गोल्डन एरामधल्या माझ्या आवडत्या गाण्यांच्या लिस्टमध्ये एक गाणं आहे - कौन है जो सपनोमे आया. हे गाणं श्रवणीय आहे, प्रेक्षणीय अजिबात नाही. आपण खरोखरच जीप चालवतोय हे सिद्ध करायला अकारण स्टिअरिंग व्हील आडवंतिडवं फिरवत हातवारे करणारा मध्यमवयीन राजेंद्रकुमार उर्फ राकु नं. १ आणि आपण नेमकं काय एक्स्प्रेशन देणं अपेक्षित आहे ह्याची सुतराम कल्पना नसल्याने गोंधळलेला चेहेरा करून, कधी कपाळावर आठ्या घालत एक छोटी उशी कवटाळून बसलेली तरुण सायरा बानू हे विजोड जोडपं भोवती दिसणाऱ्या दार्जिलिंगच्या स्वर्गतुल्य निसर्गाची मजा घालवून टाकतं.
ही मालिका वाचणार्या मायबोलीकरांच्या एव्हाना लक्षात आलं असेल की मला रहस्यमय चित्रपट पहायची फार आवड आहे. पण हेही सांगणं जरुरी आहे की पुनर्जन्मावरचे चित्रपटसुध्दा मी तितक्याच आवडीने पाहते. मग त्यात मधुमती, नीलकमल, महबूबा पासून कर्ज (ऋषी कपूर, टीना मुनीम वाला), कुदरत आणि अगदी अलीकडला ओम शांती ओम असे बरेच चित्रपट येतात. १९६६ साली आलेल्या 'ये रात फिर ना आयेगी' मधली बरीचशी गाणी 'आवडती' ह्या सदरात येत असली तरी मला हा चित्रपट माहित नव्हता. आणि मुख्य म्हणजे तो पुनर्जन्मावर आधारित आहे हे ठाऊक नव्हतं.
बरीच वर्षं झाली ह्या गोष्टीला. अॅगथा ख्रिस्ती ह्या माझ्या लाडक्या लेखिकेची लायब्ररीत असतील नसतील तेव्हढी सगळी पुस्तकं वाचायचा सपाटा मी लावला होता. एके दिवशी तिचं 'And Then There Were None’ हातात आलं. प्लॉट वाचताक्षणी वाटून गेलं 'अरेच्चा, आपला गुमनाम ह्याच्यावर बेतलाय की काय'. पुस्तक वाचायला लागल्यावर चित्रपट बराच loosely based आहे ह्याची जाणीव झाली. पण तरी गुमनाम आणि 'And Then There Were None’ हे असोसिएशन आजतागायत माझ्यासाठी कायम आहे.
काय म्हणताय? काय आहे 'गुमनाम'ची कथा?
रात्रीची वेळ. एक भव्य हवेली.
‘मै नही मानती. तुम कुछ भी कह लो' एका स्त्रीचा आवाज.
‘खामोश' एका पुरुषाचं दरडावणं
मग एक जमीनदार, त्या हवेलीचा मालक बाहेर पडतो. बाहेर मिट्ट काळोख. दाटलेलं रान. पैंजणाचा आवाज. त्या आवाजाचा मागोवा घेत तो चाललाय. एका क्षणी तो कॅमेराला पाठमोरा होतो आणि त्याच्या मागे आपल्याला एक हात दिसतो.....मोठमोठी नखं असलेला. मग एक किंकाळी ऐकू येते. आणि त्या किंकाळीतच आगगाडीच्या इंजिनाच्या शिट्टीचा आवाज मिसळतो.
हा चित्रपट प्रथम पाहिल्याला खूप वर्षं उलटून गेली आहेत. शाळकरी वयात, बहुधा डीडीच्या कृपेने, पाहिला होता. ‘राजनर्तकी म्हणजे राजाच्या दरबारात नृत्य करून लोकांचं मनोरंजन करणारी नृत्यप्रवीण स्त्री' असा साधा, सरळ, सोपा अर्थ ठाऊक असण्याचं ते वय (आजकाल ते वय तसं राहिलेलं नाही असं ऐकतेय!) . ‘कुलटा' ह्या शब्दाचा अर्थ माहित असण्याचं काहीही कारण नसलेलं ते वय. 'स्त्रीजन्म' ह्या शब्दाचे अनेक अर्थ-अनर्थ माहित नसण्याचं ते वय. खरं तर हा चित्रपट फारसा लक्षात न राहण्याचंच ते वय. पण का कोणास ठाऊक, मनाचा कुठला तरी एक कोपरा चित्रलेखा अडवून बसली होती.