डिस्क्लेमर: हा अनुभव "आपल्या आयुष्यातले थरार" अशा एका धाग्यावर पूर्वी मी प्रतिसाद म्हणून लिहिला होता. तोच इथे वेगळा धागा म्हणून चिकटवत आहे. त्यामुळे ज्यांनी आधी वाचलाय त्यांच्यासाठी पुनरुक्ती होईल. पण माझ्या लिखाणाच्या यादीत या अनुभवावर सुद्धा लेख असायला हवा असे वाटल्याने हा कॉपीपेस्टप्रपंच. शिवाय, मला लागलेल्या ठेचेमुळे योग्य तो बोध घेऊन पुढचे काहीजण व काहीजणी शहाणे होतील हा सुद्धा हेतू.
---
"आपल्या नात्याला ५-६ वर्षे झाल्यामुळे तोचतोचपणा आला आहे"
"काहीतरी थ्रिलिंग आणि इंटरेस्टिंग झालं पाहिजे"
"ह्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे"
"काय?"
"विबासं"
तो फक्त हसला.
"असं छद्मी हास्य करून काही साध्य होणार नाहीये. मला काहीतरी वेगळं केलंच पाहिजे आणि ते म्हणजे विबासं. हे माझं निश्चितपणे ठरलंय"
"बरं, मग? माझा काय संबंध? तुला हवं ते करायला तू स्वतंत्र आहेस"
गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ...