परिक्रमा

Submitted by पुरंदरे शशांक on 17 December, 2018 - 23:41

परिक्रमा

तर्क जाणीवे पल्याड
अज्ञाताचा गाव मोठा
अव्यक्ताच्या वेशीआत
व्यर्थ सारा आटापिटा

गावा नाही पायवाट
नाही तेथे घरेदारे
वस्तीकर नावालाही
नाही कोणी सांगणारे

गाजावाजा गावाचा या
जरी नाही किंचितसा
वाटा चालताती सारे
नकळत त्याच दिशा

वाट सरता सरता
मागे वळून पहाती
चाललो कि भास सारे
प्रश्नचिन्ह उरे हाती

भास आभासी जगात
कोण आपले परके
विसंबलो ज्यांच्यावरी
कोण होते ते नेमके

दृष्य अदृष्याचे भास
जाय विरुनिया जिथे
क्षण मिळे विसाव्याचा ?
परिक्रमा सत्य मोठे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचारांचे आवर्तही
जाय विरुनिया जिथे
क्षण एक मुक्कामाचा
परिक्रमा सत्य मोठे

खुप सुंदर.

सुंदर!
या अटळ परिक्रमेत ही कोडीही पडतात:
का अंत असे ज्ञेयाला ?
का ज्ञान तोकडे ठरते?
का सीमा अज्ञेयाची,
अज्ञात प्रदेशी वसते ?

<<अव्यक्ताच्या वेशीआत
व्यर्थ सारा आटापिटा<<

अहाहा.. सार्या आयुष्याचे सार!
फार सुंदर रचना.. शशांकजी