परिक्रमा
Submitted by पुरंदरे शशांक on 17 December, 2018 - 23:41
परिक्रमा
तर्क जाणीवे पल्याड
अज्ञाताचा गाव मोठा
अव्यक्ताच्या वेशीआत
व्यर्थ सारा आटापिटा
गावा नाही पायवाट
नाही तेथे घरेदारे
वस्तीकर नावालाही
नाही कोणी सांगणारे
गाजावाजा गावाचा या
जरी नाही किंचितसा
वाटा चालताती सारे
नकळत त्याच दिशा
वाट सरता सरता
मागे वळून पहाती
चाललो कि भास सारे
प्रश्नचिन्ह उरे हाती
भास आभासी जगात
कोण आपले परके
विसंबलो ज्यांच्यावरी
कोण होते ते नेमके