जावे त्यांच्या वंशा!

Submitted by छन्दिफन्दि on 1 November, 2023 - 23:31

रात्रीचे बारा वाजत आले होते, इकडे मधुराच्या घरातून बेसनाचा खमंग घमघमाट सुटलेला. एका शेगडीवर बेसन तर दुसऱ्या शेगडीवर तिने चिवड्यासाठीपोहे भाजत ठेवलेले. एकोणी वेलची सोलून वेलची पूड करायची तयारी. बरं हे सगळं एकदम हळू आवाजात चाललेलं नाहीतर परत पिल्लं उठून बसतील आणि फराळ सगळा तसाच राहील.

ऐन दिवाळीच्या तोंडावर रिलिज आल्यामुळे अख्खा आठवडा रोजचाच उशीर होत होता. शेवटी आज रिलिज झालं एकदाच. पळतच म्हणजे रिक्षात बसून मनाने पळत घरी आली. आठ वाजून गेले होते. सांभाळणारी ताई, "आज पण उशीर झालाच..", अस काहीस पुटपुटत लगेच सटकली.

इकडे हिने पटापट मुलांची जेवणं अटोपली. नवऱ्यावर मुलांना सोपवून ती स्वयंपाकघरात घुसली.ओटा आवराला. वाण्याने पाठवलेले सामान कधीचे तिची वाट पाहत पडलेलं.सगळया गडबडीत ताईला फक्त खोबऱ्याचे काप करायला तेवढे जमले होते.

रात्री दहा वाजता मधुराच्या फराळाला सुरुवात झाली.

"मिळायला काय सगळं बाहेर मिळतं, पण लाडवात ना वेलची ना जायफळ. म्हणतात साजूक तुपातले पण कधीचे असतात, आणि वास पण येतो दोनच दिवसात. उगाच छोट्याला खोकला वगैरे झाला तर काय घ्या? चिवड्यात काजू आणि खोबरं अगदी शोधलं तर एक दोन नावापुरतेच. आपल्या पिल्लानी आवडीने फराळ करावा म्हणून हा सारा आटापिटा. नाही तर काय एक फोन फिरवला की काम झालं. पण हे shortcuts काही समाधान मिळवून देत नाहीत हे मात्र खर." मधुराच स्वगत.

***

फार नाही अगदी सात एक वर्षांपूर्वीची गोष्ट. मधुराची लग्नानंतर पहिलीच दिवाळी. नऊ वाजता दरात चप्पल काढत असतानाच सासूबाईनी विचारलच," अग येवढा उशीर? ऑफिस मध्ये खूप काम होतं का? "

"नाही. अहो मी आज ड्रेस बघायला गेलेले. एकही आवडला नाही , चार दुकान बघितली. आता उद्या परत जायला लागेल. आता ड्रेस कधी घेणार, मग लागलं तर अल्टरेशन, मॅचिंग चे earrings.. कस काय जमणारे सगळं? दिवाळी party tar तोंडावर आलिये.

"स्वतच्याच नादात त्यांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे काना डोळा करत ती बेडरूम मध्ये गेली .रात्री जेवताना सासऱ्यानी विषय काढलाच.

"अग तू जरा फराळात हिला काही मदत कर."

"अहो बाबा, आजकाल सगळं काही तयार मिळतं. अगदी छान असतं. कुठे घरी करत बसायचं? मी कधीची आईना सांगतेय आस्वाद मध्ये सगळी ऑर्डर देते फराळाची. पण त्या ऐकताच नाहीयेत. कशाला तासन् तास खपून घरी करत बसायचं ?"

" अग पण त्याला काय घरची सर येणारे का?"

" खरंच खूप छान मिळतं. करू का ऑर्डर?"

