"काही तरीच बरका ! तुमच वय ९० वर्षे असणे शक्यच नाही”, रामा धनगराला मध्येच थांबवत मी जरा मिश्किलपणे म्हंटले. त्यावर रामा धनगर थोडा थबकला. आता त्याच्या पुढे प्रश्न होता की कस काय पटवुन द्यायचे की त्याचे वय ९० ची आसपासच आहे असे.
शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.