"वहिनी आटपली की नाही पूजा, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अयोध्यानगरी अजून बरीच योजने
दूर आहे." लक्ष्मणाने अधीरतेने विचारले.
सीतेने काही उत्तर द्यायच्या आधीच श्रीराम म्हणाले, " चौदा वर्षांपूर्वी याच मंडळींनी साश्रु नयनांनी, आपल्याला याच नदीतीरावरुन निरोप दिला होता. त्या काळापासून आपल्या प्रतिक्षेत आहेत हि मंडळी. मला वाटतं, आज आपण, इथेच थांबूया. उद्या प्रात:काळीच प्रस्थान करु."
तेवढ्यात सीता म्हणाली, " नाथ. अयोध्यानगरी आपल्या स्वागताला अधीर झालीय, आणि लक्ष्मणभावजी पण अयोध्येला जायला अधीर झालेत. हे लोक आनंदोत्सव साजरा करणार आहेत, आज रात्री. म्हणून थांबा असे म्हणताहेत. पण मी सांगते त्यांना. आपण निघू या, तत्पर."
"नाही वहिनी आपण थांबू या. आज अंधार पडायच्या आत, अयोध्यानगरी गाठता येणार नाहीच." लक्ष्मण म्हणाला.
रात्रभर विश्राम करायचा ठरल्यावर, मारुतीने तत्परतेने पर्णकुट्या उभारल्या.
आनंदोत्सवाची सांगता होईपर्यंत रात्रीचे २ प्रहर उलटून गेले. श्रीराम व सीता निवासाकडे आले, तर मारुती तिथेच बाहेर तिष्ठत उभा राहिलेला दिसला.
सीतेला त्याची अनुकंपा वाटली, ती म्हणाली, " मारुतीराया वनवास संपला. इथे आम्हाला कुणाचेच भय नाही. किती श्रमला आहेस. विश्राम कर बघू."
मारुती उत्तरला, "माई श्रमतो कशाने ? आत्ता म्हणाल तर तूम्हा दोघांना खांद्यावर बसवून, अयोध्या नगरीस नेतो."
श्रीराम म्हणाले, "सीते तो तूझे ऐकणार नाही. मीच आज्ञा करतो. मारुतीराया जा बरं. आणि भरताचा निरोप आलाय, रथ, घोडे पाठवणार आहे तो. त्यामूळे उदयीक आन्हिके आटपून निघता येईल आपल्याला."
मारुती नाईलाजानेच आपल्या विश्रामस्थानी निघून गेला.
***
दिवस उजाडताच तुतार्यांचे आवाज आणि हत्तींचे चीत्कार कानी पडू लागले. चार सुवर्णरथ घेऊन भरत आणि शत्रुघ्न स्वत: त्यांच्या जेष्ठ बंधूंना न्यायला आले होते. आल्या आल्या त्यांनी श्रीराम, सीता व लक्ष्मणास वंदन केले. त्यात वरचेवर उचलून रामलक्ष्मणांने आलिगंन दिले.
"दादा आता आणखी किती काळ मी भार वाहू ?. तुझा अधिकार ग्रहण कर आता." भरत अधीरतेने बोलला.
रामाने नुसतेच स्मित केले. शत्रुघ्नाने रामलक्ष्मणासाठी राजवस्त्रे आणली होती. सीतेसाठी पण आणली होती.
दासींनी सीतेचा ताबा घेतला.
तब्बल १४ वर्षांनी सीता वल्कलांचा त्याग करत होती. त्या जाड्याभरड्या वल्कलांची तिला सवय झाली होती.
स्वत: नदीवरुन पाणी आणायचे, रानातून फळे कंदमूळे शोधून आणायची, भोजनसिद्धता करायची.
आणि मग रानपक्ष्यांचे कूजन ऐकत, शावकांशी क्रिडा करत, तिचा दिवस कसा जायचा ते कळायचेच नाही.
रोज तिचा साजशृंगार करुन देण्यासाठीच जणू रानातील वेली फ़ूलत होत्या. एकदा तर श्रीराम म्हणालेही होते, कि ती एखाद्या वनकन्येप्रमाणे दिसते म्हणून. खरेच त्या दिवसांचे तिला पुन्हा आकर्षण वाटू लागले होते.
राजवस्त्रे, अलंकार चढवताना तर ते तिला जाचू लागले. तलम गर्भरेशमी वस्त्रे, रत्ने, मोत्ये जडवलेले अलंकार जडशीळ वाटू लागले होते.
