"वहिनी आटपली की नाही पूजा, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अयोध्यानगरी अजून बरीच योजने
दूर आहे." लक्ष्मणाने अधीरतेने विचारले.
सीतेने काही उत्तर द्यायच्या आधीच श्रीराम म्हणाले, " चौदा वर्षांपूर्वी याच मंडळींनी साश्रु नयनांनी, आपल्याला याच नदीतीरावरुन निरोप दिला होता. त्या काळापासून आपल्या प्रतिक्षेत आहेत हि मंडळी. मला वाटतं, आज आपण, इथेच थांबूया. उद्या प्रात:काळीच प्रस्थान करु."
तेवढ्यात सीता म्हणाली, " नाथ. अयोध्यानगरी आपल्या स्वागताला अधीर झालीय, आणि लक्ष्मणभावजी पण अयोध्येला जायला अधीर झालेत. हे लोक आनंदोत्सव साजरा करणार आहेत, आज रात्री. म्हणून थांबा असे म्हणताहेत. पण मी सांगते त्यांना. आपण निघू या, तत्पर."
"नाही वहिनी आपण थांबू या. आज अंधार पडायच्या आत, अयोध्यानगरी गाठता येणार नाहीच." लक्ष्मण म्हणाला.
रात्रभर विश्राम करायचा ठरल्यावर, मारुतीने तत्परतेने पर्णकुट्या उभारल्या.
आनंदोत्सवाची सांगता होईपर्यंत रात्रीचे २ प्रहर उलटून गेले. श्रीराम व सीता निवासाकडे आले, तर मारुती तिथेच बाहेर तिष्ठत उभा राहिलेला दिसला.
सीतेला त्याची अनुकंपा वाटली, ती म्हणाली, " मारुतीराया वनवास संपला. इथे आम्हाला कुणाचेच भय नाही. किती श्रमला आहेस. विश्राम कर बघू."
मारुती उत्तरला, "माई श्रमतो कशाने ? आत्ता म्हणाल तर तूम्हा दोघांना खांद्यावर बसवून, अयोध्या नगरीस नेतो."
श्रीराम म्हणाले, "सीते तो तूझे ऐकणार नाही. मीच आज्ञा करतो. मारुतीराया जा बरं. आणि भरताचा निरोप आलाय, रथ, घोडे पाठवणार आहे तो. त्यामूळे उदयीक आन्हिके आटपून निघता येईल आपल्याला."
मारुती नाईलाजानेच आपल्या विश्रामस्थानी निघून गेला.
***
दिवस उजाडताच तुतार्यांचे आवाज आणि हत्तींचे चीत्कार कानी पडू लागले. चार सुवर्णरथ घेऊन भरत आणि शत्रुघ्न स्वत: त्यांच्या जेष्ठ बंधूंना न्यायला आले होते. आल्या आल्या त्यांनी श्रीराम, सीता व लक्ष्मणास वंदन केले. त्यात वरचेवर उचलून रामलक्ष्मणांने आलिगंन दिले.
"दादा आता आणखी किती काळ मी भार वाहू ?. तुझा अधिकार ग्रहण कर आता." भरत अधीरतेने बोलला.
रामाने नुसतेच स्मित केले. शत्रुघ्नाने रामलक्ष्मणासाठी राजवस्त्रे आणली होती. सीतेसाठी पण आणली होती.
दासींनी सीतेचा ताबा घेतला.
तब्बल १४ वर्षांनी सीता वल्कलांचा त्याग करत होती. त्या जाड्याभरड्या वल्कलांची तिला सवय झाली होती.
स्वत: नदीवरुन पाणी आणायचे, रानातून फळे कंदमूळे शोधून आणायची, भोजनसिद्धता करायची.
आणि मग रानपक्ष्यांचे कूजन ऐकत, शावकांशी क्रिडा करत, तिचा दिवस कसा जायचा ते कळायचेच नाही.
रोज तिचा साजशृंगार करुन देण्यासाठीच जणू रानातील वेली फ़ूलत होत्या. एकदा तर श्रीराम म्हणालेही होते, कि ती एखाद्या वनकन्येप्रमाणे दिसते म्हणून. खरेच त्या दिवसांचे तिला पुन्हा आकर्षण वाटू लागले होते.
