उद्या 21 नोव्हेंबरला मुंबईतील माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ‘भा. नौ. पो. विशाखापट्टणम’ (आय.एन.एस. विशाखापट्टणम) ही स्वदेशी अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका भारतीय नौदलात सामील होत आहे. ती भारतीय नौदलातील आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक, सर्वात मोठी आणि हिंदी महासागरातील सर्वांत शक्तिशाली विनाशिका ठरणार आहे. ही विनाशिका भारताच्या आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक, सामरिक, कौशल्यात्मक ताकदीचे प्रतीक बनणार आहे.
8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही अशीच भूमिका बजावत राहील. हवाईदलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे 8 ऑक्टोबरला हिंदन हवाईदल स्थानकावर मुख्य आणि दिमाखदार समारंभ पार पडला.