रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग १
रतनवाडी! सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव! अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ अप्रतिम पुष्करणी, एकीकडे भंडारदरा धरणाच्या जलाशयाची सोबत तर दुसरीकडे डोंगररांगांचा शेजार!
गावातून दिसणारा रतनगड आणि खुट्टा -
खुट्टा क्लोजअप -
शंकराचे मंदिर -
पुष्करणी -
(त्या मंदिराचे व पुष्करणीचे फोटो माबोकर 'डोंगरवेडा' ने इथे दिले आहेत.)
थंडी इतकी होती की सकाळी झाडाला पाणी घातले तरी त्याची आपोआप वाफ होत होती! सकाळी पावणेआठ वाजता चालायला सुरुवात केली तेव्हा लवकरात लवकर म्हणजे अंधार पडायच्या आत गुहेरीच्या दारातून कोकणात उतरणे एवढेच उद्दिष्ट होते. रतनगडाची वाट सुंदर जंगलातून जाते. वाटेत एकच नदी तीन-चार वेळा ओलांडून जावे लागते. पलीकडच्या काठावर पुढे गेलेली वाट दिसली, की नदी ओलांडायची, एवढंच समजलं मला! थोडंस पुढे गेल्यावर रानडुकरांची शिकार करण्यासाठी रान उठवायला निघालेले तीन-चार गावकरी दिसले. आणि थोड्या वेळाने मग वाटेत आजूबाजूच्या जंगलातून खसखस ऐकू येत राहिली. (रानडुकरे असावीत).
पण काहीही म्हणा, हा सगळाच टापू अतिशय सुंदर आहे! रतनगड-भंडारदरा-पाबरगड-सांदण दरी-कळसुबाई-अलंग-कुलंग-मंडण हे दोस्त, पायथ्याशी चित्रात शोभतील अशी छोटी गावं आणि वन्य श्वापदांचा वावर असलेलं देखणं जंगल! कुठल्याही ऋतूत जा, आपल्यासाठी काही ना काही खास असणारच!
रतनगड -
उन्हात चमकणारे कात्राबाई डोंगराचे कडे -
झूम करून -
एका सपाटीवर ब्रेकफास्ट ब्रेक घेतला आणि पुढे निघालो. साधारण दहा वाजता रतनगड-कात्राबाई फाट्याजवळ पोचलो. इथे दोन वाटा फुटतात - उजवीकडची गडाकडे जाते आणि सरळ वाट कात्राबाईच्या डोंगराच्या दिशेने जाते. आम्हाला या दुसर्या वाटेने जाऊन अग्निबाण सुळक्याला वळसा घालायचा होता. त्या फाट्यावर रात्री गडावर गेलेल्या ग्रुपला खाली आणायला निघालेले दोन गावकरी भेटले. त्यांच्याकडून कुमशेतपर्यंतच्या मार्गाची खातरजमा करून घेतली. तसेच आजूबाजूच्या जंगलातले श्वापदांबद्दलही विचारून घेतलं.
डाव्या कडेला अग्निबाण सुळका -
इथून पुढची वाट झाडीतून जाते. काही ठिकाणी पायाखालची वाट दिसत नाही, इतकी कारवी आहे. वाटेवर दोन-तीन ठिकाणी जमीन उकरल्याच्या खुणा दिसल्या. एका बिबट्याच्या बछड्याच्या पावलांचे ठसे दिसले. थोडंसं पुढे गेल्यावर एके ठिकाणी मोठ्या बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्या. ते पाहून आजतरी बिबट्याने दर्शन द्यावे असं फार वाटायला लागलं! मला एकदा या सगळ्या जंगलच्या अनभिषिक्त रहिवाशांना त्यांच्याच मुलुखात मोकळेपणे पाहायची फार इच्छा आहे! फक्त त्यांनी फार सलगी दाखवली नाही तर मला पुढच्या वेळी उरलेल्या इच्छा सांगण्याची संधीही मिळेल! असो.
बिबट्याचे ठसे - (वर्तुळ बिबट्याने काढलेले नाही!)