राजवस्त्रे, अलंकार चढवताना तर ते तिला जाचू लागले. तलम गर्भरेशमी वस्त्रे, रत्ने, मोत्ये जडवलेले अलंकार जडशीळ वाटू लागले होते.
आपल्या अलंकारांपैकी काहि निवडक अलंकार, श्रीरामाने मारुतीस दिले. तो तर अगदी संकोचून गेला. पण
प्रत्यक्ष त्याच्या प्रभूची आज्ञा त्याला मोडताही येणार नव्ह्ती.
श्रीराम आणि सीता प्रस्थान करू लागल्यावर, तिथल्या जनसामान्यांनी त्या उभयतांची वाट अडवली. त्या
दोघांना देण्यासाठी त्यांनी मधाचे बुधले, अप्रतिम चवीची कंदमुळे व फळे, उत्तम गायन करणारे पक्षी,
हस्तीदंत, मृगजीनं यांचे भारे आणले होते.
सीतेला ती मृगजीनं बघून, नको ते प्रसंग आठवले. त्यातल्या अनेक वस्तू तिने, स्वत:ची आठवण म्हणून
तिथल्या स्त्रिया आणि बालकांना परत केल्या.
खरे तर मारुतीला, श्रीरामाच्या रथासोबत पायीच चालायचे होते. पण श्रीरामाने त्याला अनुमती दिली नाही.
त्याला बळेच लक्ष्मणासोबत रथात बसावयास लावले. तो अर्थातच हिरमुसला.
सर्वात पुढे भरत आणि शत्रुघ्न यांचा रथ, मग श्रीराम व सीता, त्यामागे लक्ष्मण व मारुती व मागे
अधिकारीवर्ग असे रथ मार्गस्थ झाले. सोबत अनेक घोडेस्वार, हत्ती होते, शिवाय श्रीरामाचा जयजयकार करत अनेक सामान्यजन सोबत होते.
सूर्य आता तळपू लागला होता. सेवकांनी श्रीरामाच्या रथाला चहूबाजूंनी पडदे सोडले, अजून अयोध्या गाठायला बराच अवधी होता. "सीते, मारुतीने माझी सावलीसारखी सोबत केली. त्याला दुसर्या रथात पाठवायला नको होते."
"नाथ, नाहीतरी माझा सहवास आपल्याला नव्हताच ना. आणि आता तर काय, आपण अयोध्येचे चक्रवर्ती राजे होणार. एखाद्या बटीक दासीसारखीच माझी गत होईल." सीता लटक्या रागाने म्हणाली.
" सीते, कर्त्यव्ये कुणाला चुकली आहेत का ? तूझ्याबरोबर वनवासाला निघालो, तेही कर्तव्य आणि आता
राज्यकारभार करणार तेही कर्तव्यच." श्रीराम उत्तरले.
"नाथ, सत्य सांगा. ते वनातील जीवन तूम्हालाही प्रिय होते ना ? राजवाड्यात आपल्याला कधी इतका
एकमेकांचा सहवास घडताच ना ? एखाद्या सामान्य पतिपत्नीप्रमाणे आपण राहिलो." सीतेने अधीरतेने विचारले.
श्रीराम, केवळ मंद स्मित करते झाले.
"नाथ खरेच, एवढा मोकळेपणा मला माहेरी पण कधी लाभला नाही. मी कायम सखी दासींच्या घोळक्यात
असे. मला शस्त्रास्त्रे चालवण्यात आनंद मिळत असे. बाबांनी खास मला शिकवण्यासाठी अनेक गुरुंची योजना केली होती. वाटे वनात जावे, श्वापदांची शिकार करावी, राक्षसांचा नाश करावा." सीता बोलली.
"मग रावणाला हरण कसे करता आले. माझ्या प्रिय पत्नीचे ?" श्रीरामांनी खट्याळपणे विचारले.
