राखण
राखण
थंडी पडली माघाची
येळ झाली राखणची
शाळू गारठला रानी
शाल दिली उन्हानी
असं मऊ मऊ उन्हं
जसं हात ममतेचं
तेची उब या रानाला
देती उभारी पीकाला
आला हरबरा बहरा
तेच निळंजांभळं फूल
दीठीमधी जनमलं
सुख सपानं गोडुंलं
बोरीच्या झाडाभवती
चिमणा किलबिलाट
बोरं चाखता गोडआंबट
वाटा चालती अनवट
रानी पेटली आगटी
धूर चढं नागमोडी
पुढंच ठेसान धराया
धावतीया आगगाडी
ओंबी गव्हाची हिरवी
गार वा-यानं शहारली
व्हट टेकता व्हटाला
भोळी सखू बावरली