तर रतनगडाला उजव्या हाताला ठेवून ही वाट अग्निबाण सुळक्याच्या दिशेने सरकते. रतनगड आणि खुट्टा -
बराच वेळ चालल्यावर एके ठिकाणी जंगलात एक इमर्जन्सी ब्रेक घेतला. तिथे घालवलेली १०-१५ मिनिटे या ट्रेकमधला सुखद काळ म्हणावा लागेल. कारण त्या जंगलात दगडाची उशी करून, कातळाला पाठ टेकवून, झाडाच्या छोट्या सावलीत, बिबट्या वगैरेंची जराही फिकीर न करता पक्ष्यांचे आवाज ऐकत उरलेल्या शांततेत मी चक्क एक डुलकी काढली. बाकीचे लोक बोलत बसले होते पण त्यांच्या गप्पाही जरा वेळाने ऐकू येईनाशा झाल्या.
भटक्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे, याच वाटेवर पुढे एके ठिकाणी चुकण्याची शक्यता आहे. एक वाट सरळ जाते, तर एक झाडीत वळून उजवीकडे जाते. आपल्याला या दुसर्या वाटेने कात्राबाई खिंडीकडे जायचे आहे. तो फाटा लक्षात ठेवायची सोपी खूण म्हणजे त्या फाट्याच्या पुढचे अर्ध्यात वाटेकडे झुकलेले एक झाड. हा फाटा जर लक्षात आला नाही, तर चुकणे अटळ!
कात्राबाई ही रतनगडाच्या दक्षिण-नैऋत्येला पसरलेली एक डोंगररांग. या रांगेच्या एका टोकाला अग्निबाण सुळका (लिंगी) तर दुसर्या टोकाला पायथ्याशी कुमशेत गावच्या वाड्यावस्त्या. पश्चिमेकडे आजोबा डोंगर. कात्राबाई खिंडीतून सह्याद्रीच्या रांगांचे अप्रतिम दृश्य दिसते. एका बाजूला हरिश्चंद्रगड, कलाडगड, वाकडी सुळका, कुमशेतचा कोंबडा, मागे नानाचा अंगठा, नाणेघाट तर विरूद्ध बाजूला रतनवाडी गाव, भंडारदरा जलाशय, कळसूबाई रांग आणि अलंगचा माथा असा विस्तीर्ण प्रदेश दिसतो.
डावीकडे मागे आडवा हरिश्चंद्रगड -
वाकडी सुळका आणि कुमशेत गाव - (उजवीकडचा डोंगर बहुतेक कुमशेतचा कोंबडा असावा)
खिंड उतरून आलो आणि आपण कुठून आलो ते एकदा पाहून घेतले - (डावीकडे कात्राबाई डोंगर)
पुढे वाटेवर ब्रिटीशकालीन मैलाचे दगड सापडले. जुन्या काळात हा पाचनई आणि साम्रदकडे जाणारा हा व्यापारी मार्ग होता.
कुमशेत हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक छोटेसे गाव. आम्हाला गावात न जाता उजवीकडे वळून गुहेरीकडे जायचे होते. रतनवाडी ते कुमशेत असा नियमित ट्रेकही आहे. पण आम्ही गुहेरीच्या दाराने उतरणार असल्यामुळे आमचा खरा 'ऑफबीट' ट्रेक आता सुरू होणार होता. एव्हाना दीड वाजून गेला होता. आम्ही सकाळपासून कुठेही उगाचच अवांतर वेळ घालवला नव्हता, तरीही, त्यामानाने सावकाश चालल्यामुळे वेळेच्या दीडएक तास मागे होतो. कुमशेत गावातल्या बाळूदादाशी ओळख होती. त्याच्याकडे जाऊन मग गुहेरीच्या दाराने उतरायची वाट माहित करून घ्यायची होती.
कुमशेतच्या ठाकरवाडीतून उजव्या हाताला वळलं की एक ऐसपैस वाट आजोबाच्या दिशेने जाते. तिथून कोकणात उतरायला तीन वाटा आहेत - एक गुहेरीच्या दाराने , दुसरी - पाथराघाटाने आणि तिसरी सीतेच्या पाळण्यापासून. त्यापैकी तिसरी वाट खूपच अवघड आहे. पाथराघाटाच्या वाटेमध्ये एके ठिकाणी अवघड पॅच आहे, तिथे कदाचित रोपची गरजही लागू शकते. आमच्याकडे रोपही नव्हता आणि तेवढा वेळही नव्हता. त्यामुळे पुढच्या वेळी पाथराघाटाने उतरू असे म्हणून आम्ही गुहेरीकडे मोर्चा वळवला.