"नाथ, आपण जाणता. रावणाचा वध करणे मला कठीण नव्हते. एक पतिकर्तव्य म्हणून आपण मला
घेऊन जावे. अशी एक सामान्य पत्नी म्हणून मी अपेक्षा केली, तर काहि चुकले का माझे ?" सीतेने विचारले.
"बघ प्रिये, आता तूच मला कर्त्यव्यांची जाणीव करुन देऊ लागली आहेस." श्रीराम उत्तरले.
तेवढ्यात बाहेरुन आनंदाचे चीत्कार येऊ लागले. श्रीरामांनी त्वरेने रथाचे पडदे दूर केले. अयोध्येचे नगरजन वेस ओलांडून श्रीरामांच्या स्वागतासाठी आले होते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
श्रीरामांवर फुले, अक्षता उधळल्या जात होत्या. हवेत अबीर, गुलाल भरुन राहिले होते. म्हातार्याकोतार्या त्या दोघांकडे बघत कानावर बोटे मोडत होत्या.
अयोध्या नगरीची वेस ओलांडल्यावर तर रथ तसूभर पुढे सरकणे अशक्य झाले. पथभर रांगोळ्या काढण्यात
आल्या होत्या. गुढ्या पताकांनी निवास सजले होते. अयोध्यावासी आनंदाने बेभान होऊन नाचत होते.
ज्या लहान बालकांनी श्रीरामांना कधी बघितलेही नव्हते, ती एखादा स्वर्गीय देवच बघावा, तसे बघत होते.
तान्ह्या बाळांना, माता श्रीरामाच्या चरणी ठेवू बघत होत्या. केवळ श्रीरामांचे दर्शन व्हावे म्हणून मृत्यूला
थोपवून राहिलेले वृद्ध, सुटकेचा निश्वास सोडत होते. तरुण तरुणी श्रीरामांकडे आशेने बघत होते.
दोन प्रहरानंतर सर्व रथ राजप्रासादी पोहोचले. कैकयीमाता, सुमित्रामाता आणि कौसल्यामाता डोळ्यात
प्राण आणून त्यांची वाट बघत होत्या. श्रीरामांनी सर्वप्रथम कैकयीमातेस वंदन केले. कैकयीला अश्रू
आवरेनात. "माझ्या बाळा, किती रे सोसलेस ?", असे म्हणत त्यांनी श्रीरामांना दृढ आलिंगन दिले. त्यानंतर अर्थातच सुमित्रामाता आणि कौसल्यामाता यांनी श्रीरामांना आलिंगन दिले.
अत्यंत कृश झालेली, उर्मिला पंचारती घेऊन सामोरी आली. त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातील भाव,
सीतेच्या नजरेने, अचूक टिपले. श्रीरामांनी मारुतीरायाचा परिचय करुन दिला. त्याच्या पराक्रमाच्या
वार्ता आयोद्धेपर्यंत आल्याच होत्या.
उर्मिलेने सीतेच्या भाळी. सौभाग्याचा कुंकुमतिलक लावला व तिला दृढ आलिंगन दिले, व म्हणाली,
"ताई, का गं तूला वनवास घडावा ?"
"उर्मिले, खरा वनवास तू भोगलास. वनी मी नाथांसोबत होते. तू इथे एकलेपणाच्या आगीत जळत
होतीस. आता जा बरं प्रासादी. मी भावोजींना पाठवून देते." सीता म्हणाली.
मारुतीराया हे सगळे अबोलपणे बघत होता. असा लोकप्रिय राजा, त्याने कधी बघितलाच नव्हता.
आजन्म, श्रीरामांची सेवा करायची, असे त्याने न जाणे, कितव्यांदा ठरवले. एक क्षणसुद्धा तो
श्रीरामांना आपल्या नजरेपासून दूर होऊ देत नव्हता.
भरतांने त्यांना क्षणभर उसंत मिळू न देता, राजदरबारी चलण्याची विनंती केली. कधी एकदा
दादाच्या समर्थ हाती राज्यकारभार देतोय, असे त्याला झाले होते.
