कोणा सांगावयाचे?
Submitted by निखिल मोडक on 21 June, 2023 - 17:03
काटे वाट्यास आले, हे ना सांगावयाचे
केले जखमी फुलांनी, कोणा सांगावयाचे?
नव्हता अंधार नशिबी, हे तो खरे जरीही
मज पोळले दिव्यांनी, कोणा सांगावयाचे?
जो मार्ग चाललो तो, होता खरे सुगंधी
ते रान केतकीचे, कोणा सांगावयाचे?
सत्यात उतरली स्वप्ने, नसता ध्यानीमनी हे
उडवून झोप ती गेली, कोणा सांगावयाचे?
झाल्या असतील कविता, मागे काही बऱ्याही
मज काळजी नव्याची, कोणा सांगावयाचे?
©निखिल मोडक