जावे त्यांच्या वंशा!
रात्रीचे बारा वाजत आले होते, इकडे मधुराच्या घरातून बेसनाचा खमंग घमघमाट सुटलेला. एका शेगडीवर बेसन तर दुसऱ्या शेगडीवर तिने चिवड्यासाठीपोहे भाजत ठेवलेले. एकोणी वेलची सोलून वेलची पूड करायची तयारी. बरं हे सगळं एकदम हळू आवाजात चाललेलं नाहीतर परत पिल्लं उठून बसतील आणि फराळ सगळा तसाच राहील.
ऐन दिवाळीच्या तोंडावर रिलिज आल्यामुळे अख्खा आठवडा रोजचाच उशीर होत होता. शेवटी आज रिलिज झालं एकदाच. पळतच म्हणजे रिक्षात बसून मनाने पळत घरी आली. आठ वाजून गेले होते. सांभाळणारी ताई, "आज पण उशीर झालाच..", अस काहीस पुटपुटत लगेच सटकली.