नवसुंदरी:
म्हातारीच्या स्वप्नामध्ये
आली एक काळी परी
ठेंगणी ठुसकी कुबडी देखणी
भासली तिची सूनच खरी
डोक्यावरती केस तोकडे
उनाड वात्तड ताठ्ठ उभे
अंगावरती कपडे थोडके
ठिगळ फाटके चोहीकडे
कानापेक्षाही लांब होते
तिच्या कानातील कानातले
जणू टोले ठोकत होते
लोलक, शोभिवन्त घड्याळातले
कानामधल्या तारांमध्ये सुरेल
गाणे डोलत होते
ओठांचा चंबू मानेचा तंबू
तालावरती नाचत होते
गोंदला होता एक छोटा
मोर डाव्या गालावरती
नक्षी सुबक कोळी जाळ्याची
कोरली होती कपाळावरती
तुझे काय ते तुला माहीत
शब्द माझे खरे आहेत
पुसट असतील अंधुक असतील
उच्चार माझे तुझेच आहेत.
तुझे काय ते तुला माहीत
आकाश माझे निळे आहे
कुठे चांदण्या लख्ख झळकित
कुठे मिट्ट काळोख आहे
तुझे काय ते तुला माहीत
गर्द झाडी हिरवी आहेत
रंगीत फुले मनात गंधित
शब्द अस्सल ग्वाही आहेत
मला एकदा चांदण्यात बसू दे
माझेच गीत उजळताना पाहू दे
श्वेतशुभ्र परी निश्चल लहरी ते
आकाश पाझरून चिंब बरसू दे
नागमोडी लहर अंधुक आशा ती
क्षितीजात गर्जून कधी न्हाऊ दे
शब्द नाजूक बावरी प्राजक्त ते
भाव साजूक साजरी झुळूक दे
अनावृत मन मवाली मखमल ती
हिमनगात गोठून गच्च बिलगू दे
प्रवाह तरल मृदुल उष:किरण ते
अर्थ कोमल शीतल दीपस्तंभ दे
आशयघन नाद प्रखर तलवार ती
व्याघ्रवध साधणारे हरीण बनू दे
मला एकदा चांदण्यात बसू दे
माझेच गीत उजळताना पाहू दे
- कवी : अतुल चौधरी
घाल आजोळ ओंजळीत
पिकला किती ग मोहोर
शुष्क क्षितिज वैराण
मरुबन मोहरला दाटीत ।
मागे वळून वाहतो
नदीचा उलटा प्रवाह
सांज आळवून गातो
स्वराचाअभोगी दाह।
नितळ शांत मनोहर
संथ स्तब्ध दर्शन
कुणी फेकला का दगड
उगाच तरंग खोलवर।
बदलले ऋतू गालात
हरवले सूर तालात
नवी पालवी खोडाला
सर्द वाळवी मनाला।
अमर्याद वेगे मावळती
किनारी स्पृहा निश्चल
अश्वत्थ मागतो मनी
कैलास लेणे शाश्वती।
कवितेचे नाव: याद
वीज कडाडली अघोरी पाऊस
पिंपळ पाणावर घसरे तुषार
उतार पाण्याला की मनाला लहान
कोरड गडाडली का अवेळी तहान
आली जोरात जशी धरणफुटी
प्रसरून रंध्रात कशी पाझरली
उजाळून क्षण कशी भरली ओटी
आठवण तुझी तशी दाटून ओसरली
- अतुल चौधरी.
-------------------- --------------- -----------------------------
रसग्रहण:
कविता: मुन्नी
माणसाच्या मनातून निघणा-या ज्वालामुखीचा तिरस्कारमय लोळ
तुला अजून स्पर्शायचाय, मुन्नी!
शुभ्र सूर्यप्रकाशाप्रमाणे जीवनात सरपटताना भेटणारी सगळीच
जेव्हा ओकत होती विश्वासघाताची नागेरी गरळ
आणि
माझ्या श्रद्धेच्या समुद्राला रक्तरंजित करणारा कालवा
फसवणुकीच्या तीव्र आसुडांमुळे जेव्हा ओसंडून जात होता
तेव्हा रखरखत्या उन्हात अनवाणी जळालेल्या तळव्यांना
दुधाच्या सायीइतक्या मऊ बर्फाचा थंडावा
मुन्नी, तू कुठून बरे आणलास?
गद्दारीच्या भीषण डंखानी करपण्याची भिती वाटत नाही का ग?