आपल्या अलंकारांपैकी काहि निवडक अलंकार, श्रीरामाने मारुतीस दिले. तो तर अगदी संकोचून गेला. पण
प्रत्यक्ष त्याच्या प्रभूची आज्ञा त्याला मोडताही येणार नव्ह्ती.
श्रीराम आणि सीता प्रस्थान करू लागल्यावर, तिथल्या जनसामान्यांनी त्या उभयतांची वाट अडवली. त्या
दोघांना देण्यासाठी त्यांनी मधाचे बुधले, अप्रतिम चवीची कंदमुळे व फळे, उत्तम गायन करणारे पक्षी,
हस्तीदंत, मृगजीनं यांचे भारे आणले होते.
सीतेला ती मृगजीनं बघून, नको ते प्रसंग आठवले. त्यातल्या अनेक वस्तू तिने, स्वत:ची आठवण म्हणून
तिथल्या स्त्रिया आणि बालकांना परत केल्या.
खरे तर मारुतीला, श्रीरामाच्या रथासोबत पायीच चालायचे होते. पण श्रीरामाने त्याला अनुमती दिली नाही.
त्याला बळेच लक्ष्मणासोबत रथात बसावयास लावले. तो अर्थातच हिरमुसला.
सर्वात पुढे भरत आणि शत्रुघ्न यांचा रथ, मग श्रीराम व सीता, त्यामागे लक्ष्मण व मारुती व मागे
अधिकारीवर्ग असे रथ मार्गस्थ झाले. सोबत अनेक घोडेस्वार, हत्ती होते, शिवाय श्रीरामाचा जयजयकार करत अनेक सामान्यजन सोबत होते.
सूर्य आता तळपू लागला होता. सेवकांनी श्रीरामाच्या रथाला चहूबाजूंनी पडदे सोडले, अजून अयोध्या गाठायला बराच अवधी होता. "सीते, मारुतीने माझी सावलीसारखी सोबत केली. त्याला दुसर्या रथात पाठवायला नको होते."
"नाथ, नाहीतरी माझा सहवास आपल्याला नव्हताच ना. आणि आता तर काय, आपण अयोध्येचे चक्रवर्ती राजे होणार. एखाद्या बटीक दासीसारखीच माझी गत होईल." सीता लटक्या रागाने म्हणाली.
" सीते, कर्त्यव्ये कुणाला चुकली आहेत का ? तूझ्याबरोबर वनवासाला निघालो, तेही कर्तव्य आणि आता
राज्यकारभार करणार तेही कर्तव्यच." श्रीराम उत्तरले.
"नाथ, सत्य सांगा. ते वनातील जीवन तूम्हालाही प्रिय होते ना ? राजवाड्यात आपल्याला कधी इतका
एकमेकांचा सहवास घडताच ना ? एखाद्या सामान्य पतिपत्नीप्रमाणे आपण राहिलो." सीतेने अधीरतेने विचारले.
श्रीराम, केवळ मंद स्मित करते झाले.
"नाथ खरेच, एवढा मोकळेपणा मला माहेरी पण कधी लाभला नाही. मी कायम सखी दासींच्या घोळक्यात
असे. मला शस्त्रास्त्रे चालवण्यात आनंद मिळत असे. बाबांनी खास मला शिकवण्यासाठी अनेक गुरुंची योजना केली होती. वाटे वनात जावे, श्वापदांची शिकार करावी, राक्षसांचा नाश करावा." सीता बोलली.
"मग रावणाला हरण कसे करता आले. माझ्या प्रिय पत्नीचे ?" श्रीरामांनी खट्याळपणे विचारले.
"नाथ, आपण जाणता. रावणाचा वध करणे मला कठीण नव्हते. एक पतिकर्तव्य म्हणून आपण मला
घेऊन जावे. अशी एक सामान्य पत्नी म्हणून मी अपेक्षा केली, तर काहि चुकले का माझे ?" सीतेने विचारले.
"बघ प्रिये, आता तूच मला कर्त्यव्यांची जाणीव करुन देऊ लागली आहेस." श्रीराम उत्तरले.