दोन वर्षांपूर्वी आई बरोबर झालेल्या संभाषणाचा रिपीट टेलिकास्ट म्हणा ना हवं तर. तेव्हा आईने ऐकलं नाही आता हे पण ऐकत नाहीत.
"ह्यांना सहज सोप्या गोष्टी आवडतच नाहीत का?," स्वतःच्या मनाशी पुटपुटत तिकडून सटकली.
"दिवाळी तोंडावर आलीये. सगळं शॉपिंग बाकी आहे. परत ऑफिस आहेच. करा काय हवं ते. "

****

जुन्या जिव्हाळ्याच्या आठवणीतून बाहेर पडत, इकडे खमंग भाजलेलं बेसन उतरवून , तिने चिवड्याच्या फोडणीसाठी कढई गॅसवर चढवली.

सात वर्षांपूर्वीच्या जुन्या मधुरावर गालात हसत, आईच नेहमीचं वाक्य पुटपुटली, "जावे त्यांच्या वंशा! हेच खरं!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< " अग पण त्याला काय घराची सर येणारे का?" >>

विकतचा फराळ पण कुणाच्या तरी घरीच बनलेला असतो ना? जिवाचा इतका आटापिटा करून स्वतःच्या हातानेच फराळ बनवायचा अट्टाहास कशासाठी? IKEA effect वाटतोय मला तरी.

सण आनंद देण्या घेण्यासाठी असतात.
कुणाला पदार्थ करून खिलवण्यात वाटतो. तर कुणाला इतर गोष्टीमध्ये वाटत असेल.
आपली मते काळानुरूप बदलतात सुद्धा. त्यामुळे चालायचंच.
कधी फराळ विकत आणा कधी घरी बनवा. खाणं महत्वाचं Proud
कुणी कुणावर जबरदस्ती करु नये आपल्या मतांची!
जगा आणि जगू द्या हे तत्व पाळलं की झालं.

<< जगा आणि जगू द्या हे तत्व पाळलं की झालं. >>

पण हे होत नाही ना बऱ्याचदा.
१. फराळ करून फेसबुक, इंस्टाग्रामवर फोटो टाकण्याची जास्त हौस असते.
२. मी इतकी राब राब राबतेय आणि तुम्हाला माझ्या फराळाचे कौतुक नाही, असे नवऱ्याला सुनावणे.
ही २ उदाहरणे पाहण्यात आहेत.

हो, पण आपण लोड नाही घ्यायचा. Chill करायचं.
असंही दुसरा पर्याय काय असतो अशावेळी!
जास्त कुणी जबरदस्ती करत असेल तर चिवडा घरी बनवायचा, सोपा असतो. Happy आणि जी व्यक्ती आग्रही आहे तिलाही सामील करून घ्यायचं कामात.

<< रात्री दहा वाजता मधुराच्या फराळाला सुरुवात झाली. >>

अशी परिस्थिती असेल तर माझे तरी मत असेल की फराळ करू नकोस, विकत आण. To each his/her own.

ती स्वतः आनंदाने करतेय तर करु दे की!

कारण आई झाल्यावर, विशेषतः new moms ना हौस असते. एखादीला इच्छा नसेल तर तिने अजिबात करु नये.

मला वाटतं काही वर्षांनंतर हौस मागे पडत असावी.
मग आणावे विकत

ती स्वतः आनंदाने करतेय तर करु दे की! >> बरोबर, हे मात्र खरे आहे.

<< shortcuts काही समाधान मिळवून देत नाहीत हे मात्र खर." >>
शिवाय bragging rights पण मिळत नाहीत.

ती स्वतः आनंदाने करतेय तर करु दे की!
कारण आई झाल्यावर, विशेषतः new moms ना हौस असते. एखादीला इच्छा नसेल तर तिने अजिबात करु नये.>>>
दोन्ही खर आहे.

मला वाटतं ही गोष्ट एखादी व्यक्ती आधी वेगळीच असते आणि परस्थितीने पूर्ण उलट विचार करायला लागते...
आयुष्यातील विरोधाभास आणि त्यातून होणारी मिश्किल कथा..

