मी मुस्लिम मोहल्ल्यात लहानाची मोठी झाले. घराभोवती पाच मशिदी होत्या. शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, गंजी गल्ली, आझाद गल्ली, शिवाजी मार्केट, महानगरपालिका, जेल ते पार मटण मार्केट एवढ्या परिसरात पसरलेल्या. बोहरी समाजाची एक मशीद तर घराच्या अगदी समोर. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री आठ, अशी नियमित अजान कानावर पडायची. तीही एकोनं. कारण सगळ्या मशिदींची बांग एकानंतर एक सुरू व्हायची. त्यापैकी काही अत्यंत अत्यंत सुरेल, ऐकताना ब्रह्मानंदी लागावी, इतक्या. रोज सकाळी शाळेत जाताना घुडणपीर दर्ग्यातनं शॉर्टकट घेत भाऊसिंगजी रस्त्याला लागायचं, मग ज्योतिबा रोडनं घाटी दरवाजातनं देवळात थेट आत शिरायचं, गाभा-यासमोर उभं राहून अंबाबाईला नमस्कार करून प्रदक्षिणा घालायची, मग पुढे महाद्वारातनं बाहेर पडून शाळेची वाट पकडायची. हा रोजचा परिपाठ. आज निव्वळ अविश्वसनीय वाटावा असा.
मोमीन, बागवान, दोडमणी, टिनवाले, कांचवाले, शेख असे सख्खे शेजारी. समोरच्या गल्लीत बाबांचे जीवलग मित्र रमजान मण्यार. रमजानकाका आणि बाबा एकदा ट्रक चालवत बेंगलोरला गेलेले वगैरे. आई भेंडे गल्ली पोस्टात जायची, तिथंही शेख म्हणून पोस्टमास्तर होते, त्यांच्या घरी सगळे डिस्टींक्शनवाले होते तेव्हा. बाकीचे काही आठवत नाहीत. मागच्या इमारतीत प्रसिद्ध गायिका गुलाबबाई कागलकर रहायच्या. दोन गल्ल्या जोडणा-या टिनवाल्यांच्या घरातनं ये जा करायचो. पकडापकडी खेळताना एकदा ते कुटुंब गोल करून अन्नाची भांडी मधे घेऊन जेवायला बसलेलं होतं. तरी आमची बाजूनं मागनं पळापळी चाललेलीच असताना मी धाडकन आमटीच्या पातेल्यातच पडले! तेव्हापासून मला घरात काय म्हणातात ते म्हणतातच. ते सांगायचं नसतंय.
टिनवाले वगळता बाकीची घरं लख्ख. रमजानकाका, पोस्टमास्तर शेखांकडंं तर चेहरे पाहून घ्यावेत इतकी नितळ फरशी आणि भांडी. गल्लीच्या टोकाशी एका घरात मायलेकी दोघीच असत, घरचे पुरूष कुठंतरी दूरदेशी असायचे. त्या तर नुसतं घरदार आणि आंगण परसूच नाही, तर परसात दोन नारळाची झाडं होती, त्यांचे बुंधेसुद्धा जितक्या उंचीपर्यंत हात पोचतील, तिथवर हातानं घासून आणि वर पाईपनं पाण्यानं धुवायच्या. रमजानकाका सुरमा आणायचे, आमच्या आजोबांना लागायचा. मग आजोबा आमच्याही डोळ्यात काडी फिरवायचे. अहाहा! शांत शांत वाटायचं. रमजान ईदला शिरखुर्म्याची किटली यायची. बकरी ईदला आठवडाभर आधी प्रत्येकाच्या परसात बक-या मुक्कामाला यायच्या. मग ते चा-यांचे भारे, लिदामुताचे विशिष्ट वास, त्यांचं दिवसागणिक वाढत जाणारं आणि शेवटच्या दिवसाला पुढची चाहूल लागलासारखं भासणारं करूण बेंबाटणं, आठवड्याभरात होणारा पुष्ट बदल. बोहरींच्या मशिदीत ईदच्या आधी आकांत सुरू व्हायचे, छाती पिटून, पिळवटलेल्या प्रार्थना करत स्त्री पुरुष निर्दोष असल्याचं कळवळून सांगत रहायचे. सकाळ संध्याकाळ करूण रुदन आणि बघवणार नाही इतका आत्मक्लेश.
