तडा
“.... आणी डेली मॉर्निंग रॉ मटेरियल चं स्टेटस पण स्क्रीन वर दिसू शकेल मला?” कपूर सरांनी अर्चनाला विचारलं.
साठीच्या जवळ आलेले कपूर साहेब पंजाबी असले तरी जन्मापासून महाराष्ट्रातच राहिल्यामुळे, ते चांगलं मराठी बोलू शकत होते. शिवाय इथल्या कामगारांशी सततचा संबंध येत असल्यामुळे सगळ्यांशीच जास्तीत जास्त मराठी बोलण्यावरच त्यांचा भर होता.
“हो.. का नाही? नाही तरी डेलि प्रॉडक्शन चार्ट मी मेंटेन करायला लागलेच आहे. इनफॅक्ट त्या वरून सुद्धा डेली कनझमशन घेता येईल.. त्यावर वर्किंग करून ठेवते मी. सोपं होईल मग..” अर्चना म्हणाली.
गेले तेरा महिने मी ज्या जागेवर बसत आहे तिथे माझ्या शेजारीच एक पोपडे निघालेली आणि रंग उडालेली भिंत आहे. मला तसा तिचा काही त्रास नाही, कारण ती माझ्या थेट नजरेस पडत नाही. फक्त माझ्या जागेचा शो जातो ईतकेच. दुरून कोणी पाहिले की मी छानपैकी स्वदेशच्या शाहरूखसारखा फॉर्मल आणि टापटीप कपड्यात बसलो असतो. पण ती भिंत माझ्या सौंदर्याची पार्श्वभूमी खराब करत असते. मला दसरा दिवाळीच्या मुहुर्तावर एखादा फोटो काढायचा झाल्यास उठून दुसर्याच्या जागेवर जावे लागते. आणि एकदोनदा केसांवर काही पांढरे पांढरे पडले होते. म्हटलं तर हाच तुरळक त्रास. तरी लोकांच्या आग्रहास्तव मी काही वेळा एच आर आणि मॅनेजमेंटकडे तक्रार केली.