<<<मला वाटतं ही गोष्ट एखादी व्यक्ती आधी वेगळीच असते आणि परस्थितीने पूर्ण उलट विचार करायला लागते...
आयुष्यातील विरोधाभास आणि त्यातून होणारी मिश्किल कथा..>>>
सहमत.. छान आहे कथा..

Respect !!

मला वाटतं ही गोष्ट एखादी व्यक्ती आधी वेगळीच असते आणि परस्थितीने पूर्ण उलट विचार करायला लागते>>> खरंय. आता तर घरकोणी पदार्थ वापरून घरगुती बायकांकडून फराळ मिळायला सुरूवात झालिये Happy वर्कींग मॉम्स साठी गूड न्युजच! गॄह-उद्योग.
मी शंकरपाळे & शेव घरी करते. बाकी उस्तवार कोण करत बसणार Sad

छान कथा!

आयकिया इफेक्ट >> अन्नाच्या बाबतीत ही तुलना नाही पटत. आवड नाही किंवा घरी करणे काही करणाने शक्य नाही तर लोड न घेता बाहेरुन मागवायचा पर्याय जरुर शोधावा. पण आवड आहे, वेळ काढणे शक्य आहे तर घरी शिजवलेल्या अन्नाची एक वेगळीच मजा असते.
त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा, नव्या आठवणी तयार होणे, काही परंपरेने चालत आलेले तर काही नवे. 'हे मी केले' म्हणत कौतुक करुन घेणारी नवी पिढी, दुसर्‍या संस्कृतीतल्या कुणीतरी आपल्या आजीची रेसीपी शेयर करत तुम्हाला सामावून घेणे हे सगळेच आयुष्य समृद्ध करणारे. जोडीला खर्चाचा विचार करायचा तर सामान्य व्यक्तीसाठी घरचे अन्न बरेचदा कॉस्ट इफेक्टिवही असते.

धनवन्ती, स्वस्ति, मनीमोहोर, aashu29, स्वाती२ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा, नव्या आठवणी तयार होणे, काही परंपरेने चालत आलेले तर काही नवे. 'हे मी केले' म्हणत कौतुक करुन घेणारी नवी पिढी, दुसर्‍या संस्कृतीतल्या कुणीतरी आपल्या आजीची रेसीपी शेयर करत तुम्हाला सामावून घेणे हे सगळेच आयुष्य समृद्ध करणारे. >>> अगदी पटल.

जिवाचा इतका आटापिटा करून स्वतःच्या हातानेच फराळ बनवायचा अट्टाहास कशासाठी?>>>

जेव्हा घरी पदार्थ बनवतो
ब्रेड, कूकीज, केक बेक केल्याचा वास, बिर्याणीचा घमघमाट, बेसन भाजल्याचा खमंग वास, किंवा गोड केळ-वेलची घातलेल्या साजूक तुपाचा दरवळ तेव्हा स्वयंपाक घरात खेचून नेतो. माझं आपलं एक मत. मला पण दरवेळी सगळं जमतच असं नाही

प्रत्येकाने घरीच करावं असां काही आग्रहही नाही.
शेवटी प्रत्येकाची सोय, प्राधान्यक्रम आणि आवड यावरून जो तो काय करायच ते ठरवतो.

छानच जमली आहे गोष्ट. >> +1
बेसन भाजल्याचा खमंग वास, किंवा गोड केळ-वेलची घातलेल्या साजूक तुपाचा दरवळ तेव्हा स्वयंपाक घरात खेचून नेतो. माझं आपलं एक मत. मला पण दरवेळी सगळं जमतच असं नाही >> अगदी अगदी.
बेसन भाजल्याचा वास, चकलीचा खमंग वास. ह्याशिवाय दिवाळीचा माहौल तयार होत नाही असं वाटतं. लहानपणापासून हे वास त्या सणाशी जोडले गेलेत म्हणून.

