तुझ्याविना
ओसाड पडला पाराचा ओटा,
देव एकटा भयाण स्थिरतो.
भिरभिर घिरट्या मारुनी पक्षी,
चाळीभोवती विरक्त फिरतो.
मचान ते झाडावरचे खाली,
कळप मृगांचा का नाही शिरतो?
उभ्या पिकांना बहरच कसला?
गावच जेव्हां जंगलाशी मिळतो.
उजाड झालेत तंबु ही सारे,
तुझ्याविना पलायन का करतो?
खुणा तुझ्या आठवणींच्या उरल्या,
मार्ग अशाश्वत स्थलांतर उरतो.
आठवणींचा नुसता पडतो पाऊस,
जेंव्हा कधी मी तुला स्मरतो.
गाव होतो मग चिंब ओला,
माझ्यातला मी माझ्यातच विरतो.
©गजानन बाठे
"तुझ्याविना"
उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!
नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!
रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!
..... मी मानसी
अशाच एखाद्या वळणावरती
भेट कुठेतरी…
सांज माझी सुनी सुनी
बनव तिला तु सोनेरी...
स्वप्नामध्ये माझ्या
ये तु कधीतरी…
माझी म्हणुनच ये
नको आता ती परी...
किती वाट पाहु तुझी
अन् किती नाही…
वाट चुकल्यासारखी तरी
ये माझ्या घरी...
तुझ्याविना ह्या जिवनाला
अर्थ कुठं आहे...
तुच खरी माझी
बाकी सगळं खोटं आहे
ये एकदा तरी ये आता
नको अंत पाहु...
तुच सांग तुझ्याविना
कसा मी राहु...
कसा मी राहु...
--- सतिश चौधरी