजके फोटो होते............................ निदान नाव तरी कळायचेच.

की ही मुक्तछंदातील कविता झाली >>>>

प्रसादरावांना अनुमोदन!

अन्यथा कोणतेही गद्य,'' मुक्तछंद'' या स्वरुपात लिहीता येइलच>>>

कैलासरावांना अनुमोदन!

लयबध्दता, वाचणीयता, आशयघनता, रंजकता इ. गुणविशेष मुक्तछंदातही असतात व ते असणार्‍या कविताच कविता वाटतात>>>

हणमंतराव,

मला दोन मुद्दे मांडायचे आहेत.

१. मुक्तछंदाला लय कशी असेल? उदाहरण असल्यास कृपया द्यावे.

२. गद्य लेखनात जर आशयघनता, रंजकता व वाचनीयता असेल तर तोही मुक्तछंद का म्हणला जाऊ नये?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

असो तर एकुणच मुक्तछंद ला कविता म्हणावे का ...हा प्रश्ण कश्मिर प्रश्णा सारखा अवघड आहे ...

तर परत मुळ प्रश्णा कडे ...कविता म्हणजे काय ...कवी म्हणजे काय ???

प्रसादराव,

कवी व कविता म्हणजे काय या चर्चेमध्ये जर 'मुक्तछंदात कविता असू शकते' असा मुद्दा निघाला तर मुक्तछंद या विषयावरही चर्चा होणे साहजिक आहे असे मला वाटते.

Pages