राजदरबारी सर्व कारभारी त्यांच्या लाडक्या राजाची वाटच बघत होते. सिंहासनावरील पादुका
भरताने उचलून स्वत:च्या माथ्यावर ठेवल्या, आणि मग उत्तरियाने पुसून श्रीरामांच्या पायात
चढवल्या. त्यांच्या माथ्यावर रत्नजडीत मुकुट ठेवला, आणि उच्चरवात गर्जना केली, "श्रीरामांचा
विजय असो." सर्व दरबारी त्या गर्जनेत सामिल झाले.
राज्यातील सर्व कारागीर, आपल्या कलेचे उत्तमोत्तम नमूने श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यासाठी
घेऊन आले होते. कुणी शेला, तर कुणी पितांबर. कुंणी कंठा तर कुणी कमरबंद. कुणी धनुष्य
तर कुणी सुवर्णांनी घडवलेले बाण घेऊन आले होते.
अयोध्या नगरीतील जेष्ठ सुवर्णकार, अत्यंत दुर्मिळ रत्नांनी घडवलेला, रत्नहार घेऊन आले होते.
त्या रत्नहाराचे तेज इतके होते कि त्यावर नजर ठरत नव्हती. श्रीरामांनी तो हार हातात घेऊन
न्याहाळला, आणि तो सस्मित नजरेने, शेजारी स्थानापन्न झालेल्या, सीतेस दिला.
स्त्रीसुलभ नजरेने सीतेने तो कौतूकाने न्याहाळला.आणि क्षणांत त्याचा मोह तिने त्यागला.
त्यांच्या पायाशी विनयाने बसलेल्या मारुतीला तिने तो देऊन टाकला.
कालांतराने दरबारातील लोक पांगले. केवळ निकटवर्तीयच उरले. पंचपक्वानांच्या भोजनाची
सिद्धता झाली होती. कौसल्यामातेने स्वत: अपूप केले होते. थरथरत्या हातांनी, त्यांनी ते
श्रीरामांना भरवले.
श्रीरामांनी स्वत: मारुतीसाठी एक महाल सिद्ध करण्याची आज्ञा दिली. तिथे जाण्यापूर्वी
प्रभूंना वंदन करण्यासाठी तो आला. त्यावेळी सीतेचे सहज लक्ष गेले, तर त्याच्या कंठी
तो रत्नहार नव्हता. नीट बघितल्यावर तिला दिसले कि त्याने, त्यातली रत्ने फ़ोडली आहेत.
"मारुतीराया, हार आवडला नाही का ?" तिने विचारले.
"माई, ज्यात माझे प्रभू वास करत नाहीत, अशी कुठलीच गोष्ट मला आवडत नाही."
मारुती उत्तरला.
"म्हणून ती रत्ने फ़ोडलीस कि काय ?" तिने विचारले.
तो खालमानेने तसाच ऊभा राहिला.
"आज आनंदाचा दिवस आहे. आज सर्वजण तृप्त आहेत. आज तू काहीही मागणी कर."
सीता म्हणाली.
"माई मला जे प्राणप्रिय, ते आपल्यालाही प्राणप्रिय. मी मागू तरी काय ?" मारुती उत्तरला.
सीतेने केवळ क्षणभरच विचार केला. आपल्या भाळावरील कुंकुमतिलकातील काहि भाग
काढून तिने मारुतीच्या भाळावर टेकवला.
"मारुतीराया, मी अगदी तृप्त आहे. नाथांसारखा पति, जनकांसारखा पिता, लक्षमणभावोजींसारखा
पाठराखा बंधू मला लाभला. पण माझ्या आयूष्यात एकच न्यून राहिले. मला अजून पूत्रलाभ
झाला नाही. मला कधीकाळी पूत्र झाला, तर तो तूझ्यासारखा बलवान, पराक्रमी, विनयशील
हवा. आजपासून तू माझा मानसपूत्रच झाला आहेस." सीता मनापासून म्हणाली.
तत्परतेने खाली वाकत, तिचा चरणस्पर्श करत तो म्हणाला, "माते, यापे़क्षा तृप्त करणारे काय असू शकते ?"
"चिरंजीव भव." सीतेने आशिर्वाद दिला.
*****
मूळ कल्पना : गुजराथी लोककथेतून.