डावीकडे आजोबा डोंगर, मध्यभागी कात्राबाई रांग -
गुहेरीच्या माळावर बाळूच्या छोट्याशा घरट्यामध्ये क्षणभर विसावलो, तीन दिवस इतके वय असलेल्या शेळीच्या कोकरांमध्ये आणि टुणटुणत धावणार्या कोंबडीच्या ओंजळीएवढ्या पिलांमध्ये बसून जेवलो, आणि बाळूला घेऊन पुढे निघालो. एव्हाना सव्वाचार झाले होते.
डावीकडचा डोंगर आजोबा. मधल्या V आकाराच्या पट्ट्यात गुहेरीचे दार आहे.
गुहेरीच्या माथ्यावर पोचलो आणि खाली दूरवर डेहेणे गावाकडे जाणारा रस्ता दिसला. हा आजच्या ट्रेकमधला शेवटचा उतार. पाच वाजले होते. सातपर्यंत खाली उतरून साडेआठ पर्यंत आसनगाव असे ध्येय होते.
ही वाट 'अशक्य' आहे. यापेक्षा गायदरा घाट परवडला. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणार्या सगळ्याच वाटा थोड्याफार फरकाने सारख्याच असल्या तरी ही वाट फारशी वापरात नसल्यामुळे थोडी अवघड आहे! अवाढव्य बोल्डर, अनियमीत उंचीचे सपाट, टोकदार दगड, अरूंद घळीतून जाणार्या वाटा, काही ठिकाणी ८-१० फूट उंचीचे चढ-उतार इत्यादी इत्यादी!
तो पॅच उतरण्याइतपत बनवावा म्हणून कुणा 'दयाळू' गावकरी/भटक्याने ठेवलेला लाकडी खांब -
आमच्यापैकी कुणीही या वाटेने यापूर्वी भटकलं नव्हतं. अगदी निवडकच लोकांना विचारण्यामागे हे मुख्य कारण होते! मी आणि जीवनबाबू यांनी वाट काढत मागच्यांची चाहूल घेत पुढे निघायचं आणि खाली पठारावर पोचायचं ठरवलं. अर्थात एकच वाट असल्यामुळे जोपर्यंत खालीच उतरणारी नाळेची वाट सोडून जंगलात शिरत नाही (तसे करायचे काही कारणही नव्हते), तोपर्यंत चुकण्याची शक्यता नव्हती.
आमच्या डाव्या हाताला आजोबा डोंगराचा कडा आणि सरळ खाली उतरत गेलेली सोंड, उजव्या हाताला तसाच दुसर्या डोंगराचा कडा व त्याला लागून असलेली सोंड. आजोबाच्या आड पश्चिम दिशा. अंधार पडायच्या आत ती सोंड क्लिअर झाली असती तर उजेड अजून थोडा वेळ मिळाला असता. परंतु, सव्वा सहाच्या सुमारास 'आपण अंधार पडेपर्यंत पूर्ण खाली जाऊ शकणार नाही' असं लक्षात आलं. मग बर्यापैकी उजेडाची जागा बघून बाकीच्यांची वाट पाहायचे ठरवले. बरोब्बर अंधार पडत असतांना उरलेले चार वीर आले. कॅमेरा बॅगेमध्ये गेला आणि आता फक्त उतरण्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं. आता मी मागे राहिलो आणि प्रीती आणि जीवनबाबू वाट काढायला पुढे गेले.
जेमतेम १० मिनिटे झाली असतील. आम्ही १०-१५ फुटांच्या एका थेट फॉलपाशी येऊन अडकलो. पूर्ण अंधार पडला होता. वाट थांबली होती. आजूबाजूच्या झाडीमुळे चंद्रप्रकाशाचाही फारसा उपयोग नव्हता. ११ तासांच्या सुरळीत वाटचालीनंतर नेमकी आता अंतिम टप्प्यातच वाट हरवली होती. दोन मिनिटे शांत बसलो आणि मोबाईलची रेंज तपासली. बाळूचे दोन्ही फोन बंद होते पण कुणालचा फोन लागला. त्याने पूर्वी या वाटेने चढाई केली होती. त्याच्याकडून ढोबळमानाने वाट समजून घेतली. आणि बाकीच्या तिघांना जागीच थांबवून प्रीती, राजस आणि मी मागे आलो. एके ठिकाणी डाव्या काठावर (चढताना डाव्या)काहीशी बुजलेली एक वाट कारवीत शिरलेली होती. ते दोघे तिकडे गेले आणि मी नाळेमध्येच त्यांची वाट बघत थांबलो.