तेवढ्यात बाहेरुन आनंदाचे चीत्कार येऊ लागले. श्रीरामांनी त्वरेने रथाचे पडदे दूर केले. अयोध्येचे नगरजन वेस ओलांडून श्रीरामांच्या स्वागतासाठी आले होते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
श्रीरामांवर फुले, अक्षता उधळल्या जात होत्या. हवेत अबीर, गुलाल भरुन राहिले होते. म्हातार्याकोतार्या त्या दोघांकडे बघत कानावर बोटे मोडत होत्या.
अयोध्या नगरीची वेस ओलांडल्यावर तर रथ तसूभर पुढे सरकणे अशक्य झाले. पथभर रांगोळ्या काढण्यात
आल्या होत्या. गुढ्या पताकांनी निवास सजले होते. अयोध्यावासी आनंदाने बेभान होऊन नाचत होते.
ज्या लहान बालकांनी श्रीरामांना कधी बघितलेही नव्हते, ती एखादा स्वर्गीय देवच बघावा, तसे बघत होते.
तान्ह्या बाळांना, माता श्रीरामाच्या चरणी ठेवू बघत होत्या. केवळ श्रीरामांचे दर्शन व्हावे म्हणून मृत्यूला
थोपवून राहिलेले वृद्ध, सुटकेचा निश्वास सोडत होते. तरुण तरुणी श्रीरामांकडे आशेने बघत होते.
दोन प्रहरानंतर सर्व रथ राजप्रासादी पोहोचले. कैकयीमाता, सुमित्रामाता आणि कौसल्यामाता डोळ्यात
प्राण आणून त्यांची वाट बघत होत्या. श्रीरामांनी सर्वप्रथम कैकयीमातेस वंदन केले. कैकयीला अश्रू
आवरेनात. "माझ्या बाळा, किती रे सोसलेस ?", असे म्हणत त्यांनी श्रीरामांना दृढ आलिंगन दिले. त्यानंतर अर्थातच सुमित्रामाता आणि कौसल्यामाता यांनी श्रीरामांना आलिंगन दिले.
अत्यंत कृश झालेली, उर्मिला पंचारती घेऊन सामोरी आली. त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातील भाव,
सीतेच्या नजरेने, अचूक टिपले. श्रीरामांनी मारुतीरायाचा परिचय करुन दिला. त्याच्या पराक्रमाच्या
वार्ता आयोद्धेपर्यंत आल्याच होत्या.
उर्मिलेने सीतेच्या भाळी. सौभाग्याचा कुंकुमतिलक लावला व तिला दृढ आलिंगन दिले, व म्हणाली,
"ताई, का गं तूला वनवास घडावा ?"
"उर्मिले, खरा वनवास तू भोगलास. वनी मी नाथांसोबत होते. तू इथे एकलेपणाच्या आगीत जळत
होतीस. आता जा बरं प्रासादी. मी भावोजींना पाठवून देते." सीता म्हणाली.
मारुतीराया हे सगळे अबोलपणे बघत होता. असा लोकप्रिय राजा, त्याने कधी बघितलाच नव्हता.
आजन्म, श्रीरामांची सेवा करायची, असे त्याने न जाणे, कितव्यांदा ठरवले. एक क्षणसुद्धा तो
श्रीरामांना आपल्या नजरेपासून दूर होऊ देत नव्हता.
भरतांने त्यांना क्षणभर उसंत मिळू न देता, राजदरबारी चलण्याची विनंती केली. कधी एकदा
दादाच्या समर्थ हाती राज्यकारभार देतोय, असे त्याला झाले होते.
राजदरबारी सर्व कारभारी त्यांच्या लाडक्या राजाची वाटच बघत होते. सिंहासनावरील पादुका
भरताने उचलून स्वत:च्या माथ्यावर ठेवल्या, आणि मग उत्तरियाने पुसून श्रीरामांच्या पायात
चढवल्या. त्यांच्या माथ्यावर रत्नजडीत मुकुट ठेवला, आणि उच्चरवात गर्जना केली, "श्रीरामांचा
विजय असो." सर्व दरबारी त्या गर्जनेत सामिल झाले.
राज्यातील सर्व कारागीर, आपल्या कलेचे उत्तमोत्तम नमूने श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यासाठी
घेऊन आले होते. कुणी शेला, तर कुणी पितांबर. कुंणी कंठा तर कुणी कमरबंद. कुणी धनुष्य
तर कुणी सुवर्णांनी घडवलेले बाण घेऊन आले होते.
