कविता
एक सेकंद
एखाद्या निवांत रात्रीच्या शांततेवर
ओरखडा उमटवणारा
अवचित कुणाचा तरी फोन येतो
आणि अंगभर भितीची लहर पसरते
मनात असंख्य पाली चुकचुकायला लागतात
काळजाचे ठोके वाढायला लागतात
हातपाय डळमळायला लागतात
काय झाले असेल? कुठली बातमी असेल
समद्रपार असलेले जिवलग ठिक तर आहेत ना?
त्या तेवढ्या एका क्षणात जिवाचे पाणी पाणी होते
एका सेकंदात सगळे अंतर पार करता आले तर!!!!
बी
--
बेसावध
निचरा
निचरा
बरं असतं कधीकधी
जगाला तात्पुरता गुडबाय करणं,
हसून निरोप देणं,
परत येईल असं म्हणून
दीर्घकाळ वनवासासाठी कुठेतरी दडून बसणं!
आपल्या भटंकतीत आपली उत्तरे आपणचं शोधणं
आपल्या स्वैर मनाला कुठेही भरकटु न देणं.
खूप काही साचत जात घोळक्यात वावरताना
नकोसा होऊन जातो रोजचा अभिनय
ओठावर हसू आणि हृदयात किल्मीष बाळगताना
ओळखीच्या चेहर्यासमोर काहीतरी लपवताना
आणि लपवलेलं ताडलं हे पचवताना!!!
बर असतं कधीकधी ..नको ते रिक्त करुन
फिरुन परत .. नव्याने मैफलीत येताना!
-बी
निरवानिरव
रोजची दुपारची.. रात्रीची
निरवानिरव करता करता
एक दिवस डळमळतं
आयुष्य काठावर येतं
आणि सुरु होते
शेवटची निरवानिरव
जड वाटतात तेंव्हा
मोठ्या जिकरीने
साठवलेल्या ..
संग्रह केलेल्या
गाठोड्यात बांधून ठेवलेल्या
ठेवणीतल्या
वस्तू..
गजबजलेल्या संसाराचं
रिक्त..रिकामं चित्रं!
निर्जीव वाटायला लागतात
त्यावेळेसचे ते सर्व क्षण अन क्षण
काहीच उरलेलं नसतं
उरलं असतं
एक न पेलणार ओझं
प्रत्येक आग्रहातला अट्टाहास
हास्यास्पद होऊन जातो!
डेटींग...
स्वीस चॉकलेटसारख्या गोड
शुक्रवारच्या निवांत संध्याकाळी
हसत-बागडत स्टारबक्समधे भेटू
पाईनच्या बाकड्यावर बसून
गारेगारशी कॉफी चाखू ..
वेळेचे भान हरपून
मधाळशा गप्पांमधे विरघळून जाऊ
चांदण्याच्या मौज-मस्तीत
रमत-गमत डॉमिनोमधे जाऊ
टोमॅटो-मोझेरिला पित्झा खाऊन
डीझर्टला तिरामिसू मागवू
आणि अॅल्कोहोलिक चवीबरोबर
कष्टाळलेल्या वीकडेजला गुड्बाय करत
पुन्हा एक वीकेण्ड साजरा करु!!!!
-बी
प्रक्रिया
अजब.. विचित्र असते
आतल्याआत तुटत जाण्याची प्रक्रिया...
चेहर्यावर पसरलेली असते
वाळवंटासारखी रुक्ष कोरडी शांतता
आतमधे मात्र सलसलत असतात
चरचरणार्या जखमा ओल्या!!!!
जितकी ती आपल्याला तोडत जाते
तितकीच ती जोडत जाते
आपल्यातील बळ.. सामर्थ्य कणकणाने!
ह्या सगळ्याची अनपेक्षित सवय होईपर्यंत
ही प्रक्रिया आयुष्याचा एक हिस्सा बनून जाते...
एखाद्या कडेकोट अभेद्य किल्ल्यासारखी
ती स्वतःला बंदीस्त करुन ..सामावून घेते...
हळूहळू आपल्या जगण्याच्या कलेवर
प्रतिकुल परिस्थितित मात करुन
प्राप्त केलेल्या बळावर.. सामर्थ्यावर
कोरडेपणावर आणि हृदयहीनतेवरही
आपले प्रेम होऊन जाते...
गॅप
कधीकधी मनाच्या अस्वस्थ पाखराला
नको असते कवेत घेणारे आकाश
क्षितिजावरुन ओघळणारा ओलावा
चांदण्यांची दुर...दुरवरुन येणारी हाक
आपल्या सोबत सोबत चालणारा चंद्र
नको असतो कुठलाच उदय आणि कुठलाच अस्त!
...मनाच्या अस्वस्थ पाखराला
नको असते चिऊकाऊची वेल्हाळ चिवचिव
कोकीळेचा आर्त पंचम
खोप्यातील बाळांची फडफड
बगळ्यांची घनश्यामल माळ
नको असतो राऊ आणि नको असते मैना!
मनाच्या अस्वस्थ पाखराला...
नको असते कुणाची छाया, कुणाची माया आणि कुणाचीही दया!
नको असते शब्दाची फुंकर
नको असतात भरवलेले चार घास
नको असतात कुणाचे पुण्य आणि कुणाचेही उपकार!
मनाच्या अस्वस्थ पाखराला
हवा असतो एक कोपरा
एक कविता
एक नेगेटिव्ह कविता जी की माझी शैली.. आवड नाही पण आता भावनेच्या भरात लिहिलीच आहे तर प्रकाशन करण्यायोग्य समजावी :=) हा हा हा :=)
कशाला हवी माया?
नको कुणाची छाया
मातिशी इथल्या
माझीही काया
मिसळेलच ना?
कशाला हवे मैत्र
नको कुणाचे छ्त्र
ढगाखाली इथल्या
माझीही काया
भिजेलच ना?
कशाला हवे पुर्णत्व
नको कुणाचे तत्व
जगता जगता
माझीही काया
विरेलच ना?
- बी