दिनेशराव, लेखन आवडले. सुयोग्य
दिनेशराव,
लेखन आवडले. सुयोग्य व न्याय्य वाटले.
पण खरच - याचे प्रयोजन समजले नाही. (कदाचित मी आधीचे काही भाग असले तर वाचलेले नसावेत.) आपण रामायण लिहीता आहात का? की काही भाषांतर आहे हे?
चु.भु.द्या.घ्या.
-'बेफिकीर'!
नाही हो, बेफिकीरजी, मी काही
नाही हो, बेफिकीरजी,
मी काही रामायण लिहित नाही. आधी या संबंधात काही लिहिलेही नव्हते.
दिवाळीच्या दरम्यान गुजराथी लोक, मारुतीची पूजा करतात, त्या संबंधात ऐकण्यात आलेला हा संदर्भ. तो मी केवळ जरा विस्तारलाय.
सीता आणि मारुती यांचे काय नाते असावे, असे मला नेहमी वाटायचे. (एका चित्रकाराच्या निंद्य चित्राने तर भयंकर चिडलो होतो.) त्याला या लोककथेतून सुंदर उत्तर मिळाले, तेच इथे मांडलेय.
हे हे हे ... मस्त आहे छान
हे हे हे ... मस्त आहे
छान लिहिले आहे. साधी सरळ सोपी भाषा. !!!
कथा खूप आवडली दिनेश दा..
कथा खूप आवडली दिनेश दा.. कथेतील प्रसंग खूप छान वर्णन केलेले आहेत
असे नाट्यरुपातील विस्तार
असे नाट्यरुपातील विस्तार उपयुक्त ठरतात. विस्तार सुंदर केलात. अधिक व विविध व्यक्तिरेखांचे व प्रसंगांचे करावेत असे वाटते.
अभिनंदन व शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
<< "उर्मिले, खरा वनवास तू
<< "उर्मिले, खरा वनवास तू भोगलास. >>
ह्या वाक्यावरून खालील ओळी आठवल्या..
" चौदा वर्षे पतीविना राहिली ऊर्मिला,
मी त्याला वनवास म्हणालो, चुकले का हो ?"
( आकाशाला भास म्हणालो चुकले का हो ?..ह्या गझलेतील ओळी. )
मस्त लिहिलंय. तुमच्या वनस्पतींच्या लेखांसारखीच, अशा लिखाणाचीसुद्धा पंखी होणार असं दिसतंय.
दिनेशदा, छान लिहिलेत... खुप
दिनेशदा, छान लिहिलेत... खुप दिवसांनी आज रामायणातला एक वेगळा पैलू दाखवणारा प्रसंग वाचायला मिळाला, तोही साध्या सोप्या भाषेत... सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं, इतकं बोलकं लिहिलंय तुम्ही. गोष्ट आवडली. तुमचे हे अशाप्रकारचे पहिलेच लेखन वाचतेय मी. मस्त...ओघवत्या शैलीतली सुरस कथा!
दिनेशदा,साधी सरळ लेखणी... फार
दिनेशदा,साधी सरळ लेखणी... फार छान वाटलं हे लेखन.
@रुणुझुणू,
त्या शेरातील दुसरी ओळ अशी आहे,
हाच खरा वनवास म्हणालो,चुकले का हो?
कैलास यांच्याशी सहमत!
कैलास यांच्याशी सहमत!
'पंखा'चे स्त्रीलिंग 'पंखी' आहे हे या निमित्ताने समजले!
-'बेफिकीर'!
मला आधी वाटलं आता मायबोलीवर
मला आधी वाटलं आता मायबोलीवर रजनीनंतर "चिरंजीवी" पण आला की काय?
दिनेशदा छान लिखाण.
दिनेशदा छान लिखाण.
असंबद्ध प्रतिक्रिया /
असंबद्ध प्रतिक्रिया / प्रतिसाद देण्याचे कौशल्य काहीजणांना लाभलेले आहे. मुद्दा असा आहे की त्यांच्याकडे 'इतर काहीही कौशल्य' नाही आहे. आणि बहुधा त्याच कारणामुळे ते 'लाभलेल्या कौशल्याचे' अतिरिक्त प्रदर्शन करत राहतात! दिनेश, कीप इट अप!
