किती घेशील दो कराने.... सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

Submitted by प्रज्ञा९ on 13 December, 2011 - 09:47

कधी कधी काही चांगल्या गोष्टी घडतात त्याही आपल्याला अकल्पितपणे! या वर्षी सवाईला मी पुण्यात असेन असं वाटलं नव्हतं आधी. पण आल्यावर मात्र एक तरी सेशन ऐकायला जायचं नक्की केलं. याआधी ३ वर्षांपूर्वी ऐकलं होतं, ऑफिसमधून संध्याकाळी थेट रमणबाग. तो सवाईचा पहिला अनुभव. आणि या वेळचा दुसरा.

पहिला दिवस कामाच्या इतक्या गडबडीत गेला, की सवाई आहे हेच विसरायला झालं. त्या दिवशी पं. अजय पोहनकर, अश्विनी भिडे-देशपांडे यांचं ऐकायचं हुकलं! दुसर्‍या दिवशी जोर केला, आणि संध्याकाळी तरी जाऊ म्हणून कामं उरकली. त्या दिवशी शैला दातार, पं. रोणू मुजुमदार आणि डॉ. बालमुरलीकृष्णन यांचा कार्यक्रम होता. दातारांच्या शेवटच्या अभंगाला आम्ही तिथे पोहोचलो. आधीही मैफिल मस्त रंगली असावी, कारण अभंगाने सुरेख शेवट झाला.

पुढे बासरी, सॅक्सोफोन आणि तालवाद्य जुगलबंदी होती. सॅक्सोफोन मी याआधी केवळ पाश्चात्य सुरावटींमधे ऐकला होता. पण ते वाद्य भारतीय संगीतातही इतकं शोभून दिसतं हे मात्र त्या दिवशी समजलं. तिन्हीसांजेला बासरीचे सूर ऐकून जीव शांत शांत झाला अगदी! रोणूजींनी अलगद सुरांची एक लकेर घ्यावी आणि काद्री गोपालनाथांनी सॅक्सोफोनवर ती तितक्याच नजाकतीने उचलावी......
खूप जमली होती जुगलबंदी! काळजात कळ उठावी इतकं जीवघेणं कोणी वाजवत असेल तर आपण बोलायचं तरी काय! आणि दाद तरी काय द्यायची! आणि या सगळ्यावर कळस म्हणजे तालवाद्यांची जुगलबंदी. पखवाज आणि तबला. डोळ्याची पापणी न लवता मी ती स्क्रीनवर बघत होते. सगळ्या जिवाचे कान होणं म्हणजे काय ते अक्षरशः कळत होतं. शेवटी तर श्वास रोखून ऐकत-बघत होते. म्हणजे ऐकू की त्यांचे तबला-पखवाजावर लयबद्ध थिरकणारे हात बघू असं झालं होतं.

या वेळचा महोत्सव पंडितजींना श्रद्धांजली वाहणारा होता, त्यामुळे पूर्ण महोत्सवावर पंडितजींची प्रेमळ छाया होती. कार्यक्रमात पुढे त्यांना श्रद्धांजली म्हणून रोणूजींनी "पायोजी मैने रामरतन धन पायो.." हे भजन सादर केलं. सोबतीला अर्थातच काद्रीजी आणि तबला-पखवाज. अप्रतिम!

एखाद्या अन्नपूर्णेने केलेल्या अन्नाला जशी घासाघासाला दाद मिळते तशी या कलाकारांना मिळत होती. वन्स मोअर चा घोष सुरू होता. सगळं वातावरणच भारावून टाकणारं होतां. हे कधी संपूच नये असं वाटायला लावणारं....

पण वेळेचं बंधन असल्यामुळे त्यांनी कार्यक्रम आवरता घेतला. पुढे कर्नाटकी संगीत होतं, पण काही कारणामुळे आम्ही थांबलो नाही.

