उद्या 21 नोव्हेंबरला मुंबईतील माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ‘भा. नौ. पो. विशाखापट्टणम’ (आय.एन.एस. विशाखापट्टणम) ही स्वदेशी अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका भारतीय नौदलात सामील होत आहे. ती भारतीय नौदलातील आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक, सर्वात मोठी आणि हिंदी महासागरातील सर्वांत शक्तिशाली विनाशिका ठरणार आहे. ही विनाशिका भारताच्या आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक, सामरिक, कौशल्यात्मक ताकदीचे प्रतीक बनणार आहे.
भारताने आपल्या नौदलाची त्रिमितीय शक्ती वाढवण्यासाठी 1990च्या दशकापासूनच विविध प्रकल्प हाती घेतले. ‘प्रोजेक्ट-15 बी’ असाच एक प्रकल्प. भारतीय नौदलासाठी ‘प्रोजेक्ट-15 बी’अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञान व आरेखनावर आधारित अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका बांधल्या जात आहेत. ‘प्रोजेक्ट-15 बी’मध्ये बांधल्या जात असलेल्या विनाशिका भारतात बांधण्यात आलेल्या आजपर्यंतच्या सर्वांत अत्याधुनिक आणि मोठ्या विनाशिका आहेत.
‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील युद्धनौकांवर स्वनातीत (सुपरसॉनिक) क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसही ‘प्रोजेक्ट-15 बी’मधील युद्धनौकांवर बसविण्यात आलेले आहे. ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील विनाशिका 7400 टन वजनाच्या आहेत. ताशी 30 सागरी मैल किंवा 56 किलोमीटर वेगाने या विनाशिका समुद्रात संचार करू शकतात. समुद्रात दूरवर टेहळणी, पाणबुडीविरोधी कारवाई, मदत आणि बचाव अशा विविध मोहिमांसाठी यातील प्रत्येक विनाशिकेवर दोन सी-किंग, धृव किंवा कामोव्ह-31 ही हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय आहे. विनाशिकेच्या दिशेने येत असलेल्या हवेतील लक्ष्याचा 100 ते 150 किलोमीटर दूरवरूनच शोध घेऊन त्यावर हल्ला करण्यासाठी बराक-8 ही क्षेपणास्त्र यंत्रणा ‘विशाखापट्टणम’वर बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर तोफा आणि शत्रुच्या पाणबुड्यांचा वेध घेण्यासाठी पाणतीर (torpedos) आणि रॉकेट्स या विनाशिकेवर बसवलेली आहेत.
निळ्या पाण्यावरील नौदल अशी ख्याती मिळविलेल्या भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजांनुरुप ‘प्रोजेक्ट-१५ बी’मधील स्टेल्थ विनाशिका बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हिंदी महासागरातील भारतीय नौदलाचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिका उपयुक्त ठरणार आहेत. मात्र त्याचवेळी एखाद-दुसऱ्या युद्धनौकेच्या सामिलीकरणामुळे भारतीय नौदलाला आवश्यक असलेली साधनसामग्रीची पूर्तता होणे कठीण आहे. आज रखडलेल्या प्रकल्पांमुळे आणि नवीन शस्त्रसामग्री प्राप्त करण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे भारताच्या सुरक्षेसमोरील आव्हाने आणि नौदलाच्या गरजा यांचा मेळ बसत नाही आहे. इतकेच नाही तर, आपली सामरिक पोहोच सिद्ध केलेल्या भारतीय नौदलाला साधनांबरोबरच मनुष्यबळाचीही कमतरता भासत आहे. त्याचा नौदलाच्या तयारीवर विपरित परिणाम होत आहे.
सुरुवातीच्या नियोजनानुसार ‘प्रोजेक्ट-15 बी’मधील पहिली विनाशिका 2015 च्या मध्यावर नौदलाला मिळणे अपेक्षित होते. त्यानंतर ती मुदत जून 2018 पर्यंत वाढवली गेली. त्यानंतरच्या उर्वरित तीन युद्धनौका 2024 पर्यंत दर दोन वर्षांनी एक याप्रमाणे नौदलात सामील करण्याची योजना होती.
या विषयावरील लेखाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/11/blog-post_19.html
छान माहिती.
छान माहिती.
Proud To Be Associated With
Proud To Be Associated With P15 Bravo