भोपाळ जंक्शनवर गाडी थांबल्यावर मी खाली उतरून जरा फलाटावर रेंगाळलो. इथे आमच्या ‘राजधानी’चे चालक, गार्ड, तपासनीस, पोलीस बदलले गेले. भोपाळ जं.वर नियोजित वेळेच्या दोन मिनिटं आधी दाखल झालेली आमची ‘राजधानी’ सुटली मात्र नियोजित वेळेच्या 4 मिनिटं उशिरा म्हणजे मध्यरात्री 2:09 वाजता.
खेरवाडीला संध्याकाळी 6:48 वाजता तपकिरी रंगातील कल्याणच्या WCAM-2 इंजिनासह संक्रेल गुड्स टर्मिनलकडून आलेली आणि छत्रपती शिवाजी महाराज (ट) कडे निघालेली पार्सल विशेष एक्सप्रेस क्रॉस झाली. 19:05 वाजता लासलगाव आले. स्टेशन ओलांडत असताना तिथे आणखी एक एक्सप्रेस गाडी लूप लाईनवर उभी करून आमच्या ‘राजधानी’ला मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. ती होती लोकमान्य टिळक (ट)हून पाटण्याला निघालेली एक्सप्रेस. लासलगाव स्टेशनमधून ‘राजधानी’ बाहेर पडत असतानाच WAG-7 कार्यअश्वांची एक जोडी गाडीविनाच नाशिक रोडकडे निघून गेली.