भामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो……
कुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो……
जन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती.
चांगल्या कामासाठी "नाही" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..
ही गोष्ट १९७६ च्या आसपासची असेल. आनंद बुनियादी प्राथमिक शाळा, आनंदवन (वरोरा) येथील पहिली-दुसरीचे विद्यार्थी चार भिंतीच्या आतील पुस्तकी शिक्षणाला कंटाळून बाबांना आर्जवाने म्हणाले, “ बाबा, आम्हाला रोज श्रमदान करायचं आहे; कृपया आम्हाला मार्गदर्शन करा”. यावर बाबा म्हणाले, “ बघा मुलांनो, शिक्षण तर तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला पर्यायच नाही. पण मी तुमचा श्रमदान करण्याचा उत्साह मोडू शकत नाही.” आणि असे म्हणून बाबांनी या विद्यार्थ्यांसाठी श्रमदानाची व्यवस्था केली. खुश होऊन सर्व मुलांनी बाबांना बनविले त्यांचे “सेनापती” आणि स्वतः झाले त्यांची ‘वानर सेना’.
मागील कैक वर्षांपासून बिरादरी मध्ये, रोज भल्या पहाटे ३ वाजता एका घरी अलार्म वाजतो आणि एक ८० वर्षाचा तरुण इसम जागा होतो. [८० वर्षाचा तरुण का म्हंटलं हे नंतर आपणा सर्वांना कळेलच.] एवढ्या पहाटे घरातील कुणालाही त्रास न देता स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. शेवटी मात्र प्रेमाने तयार केलेल्या आपल्या पत्नीच्या हातचा चहा पिऊन सकाळी ६ वाजता संस्थेच्या कामासाठी सज्ज होतो. लोक बिरादरी मधील अवॉर्ड रूमच्या खालच्या वॉर्ड मध्ये, रेडीओवरच्या बातम्या-गाणी ऐकत रुग्णांच्या जखमा पुसण्यासाठी “गौज पिस” तयार करतांना ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच दिसणार.