काय हवीहवीशी शांतता होती तिथे! समोर - जिथून उतरत आलो ती नाळेची वाट, तिच्या दोन्ही बाजूला पार खालपर्यंत गेलेले डोंगर, त्यावर कारवीचं रान, अंधारात चिडीचूप झालेलं जंगल, काळी झाडं, आकाशात झगमगणार्या चांदण्या, पूर्ण उगवलेली चंद्रकोर, त्या प्रकाशात चमकणारे नाळेमधले ओबडधोबड खडक, मागच्या बाजूला काळोखात हरवलेली गावाची वाट आणि हे सर्व शांतपणे समजून घ्यायचा प्रयत्न करणारा मी!
पाचएक मिनिटात ते दोघे माघारी आले. एक वाट सापडली होती. त्याच वाटेने प्रयत्न करणे हा पर्याय होता. नाहीतर, पुन्हा होतो तिथे येऊन मुक्कामाची तयारी करणे हा पर्याय होता. ती जागा मुक्कामाला तशी बरी होती. थोडंसं खाली वाटेवरच पाणी होते, बाजूला शेकोटीसाठी सुकी लाकडे होती. दोन्ही बाजूला डोंगर असल्यामुळे त्या काहीशा अरुंद जागेत थंडी कमी वाजली असती. अखेर, 'वाट सापडू दे' म्हणून बाप्पाची प्रार्थना केली आणि सात वाजता नाळ सोडून त्या कारवीच्या जंगलात शिरलो. मी सर्वात शेवटी चालत होतो. ही वाट अजिबात मळलेली नव्हती. शिकारी किंवा लाकूडतोडे वापरत असावेत. खडा उतार, स्क्री, गच्च कारवी, पायात अडकणारी मुळं-झुडुपं, पावलांमुळे सळसळत वाजणारा पाचोळा आणि केवळ टॉर्चच्या प्रकाशात दिसणारं जंगल! मला तर बाजूच्या नाळेतल्या झाडीतूनही सळसळ ऐकू येत होती. इथे कुठेही बिबट्याला दर्शनसुद्धा द्यायची बुद्धी होऊ नये असं फार वाटत होतं.
एक गोष्ट मात्र सांगितलीच पाहिजे, वाट नक्की योग्य आहे की नाही हे माहित नसतांनाही कुठलाही गोंधळ, गडबड, घाई होत नव्हती. भीती मुक्कामाची नव्हती, अंधाराची नव्हती, तर पुन्हा वाट चुकलो तर परत मागे चालावं लागेल, त्या अंतराची धास्ती होती. त्यामुळे थोडं अंतर पुढे जाऊन प्रीती-राजसने सिग्नल दिला कीच आम्ही पुढे जात होतो. दिशा बरोबर होती, वाट बरोबर वाटत होती आणि आम्ही पाय भरभर उचलत होतो. जीवनबाबू आणि मी उजेड असतानाच न थांबता पुढे चालत राहिलो असतो तर तो फॉल आम्हाला दिवसाउजेडीच कळला असता, असंही वाटलं. पण हीच वाट असावी असं वाटून उपजत उत्साहाने तो पॅच कसातरी उतरूनही गेलो असतो आणि अंधारात दोघेच खाली फसलो असतो, हीही शक्यता होती! कारण अंधार पडल्यावर जेमतेम १० मिनिटात आम्ही त्या फॉलपाशी पोचलो होतो. अखेर, आपण थांबून सर्वांबरोबर राहण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता याची खातरी स्वतःला पटवून दिली. तासाभराने अखेर कुठेतरी अगदी खर्या वाटेला लागलो आणि अखेर डोंगराच्या कुशीतून उघड्यावर आलो. एव्हाना नऊ वाजून गेले होते.
