माझ्या बाबाची तुळस
अंगणात वृंदावन
त्यात तुळस देखणी
वारीयाने पान हाले
विठ्ठलाचे संकिर्तनी
जरी बाबा परलोकी
येतो पहाटे उठोनी
प्रात:स्नान उरकोनी
घाली तुळसीला पाणी
मग जागतो मुकुंद
दारी वाजता मृदंग
बाबा नाचतो अंगणी
मुखी तुक्याचा अभंग
असे रोजचेच चाले
बाबा विठूसंगे डोले
बघताच तुळसीला
मन वारकरी झाले
पान तुळसा माईचे
बाबा प्रसाद सेवतो
दुःख सागर संसार
विठू पैलतीरा नेतो
तोच क्रम रोजचाच
परी उत्साह आगळा
तुळसीच्या वृंदावनी
वेणूनादी घननीळा