अयोध्या नगरीतील जेष्ठ सुवर्णकार, अत्यंत दुर्मिळ रत्नांनी घडवलेला, रत्नहार घेऊन आले होते.
त्या रत्नहाराचे तेज इतके होते कि त्यावर नजर ठरत नव्हती. श्रीरामांनी तो हार हातात घेऊन
न्याहाळला, आणि तो सस्मित नजरेने, शेजारी स्थानापन्न झालेल्या, सीतेस दिला.
स्त्रीसुलभ नजरेने सीतेने तो कौतूकाने न्याहाळला.आणि क्षणांत त्याचा मोह तिने त्यागला.
त्यांच्या पायाशी विनयाने बसलेल्या मारुतीला तिने तो देऊन टाकला.
कालांतराने दरबारातील लोक पांगले. केवळ निकटवर्तीयच उरले. पंचपक्वानांच्या भोजनाची
सिद्धता झाली होती. कौसल्यामातेने स्वत: अपूप केले होते. थरथरत्या हातांनी, त्यांनी ते
श्रीरामांना भरवले.
श्रीरामांनी स्वत: मारुतीसाठी एक महाल सिद्ध करण्याची आज्ञा दिली. तिथे जाण्यापूर्वी
प्रभूंना वंदन करण्यासाठी तो आला. त्यावेळी सीतेचे सहज लक्ष गेले, तर त्याच्या कंठी
तो रत्नहार नव्हता. नीट बघितल्यावर तिला दिसले कि त्याने, त्यातली रत्ने फ़ोडली आहेत.
"मारुतीराया, हार आवडला नाही का ?" तिने विचारले.
"माई, ज्यात माझे प्रभू वास करत नाहीत, अशी कुठलीच गोष्ट मला आवडत नाही."
मारुती उत्तरला.
"म्हणून ती रत्ने फ़ोडलीस कि काय ?" तिने विचारले.
तो खालमानेने तसाच ऊभा राहिला.
"आज आनंदाचा दिवस आहे. आज सर्वजण तृप्त आहेत. आज तू काहीही मागणी कर."
सीता म्हणाली.
"माई मला जे प्राणप्रिय, ते आपल्यालाही प्राणप्रिय. मी मागू तरी काय ?" मारुती उत्तरला.
सीतेने केवळ क्षणभरच विचार केला. आपल्या भाळावरील कुंकुमतिलकातील काहि भाग
काढून तिने मारुतीच्या भाळावर टेकवला.
"मारुतीराया, मी अगदी तृप्त आहे. नाथांसारखा पति, जनकांसारखा पिता, लक्षमणभावोजींसारखा
पाठराखा बंधू मला लाभला. पण माझ्या आयूष्यात एकच न्यून राहिले. मला अजून पूत्रलाभ
झाला नाही. मला कधीकाळी पूत्र झाला, तर तो तूझ्यासारखा बलवान, पराक्रमी, विनयशील
हवा. आजपासून तू माझा मानसपूत्रच झाला आहेस." सीता मनापासून म्हणाली.
तत्परतेने खाली वाकत, तिचा चरणस्पर्श करत तो म्हणाला, "माते, यापे़क्षा तृप्त करणारे काय असू शकते ?"
"चिरंजीव भव." सीतेने आशिर्वाद दिला.
*****
मूळ कल्पना : गुजराथी लोककथेतून.
छान लिहीलंय दिनेशदा
छान लिहीलंय दिनेशदा
यानिमित्ताने कथालेखनाला पु
यानिमित्ताने कथालेखनाला पु न्हा सुरवात करा. नाहीतर आपले झाड्पाल्यांबद्दल लिहित असतात!
खरय सध्या कसदार लेखनाची माबो
खरय सध्या कसदार लेखनाची माबो ला फार फार गरज आहे.
दिनेशदा, प्रामाणिक प्रतिसाद
दिनेशदा, प्रामाणिक प्रतिसाद देतेय. राईट स्पिरिटमधे घ्यावे
एक कथा म्हणून विस्कळीत वाटली. लोककथेवर आधारित म्हटली तरी त्याला योग्य संदर्भ असावेत अशी अपेक्षा होती. काही खटकलेल्या गोष्टी खाली देत आहे.....
"नाथ, नाहीतरी माझा सहवास आपल्याला नव्हताच ना. आणि आता तर काय, आपण अयोध्येचे चक्रवर्ती राजे होणार. एखाद्या बटीक दासीसारखीच माझी गत होईल." सीता लटक्या रागाने म्हणाली.