नेहमी ठरवायचं पण वेळेचं गणित न जमल्याने दरवर्षी .. अगदी न चुकता दरवर्षी दिवाळीच्या आदल्या रात्री उशिरा लायटिंग च्या माळा लावायच्या. मग एकेकजण ही राहिलीय की ही पण इथे लावू करत झाडून सगळ्या धड माळा लावायच्या. नन्तर दुरुस्त करून आणू म्हणत बंद पडलेली माळ परत खोकयत ठेवायची. आता दिवाळीच्या गडबडीत लगेच दुरुस्त करून मिळत नाही म्हणून. (ती माळ नंतर म्हणजे गणपतीत निघते बाहेर) लागली तर एखादी नवी आणायची. सगळ्या माळा, आकाशकंदील मनासारखा झगमगतोय बघून पाठ टेकायची की 3- 4 तासात कुठंतरी धाणकन फटका उडतोय की झोप उडलीच. साडे तीन , चार वाजत असतात, अंधार असतो , आजूबाजूला रोषणाई लागलेली असते मग पहिले बटणं दाबून सगळ्या माळा अजुन ओके आहेत ना बघायच्या Lol अवांतर झालं ओघात. सॉरी छन्दिफन्दि.

त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा, नव्या आठवणी तयार होणे, काही परंपरेने चालत आलेले तर काही नवे. 'हे मी केले' म्हणत कौतुक करुन घेणारी नवी पिढी >> +1.
हा लेख मी आत्ता वाचला. दुसऱ्या धाग्यावर 'कौतुक कोणाला आवडत नाही' हे मी तुम्हाला धन्यवाद देताना म्हणलय. अगदी खरय. योगायोगाची गम्मत वाटली.

नेहमी ठरवायचं पण वेळेचं गणित न जमल्याने दरवर्षी .. अगदी न चुकता दरवर्षी दिवाळीच्या आदल्या रात्री उशिरा लायटिंग च्या माळा लावायच्या. मग एकेकजण ही राहिलीय की ही पण इथे लावू करत झाडून सगळ्या धड माळा लावायच्या. नन्तर दुरुस्त करून आणू म्हणत बंद पडलेली माळ परत खोकयत ठेवायची. आता दिवाळीच्या गडबडीत लगेच दुरुस्त करून मिळत नाही म्हणून. (ती माळ नंतर म्हणजे गणपतीत निघते बाहेर) लागली तर एखादी नवी आणायची. सगळ्या माळा, आकाशकंदील मनासारखा झगमगतोय बघून पाठ टेकायची की 3- 4 तासात कुठंतरी धाणकन फटका उडतोय की झोप उडलीच. साडे तीन , चार वाजत असतात, अंधार असतो , आजूबाजूला रोषणाई लागलेली असते मग पहिले बटणं दाबून सगळ्या माळा अजुन ओके आहेत ना बघायच्या>>> मस्त, दिवाळी पहाट आणलीत की डोळ्यासमोर!

मला वाटतं ही गोष्ट एखादी व्यक्ती आधी वेगळीच असते आणि परस्थितीने पूर्ण उलट विचार करायला लागते...
आयुष्यातील विरोधाभास आणि त्यातून होणारी मिश्किल कथा..>> व्यक्तीबाबत असं घडू शकतं. ही गोष्ट वाचून आता तशा काही व्यक्ती वा प्रसंग आठवताहेत.

दिवाळी एक संस्कृती आहे. परंपरा आहे. अंधाराला चिरत प्रकाशाकडे जाणारी पाऊलवाट होय. तिचे कंत्राटीकरण होऊ देऊ नका. स्वत:च्या हाताने बनविलेले दीपावली पदार्थ गोड मानून खा. IKEA effect होऊ देऊ नका हा प्रचार करायला हवा

स्वत:च्या हाताने बनविलेले दीपावली पदार्थ गोड मानून खा.>>
म्हणजे घरात प्रत्येकाने स्वतःच्या हाताने बनवून ना?