पुढच्या दिवशी पं. जसराज, शंकर महादेवन यांचा पर्फॉर्मन्स होता. त्या दिवशी सगळी दैनंदिन तिकिटं लवकर संपली. मी गेले तेव्हा लोक फाटकाबाहेर उभ्याने ऐकत होते! थोड्या वेळाने मात्र संयोजकांनी पूर्ण प्रवेश मोकळा केला आणि आम्ही आत जाऊ शकलो. काल तिकिट काढूनही मिळाली नाही अशी जागा तिकिट नसताना मिळाले हे नवलच! आत गेलो त्यावेळी शंकर महादेवनच्या कर्नाटकी संगीताचा शेवटचा भाग सुरू होता. खूप गोड वाटलं ते ऐकताना. आधी आलो नाही म्हणून पुन्हा एकदा हळहळलो...
त्यानंतर मात्र तो जे गायला त्याला तोड नाही! ते अफाट होतं. "याचीसाठी केला होता अट्टाहास" असं झालं होतं मला. श्रद्धांजली म्हणून त्याने अभंग गायला सुरूवात केली. मोहक गुंफणच ती! पहिलाच अभंग ऐकला, आणि अर्ध्या रस्त्यातच पेट्रोल संपलं म्हणून ते भरायला गाडी ढकलून आलेला थकवा, पार्किंग नाही म्हणून ते शोधताना झालेली दमछाक, तिकिट नव्हतं तेव्हा झालेली घालमेल...सगळ्यामुळेच कठीण झालेलं मन एकदम मऊ झालं! आपलं मन आतून पाघळतंय ही जाणीव व्हायला लागली. जसजशी अभंगांची रेशमी लड उलगडायला लागली तसतशी ही जाणीव अधिक तीव्र झाली. मग मग तर, आता याच मातीत मिसळून जावं, पुढे काही ऐकू नये असं वाटायला लागलं. जादुई आवाज, गोड चाली आणि जीव ओतून गाणं....शंकर महादेवन, "शंकर महादेवन" न रहाता दोघांत तिसरा तानपुरा झाला होता....तो स्वतःच अखंड अभंग झाला होता!

नकळत डोळे ओलावले! भैरवीचा अपवाद सोडता असं फार क्वचित झालं होतं माझं. दाद देण्याइतकी तरी माणसांत असायचे मी. पण हे काहीतरी वेगळंच होतं. मीच काय, कोणीही बोलू नये, आणि त्याचे अभंग संपताना एक जीवघेणी शांतता असावी असं वाटत होतं. नक्की काय वाटलं ते शब्दांच्या पलिकडचं आहे! पण फार फार काहीतरी उत्कट घडत असताना "इथे आपणच संपावं, पुढचं काही नको" ही जाणीव खरंच इतकी तीव्र होते का? ते अभंग ऐकताना माझ्याही नकळत देहातला आत्माराम म्हणाला असेल, की अखेरचा दिस असाच गोड व्हावा...

त्यानंतर पंडित जसराज गायले. खूप छान झालं तेही. पण त्यांचा मान राखूनही, अगदी खरं सांगायचं तर शंकर महादेवनचं गाणं इतकं आत खोलवर भिनलं होतं, की दुसरं काही ऐकून मनात झिरपायलाही जागा नव्हती.

कदाचित माझ्या या उत्कट किंवा तीव्र भावनेमुळेच असेल, पण नंतरचा एकही दिवस/ सेशन मला जायला मिळालं नाही. जे काही साठलंय ते "तीर्थ विठ्ठल...क्षेत्र विठ्ठल.."
आणि म्हणूनच असेल, पण हे लेखन म्हणजे रूढार्थाने सवाईचा वृत्तांत नाही. "जाणत्या" रसिक श्रोत्याची टिप्पणी नाही. जे जे मनाला भावलं, आणि ज्याने खर्‍या अर्थाने, माणूस म्हणून जन्माला येऊन गाणं ऐकायला आवडतंय, या गोष्टीचं सार्थक झालंय असं मला वाटलं त्याला दिलेली दाद आहे. काही ठिकाणी ते भावविव्हल वाटू शकतं, शब्दबंबाळही झालं असेल, पण जे आहे ते निखळ प्रामाणिक आहे! जिथे सरस असेल तिथे पूर्ण श्रेय कार्यक्रमाचं, आणि जिथे कमी असेल ते माझं. त्यात न्यून ते पुरते करून घ्याल अशी आशा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यू ट्युबवर आहे का तो शंकर महादेवन चा परफॉर्मन्स?
प्रज्ञा, सुंदर लिहिलं आहेस. गाणाराआणि ऐकणारीएकझालेली जाणवलंअगदी.