प्रत्यक्ष ईदच्या दिवशी दारांबाहेर पडलेले मांडव, परसात पेटलेली चुल्हाणी, त्यावर मोठमोठ्या पातेल्यातून शिजणारे खाटखुट आणि खास त्यासाठी आलेले खानसामे, पाहुण्यांनी भरलेली घरं, पठाणी कुडते आणि क्रोशाच्या सुंदर टोप्या घातलेल्या यजमानांची लगबग, सजलेली पळणारी बागडणारी मुलंमुली, मेंदीनं हात (वडीलधारे स्त्री पुरुष केसही रंगवलेल्या) रंगलेल्या, ठेवणीतल्या झगमगीत साड्या पेहेनलेल्या आणि मोठमोठाले झुमके, जडजड खास नजाकतीचे मोठालेच दागिने घातलेल्या स्त्रियांच्या आचारी ते पाहुणे अशा येरझा-या, मोठ्यानं रंगलेल्या बागवानीतल्या गप्पा, मुलांवर चाललेली आरडाओरड, आसमंतात गच्च भरून दरवळणारे बिर्याणीचे खमंग वास असा माहौल असायचा. खूप आनंद असायचा हवेत. दिसायला आधीच छान असणारे लोकं आणखीच छान, तर बेतास बात असणारेही खुललेल्या चेह-यामुळं देखणे दिसायचे. कौसर, रुबाब, दिलशाद, उम्मेहानी, परवीन, शाहीन, बिल्लाल, सगळे धांदलीत असायचे. बोहरींच्या मशिदीत बुरख्यांचे आणि पुरुषांच्या टोप्यांचे अत्यंत सटल रंगसंगतींचे आणि कलाकुसरीचे अनेकानेक बहारदार नमुने दिसायचे. फुलांचे ताटवे फुलल्यासारखं दृश्य असायचं ते. आमच्या खालीच मारियाताई, जोहेबदादा, मुन्नीताई, नफीसाताई रहायचे, आम्ही त्यांच्याकडे एकाच भल्यामोठ्या थाळ्यात पण वेगवेगळे वाटे करून सगळे मिळून एकत्र जेवायचो. असं असूनही कधीही कुणी आम्हाला आमच्या आहाराचा भाग नसलेलं काहीही खायला घातलं नाही. आमच्या घरच्यांनाही कधी कसल्या शंका नव्हत्या. दिवाळीला आमची फराळाची ताटं सगळ्यांकडं फिरायची.
दरवेळी ईद येऊ घातली की हे सगळं ओळखीचं, स्मरणात मुरलेलं मनाच्या पृष्ठभागावर दुधावरच्या सायीसारखं तरंगायला लागतं. माझ्याइतकेच आमचे आत्याकाकालोकंही ह्या स्मरणरंजनात रेंगाळतात. ईदचं त्यामुळं मनात एक खास खास स्थान आहे. तिला निर्धास्त स्वच्छंद बालपणाचा, आनंदाच्या दिवसांचा, निखळ शेजाराचा, निर्व्याज मैत्रीचा, धर्मरहीत आपलेपणाचा, मोठ्यांमधल्या समंजस विश्वासाचा, कानांवर प्रभातवंदनइतक्याच प्रभावीपणे सुरेल संस्कार करणा-या अजानचा, गोड बागवानीचा, सौहार्दाचा, हवेतल्या घट्ट सुरक्षिततेचा असे अनंत सुगंध लगडलेले आहेत. दरसाल बिल्लाल मुल्ला ईदला न चुकता खूप अगत्यानं शिरखुर्म्याचं आमंत्रण करतात आणि मी हे सगळं पुन्हा अनुभवून घेते. सुखाचं असतं ते. ऊर्जा पुरवणारं, आयुष्य वाढवणारं. हे वातावरण भोवती असल्याचं मोल आज प्रकर्षानं जाणवतं आणि भाग्यवान वाटतं. माझ्या लेकालाही हे असं अनुभवायला मिळालं तर माझ्या खुशीला चारचाँद लागतील. कारण अगदी कुबेराइतकी ऐपत असती तरी हे बाजारातून विकत घेऊन देता यायचं नाही!
काल सगेसोयरे मिळून मुद्दाम मोमिनपु-यात इम्दादीत जाऊन असेच काही आठवणींचे क्षण पुन्हा वेचून आलो. आम्ही घासफुसवाले त्यामुळे फिरनी, तहुरा, खरबुज फालुदा, शाही तुकड्यापर्यंतच मजल मारली. पण जे सर्वाहार घेतात, त्यांनी अवश्य भेट देऊन आस्वाद घ्यावा असं ठिकाण आहे.
