राखण

Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 January, 2022 - 02:46

राखण

थंडी पडली माघाची
येळ झाली राखणची
शाळू गारठला रानी
शाल दिली उन्हानी

असं मऊ मऊ उन्हं
जसं हात ममतेचं
तेची उब या रानाला
देती उभारी पीकाला

आला हरबरा बहरा
तेच निळंजांभळं फूल
दीठीमधी जनमलं
सुख सपानं गोडुंलं

बोरीच्या झाडाभवती
चिमणा किलबिलाट
बोरं चाखता गोड‌आंबट
वाटा चालती अनवट

रानी पेटली आगटी
धूर चढं नागमोडी
पुढंच ठेसान धराया
धावतीया आगगाडी

ओंबी गव्हाची हिरवी
गार वा-यानं शहारली
व्हट टेकता व्हटाला
भोळी सखू बावरली

शाळू उभार जोसात
दाणं टच्च कणसात
आलं पाखरु टिपाया
कसं‌ हाकलू म्या बया

आरं आरं पाखरा
जरा कर रे ईचार
हाय माझं बी प्वॉट
आण भरला संसार
© दत्तात्रय साळुंके
3-01-2022

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

@
कुमार १, आबा,अनन्त_यात्री, द्वैत

आपणा सर्वांचे खूप धन्यवाद ...