एकेक गड किल्ल्यांची भटकांत्या आजवर केल्या होत्या पण रेंज ट्रेक काही झाला नव्हता. तसेच आजपर्यंत सगळ्या भटकंत्यांमध्ये खानपान गावकऱ्यांकडून घेतले होते त्यामुळे लाकडं गोळा करून, चूल पेटवून स्वंयपाक करण्याची मजा अजून घेतली नव्हती. चंद्रकोर ट्रेक्स या समूहाच्या भैरवगड ते कात्राबाई अशी रांग भटकंती ची माहिती मिळाली आणि ही संधी सोडायची नाही असें ठरवले. हा ग्रुप बरीचशी व्यवस्था आपली आपणच करतो आणि खर्च वाटून घेतो, त्यामुळे खूप स्वस्तात आणि स्वावलंबी भटकंती होते.
रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग १
रतनवाडी! सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव! अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ अप्रतिम पुष्करणी, एकीकडे भंडारदरा धरणाच्या जलाशयाची सोबत तर दुसरीकडे डोंगररांगांचा शेजार!
गावातून दिसणारा रतनगड आणि खुट्टा -
खुट्टा क्लोजअप -
तुम्ही जर मुरलेले भटके असाल, तर शीर्षक वाचताक्षणीच समजायचं ते समजून गेला असाल. आणि नसाल तर, तुम्हाला सांगताना मला विलक्षण आनंद होतोय - ही एक सह्याद्रीमधल्या फारशी प्रसिद्ध नसलेल्या आणि कदाचित म्हणूनच अप्रतिम आडवाटांमधली, भ्रमंती आहे! पार रतनवाडीपासून कात्राबाईला वळसा घालत, आजूबाजूचा अप्रतिम नजारा डोळ्यांत साठवत, कातळ-कपार्यांतून चालत, अगदी गुहेरीच्या दारापर्यंत आणि पुढेही थेट कोकणात उतरणारी ही वाट दिवस पूर्ण सार्थकी करते.
तर, त्याचं असं झालं -