मुलीचा बाप होणे फार अवघड असते. आणि त्यात तुझ्या लेकीसारखीचा बाप होणे तर आणखी अवघड. येतील हळूहळू अनुभव तुला ..
लेक अगदी अडीच तीन वर्षाची झाल्यापासून हे ऐकतोय. आणि तेव्हापासून उत्सुक आहे, तयार आहे, ते अनुभव कधी येताहेत याची वाट बघत 
आज एक बहुधा त्यातलाच मजेशीर अनुभव आला, तो शेअर करावासा वाटतोय. तेवढीच विचारांची देवाणघेवाण...
" तुला आठवतंय? आज बरोबर चार वर्ष झाली मी तुला प्रोपोज केलं होतं . चार वर्ष कशी गेली कळले देखील नाही. काय काय झाले रे ह्या वर्षात.... माय्क्रोबायोच्या कचाट्यातून आपण दोघेही सुटलो. मग माझे वर्षभर जॉब करणे आणि MBA साठी तयारी करणे. मग दोन वर्षांचं MBA आणि आता मी देखील नोकरीला तयार. आणि माझा बच्चू अजून फिरतोच आहे. तुझे हे फिरणे कधी कमी होणार रे?" मला ही बच्चू म्हणायची हे जाता जाता सांगायला हरकत नाही.
आमच्या छोट्या शहरी एक बऱ्यापैकी मोठा तलाव आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना तसा तो जवळ देखील आहे. तलावावर कमळांची सुंदर गादी तयार झालेली आहे आणि म्युन्सिपालटी ने थोडीशी दया दाखवून ती अनुभवायला तिकडे बसायची सोय देखील केली आहे. काठावरच छोटं देऊळ असल्यामुळे अनेक आजी-आजोबांची सकाळची फेरी आणि नंतर चर्चासत्र इकडेच रंगतात. आत अनेक देव असल्यामुळे 'वारांची वारी' अगदी ठरलेली! संध्याकाळी देखील कसली तरी व्याखानं, मध्येच एखादा गाण्यांचा कार्यक्रम, कुणाचा तरी कौतुक सोहळा, पत्त्यांचे सामने, कॅरम खेळणे हे इथल्या छोट्याशा व्यासपीठावर नित्याने होते असते.