गजल
एकाकीपण संपवण्या सरसावून आली गजल
सारे सोडून गेले तेव्हा धावून आली गजल
चालेनाशी झाली जेव्हा मेंदूचीही मात्रा
रक्तात चिंब हृदयाच्या न्हाऊन आली गजल
अस्पष्ट भावनांना आकार द्यावयासाठी
संकेत सारे बंधनांचे धुडकावून आली गजल
निराशेच्या भयाण काळ्या रातीने केले हैराण
दीप आशेचे सर्वत्र तेव्हा लावून आली गजल
पराजयाने पुरता जेव्हा खचून गेलो होतो
ध्वज तेव्हा विजयाचा उंचावून आली गजल
अव्हेरले जगाने साऱ्या, वा-यानेही पाठ फिरवली
मज कवेत घेण्या बाहू फैलावून आली गजल
डॉ. रज्जाक शेख ‘राही’