>>> कैच्याकै. असलं काही बोलायला ती काय सामान्य स्त्री आहे? लोककथा म्हणजे एखाद्या समाजात जे बोललं, वागलं जातं त्याला पौराणिक पात्रांची नावं दिली की अजूनच कैच्याकै वाटते. त्यापेक्षा रामलीला, मेळे वगैरेमधे मूळ कथेला अनुसरुन (कैच्याकै डिव्हिएशन्स टाळून) सादर केली तर जास्त भावते. हे म्हणजे, "आता काय बुवा, तुम्हाला प्रमोशन मिळालं! आधिच मला काही किंमत नव्हती, आता मी घरची अजून मोलकरीण होणार" अशा टाईपचं वाटतंय.
नाथ, आपण जाणता. रावणाचा वध करणे मला कठीण नव्हते. एक पतिकर्तव्य म्हणून आपण मला
घेऊन जावे. अशी एक सामान्य पत्नी म्हणून मी अपेक्षा केली, तर काहि चुकले का माझे ?" सीतेने विचारले.
>>>> रावणवध हे सीतेचे कार्यच नव्हते. सीताहरण हे रावणाच्या वधाचे निमित्त होते. ते सीतेचे कार्य असते तर तिने काय रावणाला साधूवेषात आला तरी ओळखून तिथल्या तिथेच मारले असते किंवा चार फटके देऊन पळवून लावले असते. सीताहरण होऊन श्री राम लंकेपर्यंत जाऊन पोहोचणे आवश्यक होते. त्याआधी हनुमंताने लंका जाळली (हे त्याचे कार्य होते). श्रीरामांनी देखिल आपल्या दैवीशक्तीचा वापर मुद्दाम नाही केला कारण रावणाला वरदान होते की तो देव किंवा दानवाकडून वधला जाणार नाही. त्यामुळे पुर्ण मानवी आचरण करुनच रावणाला मारण्यासाठी राम, सीता व लक्ष्मण या परमात्मत्रयीने विरह सोसला, वेदना सोसल्या, प्रसंगी शिवाच्या गळ्यातील नागाचा स्पर्श झालेल्या सर्पास्त्राचा मान राखण्यासाठी स्वतःला सर्पास्त्राने बांधू दिलं.
पण माझ्या आयूष्यात एकच न्यून राहिले. मला अजून पूत्रलाभ
झाला नाही. मला कधीकाळी पूत्र झाला >>>>> हे काही झेपले नाही. ती परमात्मत्रयीतली 'शक्ती' ही असली वाक्ये बोलूच शकत नाही. हे सगळं खेड्यातील किंवा शहरातील देखिल एखाद्या अडाणी बाईने म्हणावे असे वाटतेय. मानसपुत्र वगैरे बरोबर आहे कारण त्या दासोत्तम अवतारामुळे तो तिला पुत्रासमानच होता परंतु सुंदरकाण्डात हनुमंतांना 'तात्'ही म्हटले आहे कारण अंजनीमातेने दत्तगुरुंची तपश्चर्या केल्यावर दत्तगुरुंनी त्यांचा आत्मरुपी प्रकाश परमशिवाच्या माध्यमातून तिने मिळवलेल्या ३ वरांच्या एकत्रित पुर्ततेसाठी तिच्या पोटी स्थापन केला.
धाडकन खाली पडत, तिचा चरणस्पर्श करत >>>> भयानक वाक्यरचना. 'धाडकन खाली पडत' हे वाचल्यावर आधी हनुमंतांना एकाएका धाडकन खाली पडायला काय झालं? असं वाटतं आणि पुढे उलगडा होतो.
तुमच्या बाकीच्या काही क्षेत्रांमधील ज्ञानाबद्दल वादच नाहिये पण इथे मात्र कुछ जम्या नही.
ही एक वेगळीच कथा वाचायला
ही एक वेगळीच कथा वाचायला मिळाली. दिनेश खूप छान लिहली आहेत तुम्ही.
मला स्वता:ला पौराणिक कथा खूप आवडतात. त्यांचा एक वेगळाच माहोल असतो. बासुरीच्या पौराणिक कथा मी खरोखरीच मिस करते. आशा करते कि ती पुन्हा लिहू लागेल.
सीतेचे हरण झाल्यानंतरच राम
सीतेचे हरण झाल्यानंतरच राम आणि मारुती यांची भेट झाली.