सर्वांना मनापासून ईद मुबारक
मस्त सई, कालच कौसर बाग ला
मस्त सई, कालच कौसर बाग ला जाऊन आलो, छान अनुभव होता
आठवणी छान शब्दात मांडल्यात.
आठवणी छान शब्दात मांडल्यात.
छान लिहिलयं.
छान लिहिलयं.
चांदरातीच्या तहेदिलसे
चांदरातीच्या तहेदिलसे शुभेच्छा इद मुबारक!
मस्त लिहिलंय!तेव्हापासून मला
मस्त लिहिलंय!
तेव्हापासून मला घरात काय म्हणातात ते म्हणतातच. ते सांगायचं नसतंय. >>>>>>> लंपनची आठवण झाली.
खूप सुरेख आणि जिव्हाळ्याचं...
खूप सुरेख आणि जिव्हाळ्याचं....
छानच लिहिलेय.इदीच्या दिवशी
छानच लिहिलेय.इदीच्या दिवशी मुंबई तला मोहम्मद अली रोड बघण्यासारखा असतो
छान लिहीले आहे. माझ्याही
छान लिहीले आहे. माझ्याही आठवणी आहेत. अशा मोहल्ल्याच्या नाहीत, पण ईदच्या आहेत. आमच्या चाळीत अगदी जवळ एक जुने मुस्लिम कुटुंब. आणखी जवळपास, शाळेत्, नोकरीच्या ठिकाणी अनेक मुस्लिम मित्र होते/आहेत. शीर-कुर्मा मात्र या चाळीतील कुटुंबाकडेच कायम झालेला आठवतो. आमच्या घरापासून अगदी जवळ नाही, पण अजान ऐकू येइल इतपत जवळ एक मशीदही होती. जरा अंतर असल्याने ऐकू येइल पण त्रास होण्याइतपत नाही, असे असल्याने तो आवाज ऐकायला चांगला वाटे. सकाळी इतर धार्मिक आवाज येत तितका तो "आपला" वाटत नसे, पण खटकतही नसे.
मधल्या एका भारतभेटीत योगायोगाने ईदलाच जुन्या चाळीत गेलो होतो, तेव्हा तो शीर-कुर्मा पुन्हा एकदा खाल्ला, अगदी पहिल्यासारखाच. ईद/शीर-कुर्म्याचे अनुभव बरेच आहेत, पण इफ्तार मात्र आधी अनुभवला नव्हता. तो काही माबोकरांच्या कृपेने मिळाला. तेही वातावरण मस्त असते. उत्सवी एकदम. मला एक गंमत वाट्ली तेव्हा, त्यांना चेहर्यावरून किंवा आविर्भावावरून आम्ही हिंदू आहोत हे समजत असावे, कारण कबाब वगैरे जेथे होते, तेथे कोणते (म्हणजे फक्त चिकन वाले) घ्यायचे ते बरोबर सांगत होते :). मला ते पदार्थ काही खास वाटले नाहीत. कदाचित बीफ-बेस्ड पदार्थही तेथेच असल्याने एक तिटकारा निर्माण होतो, त्यामुळे असेल (तो मला इथे अमेरिकेतही अनेकदा जाणवतो). तेथील हिरवागार दुधी हलवा मात्र भन्नाट होता, तसेच ते पेय - फालुदाच असावे - ते ही.
मस्त लिहिलं आहे. मिरजेत आम्ही
मस्त लिहिलं आहे. मिरजेत आम्ही राहतो तो भाग असा सगळा मिक्स आहे. म्हणजे समोर जैन, लिंगायत तर मागे सगळे मुसलमान. आता ती सगळी पोरं काय करतात काय माहित. रईस, इर्शाद, मोहसीन ही कॉमन नावं होती माझ्या बरोबरच्यांची.
वरच्या लेखातले रमजान नाव तर किती दिवसांनी ऐकलं.
आमचे शेजारी सगळे मुसलमान त्यामुळे ईदला शिरखुर्मा नक्की यायचा. लहानपणी तो खायला शेजारी जायचो पुढे मोठे झाल्यावर ते बंद झाले. अत्तर आणि जरा ठेवणीतले गालिचे काढलेले असत.
