कोष
Submitted by पुरंदरे शशांक on 16 January, 2018 - 00:13
कोष
जोडताना बंध सारे गुंतलो का गुंगलो
कोष रेशीम भोवताली मस्त मी सुस्तावलो
कोष सारा विणूनी होता कोण मी उच्चारलो
नाद प्रतिनाद उठता केवढा भांबावलो
देह मन नाजूक विणीला कौतुके न्याहाळलो
आरपार जाताच त्याच्या मी जरा चक्रावलो
भास आभासी किती त्या जाणीवांवर भाळलो
सावल्यांचा खेळ कळता कोष कुठला हासलो.....