त्यामूळे रामाच्या मनात मारुतीचे काय स्थान आहे, हे तिला माहित नव्हते.
तिची आणि मारुतीची पहिली भेट, अशोकवनात झाली. त्यावेळी तिला त्याची भिती वाटली होती.
शिवाय तिने त्याच्याबरोबर येण्यास नकार झाला होता.त्यामूळे त्याच्या मनातही तिच्याबद्दल किंचीत अढी.
युद्ध संपल्यावरच ते सर्व एकत्र आले. रामाच्या बाबतीत दोघांच्या मनात मालकीहक्काची भावना होती.
पण मूळातच विनयशील असल्याने, ते दोघे एकत्र आल्यावर, मारुती बाजूला झाला.
>> हे स्पष्टीकरण काही पटले नाही. रामाबद्दलची मारुतीची भावना ही एका पत्नीच्या भावनेशी कॉम्पिटंग कशी असू शकते ? सीता अन मारुती या दोघांना रामाच्या आयुष्यात एकदम स्थान असु शकत नाही का ? रामाचे सीतेशी असलेले नाते थोर अन मारुतीशी असलेले नाते कमी दर्जाचे असे का असावे ?
या गोष्टीतून सीतेचे अन हनुमानाचे नाते अधिक गहिरे, सौहार्द्पूर्ण झाल्याचे दाखवयाचे असावे .पण एकाने बाजूला व्हावे असे त्या दोघांचे नाते नव्हते, नसावे .
के अश्विनी, स्पष्ट
के अश्विनी, स्पष्ट प्रतिक्रिया आवडली.
..पण पटली नाही. लोककथांत या व्यक्तीरेखा सामान्य माणसे म्हणूनच येतात. तूम्ही जांभूळआख्यानाबद्दल ऐकले असेलच. द्रोपदीला कर्णाचे आकर्षण वाटले, अशी भन्नाट कल्पना आहे त्यात. मी वर जी ओवी दिलीय, ती केवळ एक सामान्य स्त्रीच म्हणू शकते. रामाला देवत्व दिल्यावर, त्याच्याबद्दल असे कोण म्हणू धजेल ?
सीतेने राजवाड्यात राहण्यास, बाकिच्या स्त्रीयांचा विरोध होता, असेही रामायणाच्या एका रुपात वाचलेय. तिला खचितच राजवाड्यात गौण वागणूक मिळाली असणार. ती जनकाची कन्या नाही, हे सत्य रामाच्या घरी नक्कीच माहीत होते. (उर्मिला जनकाचीच मुलगी होती. किंवा त्या कुटुंबातली होती. भरत आणि शत्रुघ्नाच्या बायकाही, त्याच घराण्यातल्या होत्या. ) आणि पुढच्या घटनांत, तिचे काय स्थान होते ते कळतेच. तिला राजवाड्यात परत जायचे नव्हते, असे सूचवणारी काही गीतेही आहेत. (मी पुन्हा फिरेन वनांतरी हरीणीवाणी, ओठात घोळवीन रामप्रितीची गाणी... )
ललिता पंचमीला तिचे एक पराक्रमी रुप पूजतात. त्या रुपात तिने शताननाचा (रावणापेक्षाही बलशाली) वध केला होता. त्याचा वध करण्याचे सामर्थ्य रामाकडे नव्हते. आणि ती झोपलेली असताना, मारुतीने तिला उचलून आणले. त्याचा वध करुन, त्याची शिरं हातात घेऊन ती खेळली, असा संदर्भ आहे तो.
ते काहिही असले तरी ती शस्त्रे चालवण्यात निपुण होती. जे शिवधनुष्य रावणाला पेलले नाही, त्याच्याशी ती लहानपणी खेळत होती हा संदर्भ आहेच कि.
सीतेला एक सामान्य स्त्री म्हणून कल्पून बघा, मग तिच्या या भावना, सहज असू शकतात.
मी ज्यावेळी हि लोककथा ऐकली, त्यावेळी मला तो संदर्भ खूपच आवडला. वडारणी जसा सीतेला आपला आदर्श मानतात, तशीच आपलेपणाची, हि भावना वाटली मला. (आता अशा अनेक लोककथा माझ्या संग्रही आहेत. त्यात राधाकृष्णाची पण एक सुंदर कथा आहे. तीपण मांडायचा विचार होता. कदाचित विचार बदलावा लागेल.)