खाली आलो असलो, तरी गावाचा मागमूसही नव्हता. आता डावीकडे आजोबाला वळसा घालून अजून दोन एक किमी चालायचे होते. पण सपाटीवरून चालायचे असल्यामुळे गुडघ्यांचे हाल थांबले होते. पावणेदहा वाजता - डेहेणे! रतनवाडी सोडल्यानंतर तब्बल चौदा तासांनी आम्ही डेस्टीनेशनला पोचलो होतो. आता आसनगावहून सव्वा अकराची शेवटची ट्रेन होती, ती चुकली असती तर स्टेशनबाहेरच्या मंदिरात मुक्काम करण्याचे ठरवले होते. डेहेणेमध्ये एक जीप मिळाली. त्या बहाद्दराने जेमतेम पाऊण तासात आसनगावला पोचवले. मग स्लो ट्रेन, अर्धवट झोप, मध्येमध्ये एकेकाला उठवत त्याचे स्टेशन आल्याची जाणीव करून देणे आणि मध्यरात्री एक वाजता दादर! हात-पाय चिकारच दुखत होते. इतका अनोखा अनुभव त्यांनाही अपेक्षित नसावा!
एक अतिशय अप्रतिम ट्रेक! १४ तास, १६ ते १८ किमी! अक्षरशः कस पाहणारा, वाट हरवलेला, पण त्याच वेळी वाट शोधण्यातली मजाही पुरेपूर अनुभवू देणारा! आता या ट्रेकमधल्या वाट चुकण्याची पावती जुन्या लौकिकामुळे माझ्या नावावर फाडत असलेली माझी काही प्रेमळ मित्रमंडळी तुम्हाला भेटतील! त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका! कारण पुढच्या ट्रेकला हेच दोस्त सोबत असतील. आम्ही वाटही चुकू आणि त्याचा आनंदही घेऊ! तर असा हा आडवाटांमध्ये लपलेला सह्याद्री आणि असे हे अनुभव!
पुन्हा भेटूच!
(समाप्त)
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/02/blog-post_02.html)
आवडलं. असा तंगडतोड ट्रेक
आवडलं. असा तंगडतोड ट्रेक करायची इच्छा आहे, केव्हा योग येईल ते मात्र माहीत नाही.
ट्रेकिंगची आवड नाही. पण
ट्रेकिंगची आवड नाही. पण युद्धस्य कथा रम्या: म्हणतात तसं वाचायला आवडतं. भटकत रहा आणि लिहीत रहा भौ.
बिबळ्याच्या पंज्याचे ठसे आणि
बिबळ्याच्या पंज्याचे ठसे आणि त्याच्या बछड्यांचेही - जपून जात जा रे, अनाठायी धाडस काय कामाचे ? - पिलांच्या संरक्षणासाठी सर्वच प्राणी काहीही कारण नसताना सर्व शक्तिनिशी चाल करतात - बेधडक.
एक अतिशय अप्रतिम ट्रेक! १४ तास, १६ ते १८ किमी! अक्षरशः कस पाहणारा, वाट हरवलेला, पण त्याच वेळी वाट शोधण्यातली मजाही पुरेपूर अनुभवू देणारा!>>>> जबरी चाल आहे तुम्हा मंडळींची आणि जिगरही जबरदस्त...
लेखन व फोटो - अतिशय सुंदर, खूपच आवडले.
आत्तापर्यंत तरी नुसते फोटोच
आत्तापर्यंत तरी नुसते फोटोच पाहिले आहेत. ग्रेट. मंदारशी सहमत.
-'बेफिकीर'!
थ रा र क !!!!!! प्रत्येक
थ रा र क !!!!!!
प्रत्येक ट्रेकचा वेगळा अनुभव...... अशी वाट हरवुन, शांतता अनुभवायला आणि हो.... बिबट्याने नको त्या वेळेला दर्शन न द्यायला... नशिबच लागतं......
जबरी लिहिलय....
जबरी रे आंदू...
जबरी रे आंदू...