छान !!

प्रज्ञा, छानच लिहीलंस!!

नंदिनी, तुला लिंकबद्दल किती धन्यवाद देउ Happy

भा.पो.

सवाईच्या CD किंवा DVD का बनवत नाहित देव जाणे. किंवा बनवत असतील तर कुठे मिळतील देव जाणे.

प्रज्ञा, सुंदर लिहीलेस. त्या क्षणांना अचूक शब्दात बांधणं मुळीच शक्य नसतं फक्त अनुभवत राहायचं, साठवून ठेवायचं.

असामी, पुण्यात लक्ष्मीरोडच्या टिळक चौकाकडच्या टोकाशी, दुचाकी पुलावर जातो त्या कॉर्नरजवळ पंकज दुकान आहे. तिथे एकूणच खूप मोठा संग्रह आहे शास्त्रीय संगीत आणि इतर सगळ्या प्रकारच्या CD आणि DVD चा. तिथे काही काही रेकॉर्डिंग्स आहेत सवाईची. जुनीपण आहेत. नवीन आली असतील तर माहिती नाहीत. अर्थात प्रत्येक वर्षाची अशी कलेक्शन्स असणं कठीण आहे. पण जी विक्रीसाठी अधिकृतपणे रेकॉर्ड केली गेली ती असावीत तिथे.

छान लिहिलंयस गं.
सातवी-आठवीपासून दरवर्षी तीन रात्रभर सवाई ऐकायला जायचं हा प्रघात होता. आईच घेऊन जायची त्यामुळे परवानगी इत्यादीचा प्रश्नच नव्हता. मग कॉलेजमधे गेल्यावर ग्रुप मिळून जायला लागलो आम्ही. डिसेंबरमधे सवाईला गेलो नाही तर कर्तव्यात कसूर होणार असं वाटायचं आम्हाला. इतकं ओतप्रोत ऐकलंय त्या काही वर्षांमधे ते सगळं आठवलं. पण रात्रभराची मजा काही वेगळीच असायची. रात्रभराचं सवाई बंद झाल्यावर एकदाच गेले होते. तेवढी मजा नाही आली पण तरी अप्रतिमच होतं सगळं.

सगळी रेकॉर्डिंग्ज अलूरकरांकडे असायची पूर्वी. आणि प्रज्ञा म्हणतेय ते पंकज ऑडिओ. त्यांच्याकडेही असायची/ असतात.

फार सुंदर अनुभव लिहिलात.
नशीबवान आहात. सवाई सारखा दुसरा महोत्सव नाही.
काद्री गोपालनाथ आणि रोणू मजूमदारांच्या जुगलबंदीचा एक व्हीडिओ आहे यूट्यूबवर.
पण शंकर महादेवनचा मिळाला नाही.

>काळजात कळ उठावी इतकं जीवघेणं कोणी वाजवत असेल तर आपण बोलायचं तरी काय! आणि दाद तरी काय >द्यायची!
या अनुभवाचा अनुभव आहे Happy
असंच लिहीत रहा.

छान

रोणू मुझुमदार वाजवतात त्यातल्या बर्‍याच बासर्‍या माझ्या बाबांनी केलेल्या आहेत.
मला अजूनही प्रत्यक्ष ऐकायचा योग आलेला नाही Sad

Pages