मावळतीचा गंध त्यात
प्रकाशाचा अंधुक दिवा
जगणे जीवन समग्र हे
सावरून साऱ्या जीवा
उगवतीचे रंग सुन्न
त्यात कोळशाची छटा
टिपूसाची झाली वाफ
सावरून साऱ्या बटा
आडोशाचा काजवा मंद
नभोनिळे आवाहन मग
बुबुळी तरंगे उत्कर्ष की
सावरून जळे हीमनग
श्वेत बोचरी केतकी
थांबे शिवालयाच्या पायथी
सुगंधावा जीव सारा
सावरून संसार माथी
मी ....अब्जशीर्ष आशावाद
मीच फुलवितो विझू पाहणारी नवविचारांची पहिली ठिणगी
जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात
मीच गुणगुणतो आमूलाग्र बदलांची बीजाक्षरे
जी दुमदुमतात प्रगतीचा महामंत्र होऊन आसमंतात
तो मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते
भुगा होण्याआधी लोळण घेतात
मीच मळतो विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या
अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा
कैकदा झाकोळून
पण प्रतिकूलांना पुरून
मीच उरतो पुनःपुन्हा
अब्जशीर्ष.
अजिंक्य.
रंग,वंश,लिंग,धर्म या चौकटीत मला चिणू नका
दिव्यत्वाच्या शोधात व्यर्थ शिणू नका.