खुप सुंदर प्रची आणि माहिती
खुप सुंदर प्रची आणि माहिती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त भटकंती मजा आली थंडी
मस्त भटकंती मजा आली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थंडी इतकी होती की सकाळी झाडाला पाणी घातले तरी त्याची आपोआप वाफ होत होती! >>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सकाळी सकाळी कुठ्ल्या झाडाला पाणी घालायला गेला होतास
खास वर्णन (नेहमीप्रमाणेच )
खास वर्णन (नेहमीप्रमाणेच
) आणि फोटोही ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रत्येक ट्रेकचा वेगळा अनुभव...... >>>>+१
सकाळी सकाळी कुठ्ल्या झाडाला पाणी घालायला गेला होतास >>>>>:फिदी:
मस्त. मजा आली वाचायला. फक्त
मस्त. मजा आली वाचायला.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फक्त त्यांनी फार सलगी दाखवली नाही तर मला पुढच्या वेळी उरलेल्या इच्छा सांगण्याची संधीही मिळेल>>>
_/\_ तुम्हां
_/\_ तुम्हां सर्वांना!!!!
हात-पाय चिकारच दुखत होते. इतका अनोखा अनुभव त्यांनाही अपेक्षित नसावा!>> अबब! ह्या वाक्यातच कळतंय, कसला ट्रेक असावा हा!!! धन्य रे बाबांनो..
तो अंधार काय वर्णिलास रे, अव्वल!
आणि इतकं स्पष्ट आणि डिटेल मांडतो आहेस ना प्रत्येक ट्रेक तू, की वाटतय आम्ही स्वतः जाऊन येतो आहोत सगळीकडे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एखादा कुणी सांगायला आला ना, की मी आडवाटेच्या ट्रेक ला जातो आहे, रतनगड- डेहेणेच्या की, मी लग्गेच सांगणार आहे, अरे बघ हं,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अग्निबाण सुळक्याला वळसा घालताना खूप चालल्यानंतर एका फाट्यावर दोन वाटा फुटातात, तिथे एक वाट सरळ जाते, तर एक झाडीत वळून उजवीकडे जाते. तुम्ही दुसर्या वाटेने कात्राबाई खिंडीकडे जा. तो फाटा लक्षात ठेवायची सोपी खूण म्हणजे त्या फाट्याच्या पुढचे अर्ध्यात वाटेकडे झुकलेले एक झाड आहे, हां आता तुम्ही जर हे झाड चूकवलेत तर तुमचे चुकणे अटळ!
काहीही म्हणा, हा सगळाच टापू
काहीही म्हणा, हा सगळाच टापू अतिशय सुंदर आहे! रतनगड-भंडारदरा-पाबरगड-सांदण दरी-कळसुबाई-अलंग-कुलंग-मंडण हे दोस्त, पायथ्याशी चित्रात शोभतील अशी छोटी गावं आणि वन्य श्वापदांचा वावर असलेलं देखणं जंगल! कुठल्याही ऋतूत जा, आपल्यासाठी काही ना काही खास असणारच!
एकदम खासमखास...
(वर्तुळ बिबट्याने काढलेले नाही!)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पाचनईवरून पुढे मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगडावर जायचा मार्ग देखील सुंदर आहे..
कर कधीतरी..
तसेही जंगलात वाट हरवणे यातच खरी मज्जा असते. अनुभवी ट्रेकर आपल्या अनुभवावरच मग बरोब्बर वाट शोधतो...
मस्त झालाय ट्रेक,, आजोबाच्या वाल्मिकी आश्रमाची आठवण झाली..
तिथे कित्ती निरव शांतता असते नाही.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असाच एक फोटो तिथला..
मस्त. थंडी इतकी होती की सकाळी
मस्त.
थंडी इतकी होती की सकाळी झाडाला पाणी घातले तरी त्याची आपोआप वाफ होत होती >> डोंगर दर्यात भौतिकशास्त्राचे वेगळे नियम लागू होतात का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सकाळी सकाळी कुठ्ल्या झाडाला
सकाळी सकाळी कुठ्ल्या झाडाला पाणी घालायला गेला होतास >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Mast Mast Mast... tumhi lihit rahaa.. sadhya ase 'UTTAM' lekh vachat basnyavachun kahi paryay nahi..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय हवीहवीशी शांतता होती
काय हवीहवीशी शांतता होती तिथे! समोर - जिथून उतरत आलो ती नाळेची वाट, तिच्या दोन्ही बाजूला पार खालपर्यंत गेलेले डोंगर, त्यावर कारवीचं रान, अंधारात चिडीचूप झालेलं जंगल, काळी झाडं, आकाशात झगमगणार्या चांदण्या, पूर्ण उगवलेली चंद्रकोर, त्या प्रकाशात चमकणारे नाळेमधले ओबडधोबड खडक, मागच्या बाजूला काळोखात हरवलेली गावाची वाट आणि हे सर्व शांतपणे समजून घ्यायचा प्रयत्न करणारा मी! >>>>>> नचिकेत काय हळव पण सुंदर वर्णन केलेस रे
शांतताच तिथे निवारा शोधत आली होती नाहीका?
