मैफलींची भैरवी - पं. भीमसेन जोशी
माझ्या आयुष्यात ९ डिसेंबर २००७ ह्या दिवसाची नोंद 'अविस्मरणीय' आणि 'अवर्णनीय' अशीच होईल. माझं वय आत्ता फक्त २४ जरी असलं आणि साधारण ७० वर्षापर्यंत जरी आयुष्य जगेन असं म्हटलं तरीही 'त्या' दिवशी आलेला अनुभव परत उघड्या डोळ्याने बघायला मिळेल का, ह्याचे उत्तर मात्र नकारार्थीच वाटते! दिवसच तसा होता तो. त्याच्या आदल्या दिवशी, शनिवारी, काही सेकंदातच मी ठरवून टाकले होते की काहीही झाले तरी चालेल, आपण पुण्याला सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला जायचेच! ६ डिसेंबर, गुरुवारी सुरु झालेल्या ह्या संगीत सोहळ्याची चर्चा सगळीकडे दरवर्षीप्रमाणे सुरु होती.