नॉस्टॅल्जिया ईदचा
Submitted by सई. on 25 June, 2017 - 08:46
मी मुस्लिम मोहल्ल्यात लहानाची मोठी झाले. घराभोवती पाच मशिदी होत्या. शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, गंजी गल्ली, आझाद गल्ली, शिवाजी मार्केट, महानगरपालिका, जेल ते पार मटण मार्केट एवढ्या परिसरात पसरलेल्या. बोहरी समाजाची एक मशीद तर घराच्या अगदी समोर. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री आठ, अशी नियमित अजान कानावर पडायची. तीही एकोनं. कारण सगळ्या मशिदींची बांग एकानंतर एक सुरू व्हायची. त्यापैकी काही अत्यंत अत्यंत सुरेल, ऐकताना ब्रह्मानंदी लागावी, इतक्या.