काही नोंदी
१. कोथरूडमध्ये कर्वे पुतळ्याजवळचं, 'भावार्थ.. पुस्तकं आणि बरंच काही' नावाचं दुकान. कलेक्शन आणि विषयांची, लेखकांची रेंज चांगलीय. एकाच शेल्फच्या एका कप्प्यात सेम पुस्तकाच्या थप्प्याच्या थप्प्या रचलेल्या दिसत नाहीत. काही दुकानांमध्ये एकेका लेखकाला/लेखिकेला एकेक कप्पा ॲलॉट केलेला दिसतो. इथं तसं नाही. दोन विरूद्ध टोकाचे लेखकही इंटरेस्टिंगली शेजारी शेजारी दिसू शकतात. दरवाजा ढकलून आत गेल्यावर बाहेरची दुनिया कटऑफ. समोर सदोदित वाहणारं ट्रॅफिक आहे, पण आत किंचितही आवाज जाणवत नाही. खिडक्यांच्या काचांतून झिरपत आत येऊन शालीनपणे पसरणारा नैसर्गिक उजेड.