रामायण, महाभारत या काव्यातील चमत्कारांचा भाग टाळून, त्यांच्याकडे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून बघणारी अनेक पुस्तके आहेत. ती वास्तवाच्या आणि कदाचित ऐतिहासिक सत्याच्या पण जास्त जवळची वाटतात. धार्मिक वा भावनिक नजरेतून वाचल्यावर ती कदाचित पटणारही नाहीत, पण मला स्वतःला, मी रुढ अर्थाने भाविक वा आस्तिक नसल्याने, तो दृष्टिकोन पटतो आणि आवडतोही. (पण प्रत्येकाला ती आवडावीत वा पटावीत, असे नाही.)
धाडकन, हा शब्द चुकला हे मला मान्य आहे.
आणि शेवटचे वाक्य, मात्र अजिबात पटले नाही.
मेधा, रामाच्या मनात सीतेचे
मेधा,
रामाच्या मनात सीतेचे काय स्थान होते, त्या संदर्भात मी इथे पुर्वी भरपूर वाद घातलाय.
आणि मला पटेल असे उत्तर कुणीच दिले नाही. त्यामूळे त्या वादात परत मला पडायचे नाही.
(आता अशा अनेक लोककथा माझ्या
(आता अशा अनेक लोककथा माझ्या संग्रही आहेत. त्यात राधाकृष्णाची पण एक सुंदर कथा आहे. तीपण मांडायचा विचार होता. कदाचित विचार बदलावा लागेल.)
का ते? कमालच आहे. अहो टाका ना. तुमची ही कथा आवडणारे खूप जण आहेत की.
मी सिता ही एक स्त्री, (दैवी व्यक्ती वा राणी नव्हे) म्हणून अभिप्रेत केली आणि मग तुमची कथा मला छान पटली. असो. तुमची मर्जी!
ते काहिही असले तरी ती शस्त्रे
ते काहिही असले तरी ती शस्त्रे चालवण्यात निपुण होती. जे शिवधनुष्य रावणाला पेलले नाही, त्याच्याशी ती लहानपणी खेळत होती हा संदर्भ आहेच कि.
>>> ती तेजस्वी होतीच की. साक्षात लक्ष्मी आहे ती. परंतु तिचे रावणाला मारण्याचे कार्य नव्हते
सीतेला एक सामान्य स्त्री म्हणून कल्पून बघा, >>> तेच तर सत्य नसल्याने जमत नाहिये ना !
लोककथा जरुर मांडा, फक्त त्या मूळ काव्य, ग्रंथाला धरुन असल्या तर जास्त चांगलं वाटेल. या कथेबद्दल मी जे जाणवलं ते लिहिलं एवढंच. बाकी लेखक म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आहेच.
दिनिशदा, कथा आवडली. तुमच्या
दिनिशदा, कथा आवडली. तुमच्या संग्रही असलेल्या इतरही कथा वाचायला नक्किच आवडेल.
कथा आवडली. पुढची राधा
कथा आवडली.
पुढची राधा कृष्णाची कथा पण जरुर लिहा.
वरच्या प्रतिसादासाठी दिनेशदांना अनुमोदन.
प्रत्यक्ष रामायणातल्या कथेपेक्षा मला या लोककथा वाचायला जास्त मजा येते. याहुन ही वेगवेगळ्या , अतिशय आश्चर्य वाटायला लावणार्या लोककथा मी दुर्गाबाई भागवतांच्या लोककथांच्या पुस्तकात वाचल्या होत्या.
एका (बहुतेक उत्तरप्रदेशातल्या ) लोककथेत तर रावण रामाला मारतो आणि नंतर सीतेचे लक्ष्मणाबरोबर लग्न होते , असे पण होते. ( या कथा अगदी लहानपणी वाचल्या होत्या. कोणाच्या भावना दुखावयचा हेतु नाही. परंतु अतिशय वेगळे म्हणुन लिहीले आणि लक्षात राहीले होते. वाद नको , हलकेच घ्या )
ती तेजस्वी होतीच की. साक्षात
ती तेजस्वी होतीच की. साक्षात लक्ष्मी आहे ती.>>>> हे सगळे असले तरी किंवा मानले तरि यांचा जन्म मन्य्ष्यरुपा तच होता.त्यामुळे मनुष्याचे सगळेच गुणदोष त्यांच्याठायी असणारच. अन्यथा गरजच काय होती सीतेला हरणाच्या कातड्याचीच चोळी हवी म्हणून रामाच्या मागे लागायची? हेही "आता काय बुवा, तुम्हाला प्रमोशन मिळालं! आधिच मला काही किंमत नव्हती, आता मी घरची अजून मोलकरीण होणार" अश्याच टायपाचा हट्ट होताच की!
