गेले कित्येक दिवस, महिने आणि वर्षापासुन मनात असलेला आणि ट्रेकर्सची पंढरी म्हणुन ओळखल्या जाणार्या हरिश्चंद्रगडाची वारी अखेरीस संपन्न झाली. इतके दिवस फक्त फोटोतच त्याला पाहत होतो, भेटत होतो आणि आंतरजालावर, पुस्तकात त्याच्याविषयी वाचत होतो, पण खरं सांगायच तर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि परीसर, महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर "तारामती", रौद्रभीषण कोकणकडा यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर "जो बात तुझमें है तेरी तस्वीरमें नही" असाच काहिसा फिल या दोन दिवसात आला आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या प्रेमात पडलो.
आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण सुळका' समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती.
पहाटे ६ च्या आसपास जाग आली. एक-एक करून सर्व उठले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. सकाळी करायची सर्व महत्वाची कामे उरकून झाली. आज नाश्त्याला नुडल्स बनवायचे होते. त्याची तयारी सुरू झाली. आम्ही शाळेच्या मागच्या बाजुला 'चुल x २' बनवली. म्हणजे २ चुली बनवल्या हो. एकावर चहा आणि दुसऱ्यावर नुडल्स बनवायला सुरू केले. जसे-जसे नुडल्स बनत गेले तसे-तसे ते अधिक अधिक घट्ट होत गेले. इतके की त्यातून चमचा फिरेना. नंतर समजले की मॅगी ऐवजी कोणीतरी हाक्का नुडल्स विकत आणले होते.