-'बेफिकीर'!
अहो दिवा दिलाय की. ते दिनेशदा
अहो दिवा दिलाय की. ते दिनेशदा तिकडे रजनीच्या बाफं वर फुल्ल सुटले होते म्हणून गमतीनी म्हंटलं. (हे दिनेशदांनी गैरसमज करुन घेऊ नये म्हणून लिहीलं).
बेफिकीर, दुसरी कामं नाहीत का तुम्हाला?
अहो??? तुम्हाला काय झाले??
अहो??? तुम्हाला काय झाले?? प्रतिसाद 'आपलासा' वाटला काय? हा हा हा हा!
अगदी नांव 'बिव' लिहून दिलात ते?
कुठे मारतो मी, कुठे लागते!
ते कशाला...
इतके विचित्र सारे, देवा तुझे नजारे
फटका बसे कुणाला, 'भलताच' बोंब मारे
हा हा हा हा!
-'बेफिकीर'!
मला मायबोलीवर भरपूर कामं आहेत
मला मायबोलीवर भरपूर कामं आहेत बरं? हा हा हा हा!
पण 'ही' असली नाहीत! खीक खीक खीक खीक!
-'बेफिकीर'!
(इतरत्रही आहेत)
बरं. माझ्या लक्षात नाही आलं.
बरं. माझ्या लक्षात नाही आलं. मला वाटलं माझ्या पोस्टी बद्दल म्हणालात.
कुठे मारतो मी, कुठे लागते! >>>>>>> अहो तुमचा नेम सारखा चुकतो ह्याचा इतका बोलबाला का करताय? बाकी कुठे भलतीकडेच लागायला लागलं तर अवघड आहे तुमचं.
अवघड 'कुणाचं' आहे ते दाखवलंतच
अवघड 'कुणाचं' आहे ते दाखवलंतच की तुम्ही! हा हा हा हा!
इतके विचित्र सारे, देवा तुझे
इतके विचित्र सारे, देवा तुझे नजारे
फटका बसे कुणाला, 'भलताच' बोंब मारे
हा हा हा हा!
-'बेफिकीर'!
<<,
भलताच बोंब मारे, हा हा हा हा (बघ) बेफिकिर
असं हवं होतं.
बेफिकिर स्वल्पविराम हवा होता त्या उद्गार चिन्हा ऐवजी
बहुतेक ह्यालाच अर्ध्या
बहुतेक ह्यालाच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणत असणार.. आणि दिवे घे म्हणणार नाही तुम्हाला. @ बेफिकीर..
दिनेश तुमचा लेख चांगला आहे. अशीच एक गोष्ट अजुन एक आहे ना? श्रीराम मोत्याह्चा कंठा मारुतीला देतात मग तो दाताने मोती फोडून बघतो. सीता बघत असते विचारते कुतुहलाने मारुतीला की तो काय करतो आहे. तो म्हणतो मी श्रीराम शोधतो आहे. मग तो आपली छाती फोडून दाखवतो ..
सागरीका, सिनेमात वगैरे तोच
सागरीका, सिनेमात वगैरे तोच प्रसंग दाखवतात. मला तो अनैसर्गिक वाटतो. त्या व्यक्तीरेखा मानवी पातळीवर चितारल्या, कि खूप लोभस वाटतात, आणि लोकसाहित्यात तर त्यांचे असेच चित्रण असते.
उदा. हि ओवी
राम म्हणू नये राम, नाही सीतेच्या तोलाचा
सीता माझी हिरकणी, राम हलक्या दिलाचा.
डॉ.कैलास, तुम्ही सांगितलेलीच
डॉ.कैलास, तुम्ही सांगितलेलीच ओळ बरोबर आहे....खूप दिवसांनी आठवली होती इलाही जमादारांची ही गझल.