काहीही झाले तरी हे व्यसन सोडु नकोस
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पु. ले. शु आणि भटकंती साठी सुध्दा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरदस्त वर्तुळ बिबट्याने
जबरदस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्तुळ बिबट्याने काढलेले नाही>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ग्रेट. मंदारशी सहमत.
ग्रेट. मंदारशी सहमत.
मस्तच्...लेखन आणी प्रची
मस्तच्...लेखन आणी प्रची पण...
कधीतरी एकत्र ट्रेक करूयाच...
मनोज... बघुया तो क्षण कधी
मनोज... बघुया तो क्षण कधी येतो ते..
मी पण उत्सुक आहे एकत्र ट्रेक करायला.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरं झालं पायांना वाचता येत
बरं झालं पायांना वाचता येत नाही नाहीतर त्यांनी लगेच मला बाहेर काढलं असतं. एक अप्रतिम ट्रेक व वर्णन.
..आता खाली आल्यावर बाणच्या पायथ्याने परत वर यायचं असेल तर.. माहिती दे!
जबरा वर्णन, एकदम झक्कास !
जबरा वर्णन, एकदम झक्कास ! प्र.ची. अप्रतीम
ट्रेकभर अगदी बरोबर होतो आसं वाटलं वाचताना, एखाद्या मुक्कामान ट्रेक भारी होइल एकदम. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या बात है नचिकेत...सलाम !!!
क्या बात है नचिकेत...सलाम !!! ..... हा छंद जिवाला....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे नची ... अफलातुन ट्रेक
मस्त रे नची ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफलातुन ट्रेक ... मस्त प्रची ... अन झक्कास वर्णन
तुझी लेखनशैली खासच ...
आभार आभार आभार! अरे तुम्ही
आभार आभार आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे तुम्ही सगळे इतके गुंतून वाचताय, त्यामुळे लिहायला मजा येतेय...
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सकाळी सकाळी कुठ्ल्या झाडाला पाणी घालायला गेला होतास - ट्रेकरच्या वाटा ट्रेकरलाच माहित!
काहीही झाले तरी हे व्यसन सोडु नकोस - सुरश, नक्की प्रयत्न राहिल..
गिरीशभौ, u said it!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांकजी, अनाठायी धाडस नाही करणार...
हेम. मनोज, रोमा, ईमीती, जिप्स्या - एकत्र ट्रेक नक्की! आणि लवकरात लवकरच!
आडो आणि यो महाराज - जमवा तुम्हीही!
बागेश्री - काय बोलू? लोभ आहेच, असाच राहू दे!
पाचनईवरून पुढे मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगडावर जायचा मार्ग देखील सुंदर आहे.. - सेनापती, अरे वा! ये दिल मांगे मोअर! :)
अनुभवी ट्रेकर आपल्या अनुभवावरच मग बरोब्बर वाट शोधतो... आणि ही प्रोसेस खूप छाssन असते!
जबरी रे आंदू...>>>> नच्या
जबरी रे आंदू...>>>> नच्या आवडेश.
जबरदस्त ! त्या शेवटच्या
जबरदस्त ! त्या शेवटच्या उतारावर मी तुमच्या सोबत आले तर मला तिथेच सोडून तुम्हाला निघून जावं लागेल नाहीतर हेलिकॉप्टर बोलवावं लागेल.
अश्विनी
अश्विनी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अजिबात नाही अश्विनी.. आम्ही
अजिबात नाही अश्विनी.. आम्ही नवख्या माणसाला बरोबर चढवतो किंवा उतरवतो...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फक्त त्यांनी फार सलगी दाखवली
फक्त त्यांनी फार सलगी दाखवली नाही तर <<<![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
यापैकी काहीही होणार नाही
यापैकी काहीही होणार नाही अश्विनी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही नवख्या माणसाला बरोबर चढवतो किंवा उतरवतो...
+१
Pages