तुमच्या बाकीच्या काही क्षेत्रांमधील ज्ञानाबद्दल वादच नाहिये पण इथे मात्र कुछ जम्या नही.>>> यबद्दल सांगायचं तर दिनेश्च्या कथाच मायबोलीला आधी माहीत होत्या. ज्या मायबोलीप्रिय होत्याच. नंतर त्यांनी दिनेश्दांच्या रुपात ललित लिखाण बंद करून बाकीसगळे लिहायला सुरवात केली.
ही कथा मलाही यांच्या पूर्वीच्या कथांईतकी आवडली नाही म्हणूनच मी म्हटले की पुन्हा लिहायला लागलाच आहात तर लिहित रहा. म्हणजे विसरलेली कला पुन्हा बहरत जाईल!
वेगळीच सुंदर कथा. तुमचं ललित
वेगळीच सुंदर कथा. तुमचं ललित लेखन मी पहिल्यांदाच वाचतेय.
के अश्विनी, समजून
के अश्विनी,
समजून घेतल्याबद्दल आभार. आपल्या श्रद्धास्थानाना धक्का द्यायचा अजिबात हेतू नव्हता. पण या व्यक्तीरेखांचे मानवी पातळीवरचे चित्रणच मला जास्त भावते.
डेलिया
हे लोककथांचे विश्व खरेच कल्पनारम्य आहे. रामायणातल्या न पटणार्या घटनांचे त्यात पटतील असे अर्थ सापडतात.
शिवाय रामायणातील त्रासदायक घटना (उदा.रावणाने लक्ष्मणाला दिलेले राजनीतीचे धडे, रामाने केलेला लक्ष्मणाचा वध, रामाने केलेली आत्महत्या) कायम गाळल्या जातात. दुर्गाबांईना असे अनेक धक्कादायक संदर्भ सापडले होते.
कल्पू
ती राधाकृष्णाची कथा पण लिहून बघतो.
गिर्या
मी अजून तोच आहे रे.
तूला आठवताहेत त्या कथा अजून ? पण त्या काळातले वाचक आता उरले नाहीत. आता तशा कथा कितपत वाचल्या जातील याची शंकाच वाटते. कदाचित त्याच कथा इथे पोष्टून, येणारे प्रतिसाद बघतो, आणि मग ठरवतो.
झाडाफूलातच जास्त रमलोय आता, कारण आताशा नवीन माणसे भेटत नाहीत, झाडे फूले मात्र भेटताहेत.
दिनेशदा काही वाद वगळता कथा
दिनेशदा काही वाद वगळता कथा आवडली.
गिरीराज, << अन्यथा गरजच काय
गिरीराज,
<< अन्यथा गरजच काय होती सीतेला हरणाच्या कातड्याचीच चोळी हवी म्हणून रामाच्या मागे लागायची? हेही "आता काय बुवा, तुम्हाला प्रमोशन मिळालं! आधिच मला काही किंमत नव्हती, आता मी घरची अजून मोलकरीण होणार" अश्याच टायपाचा हट्ट होताच की! >>
शंभर टक्के पटलं !!
दिनेशदा, राधा-कृष्णाची कथा लवकर पोस्टा.:)
दिनेशदा, छान लिहिलय.पुढच्या
दिनेशदा,
छान लिहिलय.पुढच्या कथेची वाट बघतेय.
>> तूला आठवताहेत त्या कथा
>> तूला आठवताहेत त्या कथा अजून ? पण त्या काळातले वाचक आता उरले नाहीत.
आहेत हो अजुन आहेत ते वाचक.
दिनेश -
ही कथा सुद्धा तेवधीच आवडली..... लिहीत राहा....
कथा आवडली. त्यावरचे प्रतिसाद
कथा आवडली. त्यावरचे प्रतिसाद सुद्धा वाचनीय.
दिनेशदा तुमची प्रतिक्रिया पटली.
बाकीच्या कथांची वाट बघतेय
लेखन आवडलं दिनेशदा
लेखन आवडलं दिनेशदा
Pages