वयोमानाप्रमाणे होतात अशा चुका
दिनेशदा छान लिहिल आहेत. खुप
दिनेशदा छान लिहिल आहेत. खुप मस्त वाटल वाचताना. सानी म्हटल्याप्रमाणे - खुप दिवसांनी आज रामायणातला एक वेगळा पैलू दाखवणारा प्रसंग वाचायला मिळाला, तोही साध्या सोप्या भाषेत... सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं, इतकं बोलकं लिहिलंय तुम्ही. गोष्ट आवडली.
>>>
राम म्हणू नये राम, नाही सीतेच्या तोलाचा
सीता माझी हिरकणी, राम हलक्या दिलाचा.
वाह!!
मस्तच आहे लेख. भरतभेटीचा आणि
मस्तच आहे लेख. भरतभेटीचा आणि राम नगरी परततो हे प्रसंग वाचलेत फक्त, आज अगदी नजरेसमोर उभे राहिले.
गुजरातेत मारुतीची पुजा करतात हे माहित नव्हते. धन्यवाद माहितीबद्दल.
बासुरीच्या कथांनंतर बर्याच
बासुरीच्या कथांनंतर बर्याच दिवसांनी पौराणिक विषयावर वाचायला मिळाले. कथाशिर्षक वाचून मला वाटले की ही चिरंजीवींची (लक्ष्मण, मारूती, बिभीषण, अश्वत्थामा(यावर माबोवरच आधी वाचलेय), बलराम इ. ) लेखमालिका वाचायला मिळेल...
कथावर्णन, घटनावर्णन, तो पौराणिक कथाबाज छान लिहीलाय... पण मला असं वाटलं की ही मारूतीची कथा असूनही त्यात मारूतीचं वर्णन कमी आलेय. अर्थात जरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही सीता-मारूतीचं नातं दर्शवणारी कथा आहे तरीही, ही राम आणि सीतेचीच कथा जास्त वाटतेय... (वै. मत चु.भू.द्या.घ्या.)
पण छान वर्णन... दिनेशदा, वर म्हटल्याप्रमाणे चिरंजीवींची लेखमालिका करणार का प्लीज???? वाट बघतेय
छान लिहिलय...
छान लिहिलय...
मलाही असा संदर्भ माहीत
मलाही असा संदर्भ माहीत नव्हता. सीतेचे हरण झाल्यानंतरच राम आणि मारुती यांची भेट झाली.
त्यामूळे रामाच्या मनात मारुतीचे काय स्थान आहे, हे तिला माहित नव्हते.
तिची आणि मारुतीची पहिली भेट, अशोकवनात झाली. त्यावेळी तिला त्याची भिती वाटली होती.
शिवाय तिने त्याच्याबरोबर येण्यास नकार झाला होता.त्यामूळे त्याच्या मनातही तिच्याबद्दल किंचीत अढी.
युद्ध संपल्यावरच ते सर्व एकत्र आले. रामाच्या बाबतीत दोघांच्या मनात मालकीहक्काची भावना होती.
पण मूळातच विनयशील असल्याने, ते दोघे एकत्र आल्यावर, मारुती बाजूला झाला.
पण रामाच्याही मनात, मारुतीबद्दल किती प्रेम आहे, ते सीतेला मोजक्या प्रसंगातून कळले.
राम तर दोघांनाही हवा आहे, पण त्याची वाटणी कशी करणार ? यावर सीतेने काढलेला हा ह्रूद्य
तोडगा. हा या लोककथेचा मला लागलेला अर्थ. तोच इथे मांडायचा प्रयत्न केलाय.
मी वर लिहिल्याप्रमाणे, या महाकाव्यातील व्यक्तींचे देवत्व, लोककथात गळून पडते. उरतात ती
केवळ माणसे. आणि ती निखळ व्यक्तीचित्रे मला जास्त आवडतात.
विस्तार सुंदर
विस्तार सुंदर
सिता व मारुतिमधल्या असल्या
सिता व मारुतिमधल्या असल्या नात्याच रुप कधिच वाचनात आले नव्हते.पण खरच छान वाटले.
मस्तच आहे लेख.
मस्तच आहे लेख.
छान लिहीले आहे दिनेशदा....ही
छान लिहीले आहे दिनेशदा....ही कथा अजिबात ऐकली नव्हती...
Pages