चांदो आणि मी!
Submitted by भानुप्रिया on 6 April, 2011 - 09:05
मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..
'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..
'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'
चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..
'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'
गुलमोहर:
शेअर करा