जखम
ती यायची नेमाने, सकाळी-सकाळी
कोण कुठली, कुठून यायची
किती पायपीट करून
थांगपत्ता नाही
यायची वाडा झाडायला
बदल्यात शिळंपाकंवरचा हक्क बजावयाला
लहान मुलांनाही सौंदर्यबोध असतो
गोरंपान रुपडं वर ठसठशीत कुंकू
सुरकतलेला देह नव्वारीत बांधून
मोठं अप्रूप वाटायचं
नशीब थट्टेखोर म्हणतात ते काही खोटं नाही
जिन्याखाली असायचा तिचा ऐवज
एक खराटा, थाळी, आणि पेला
कुणी तिला शिवायचं नाही
अन्न-पाणी वरून घालायचं
का ते कुणाच्याही बापाला ठाऊक नाही
कधी-कधी चार-आठाण्यांसाठी करायची घिसघिस
वाटायचं उरलंसुरलं का होईना
रोज खाऊन तर जायची इथून
मग कुणासाठी हा आतड्याचा पीळ