आमच्या वडलांचे 1-2 जुने अगदी सुरुवातीचे मुसलमान पक्षकार आवर्जून डबा घेऊन येत. आजी घरात असल्याने त्यादिवशी ते मागल्या दाराने येऊन डबा देत. आमच्या कुत्रा घर डोक्यावर घेत असे मग!
मस्त लिहीले आहे. असे कुठलेच
मस्त लिहीले आहे. असे कुठलेच अनुभव गाठीशी नाहीत. फक्त पिक्चर मध्ये जे बघितलं आहे तेव्हढंच.
बकर्यांचा मुक्काम आणि त्या अनुषंगाने आलेलं वाचून लहानपणी जीवदानी(मुंबईत विरार जवळ) ला गेलो होतो ती ट्रिप आठवते. खूप भिती वाटली होती तिथे. घासफुस वाले असल्याची लक्षणं म्हणावीत का ह्याला?
छान आणि मनापासून लिहिलेय,
छान आणि मनापासून लिहिलेय, एवढे गोड वर्णन वाचून काही लोकांच्या डोळ्यासमोरील चित्रंच फिरले असेल
मी अँटी घासफूसवाला किंबहुना शुद्ध मांसाहारी असल्याने त्याच साठी म्हणून हिंदू-मुस्लिम कडव्या दंगलींनंतरही काही मुस्लिम मित्र जोडून ठेवले आहेत, आणि अश्या ईदीच्या दिवशी तेच माझे सख्खे मित्र असतात
पण ईतर घासफूसशी वावडे असले तरी त्यांचा शीरखुर्मा, त्यांचा फालूदा, आणि त्यांची अफलातून म्हणून एक मिठाई येते ती आपल्या सत्यनारायणाच्या प्रसादाएवढीच आवडते.
मध्यंतरी दोनेक वर्षे आमच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये बोहरी भाडेकरू होते. मांसाहारात काहीही स्पेशल बनले तर माझा वाटा ठरलेलाच असायचा. तर्हेतर्हेचे घरगुती स्पेशालिटी असलेले पदार्थ खाल्ले जे कधी बाहेर हॉटेलातही चाखले नव्हते आणि पाकृ विचारून आमचे घरचेही कधी बनवणार नव्हते. यंदा ते नाहीयेत तर मिस होतेय ..
अर्थात त्रासदायक अनुभवही आहेत थोडेफार, पण ते या धाग्यावर या मुहुर्तावर नको..
मॉरल ऑफ द स्टोरी काय - तुम्ही असंस्कृत लोकांच्या सहवासात येतात की सुसंस्कृत यावर तुमचे अनुभव ठरतात, आणि असे लोकं सर्वच धर्मात कमीअधिक प्रमाणात असतात.
सुंदर, ओघवतं. माहोल उभा
सुंदर, ओघवतं. माहोल उभा राहीला डोळ्यासमोर.
इयत्ता 3री मध्ये मला भेटलेली
इयत्ता 3री मध्ये मला भेटलेली ईद
* चिनुक्स, बालभारती
* चिनुक्स, बालभारती पुस्तकातील हे ss असल्याने प्रताधिकाराचा भंग होणार नाही नसे वाटते, तरीही माबो धोरणाचा भंग होत असल्यास कळवावे.
<<<< बोहरींच्या मशिदीत ईदच्या
<<<< बोहरींच्या मशिदीत ईदच्या आधी आकांत सुरू व्हायचे, छाती पिटून, पिळवटलेल्या प्रार्थना करत स्त्री पुरुष निर्दोष असल्याचं कळवळून सांगत रहायचे. सकाळ संध्याकाळ करूण रुदन आणि बघवणार नाही इतका आत्मक्लेश.>>>
एकदम लहानपणी ( ५-६ वर्षे) मुस्लिम अरीयात वाढले. स्वतंत्र असे बंगले होते. त्यात पठाण, कोकणी, बोहरी मुस्लीम होते. मराठी कमीच.
कोणा कोकणी मुस्लीमांची घरे स्वच्छ , कोणा पठाणांची अस्त्यावस्त आणि बोहरी मिक्स ( अजागळ तर काही स्वच्छ) अश्या चर्चा दुपारच्या वेळी इकड तिकडच्या बंगल्यातल्या कामवाल्या बायका पान खात करत ते आठवतं.
त्यात शियांच छाती पिटून आक्रोश पहिल्यांदा अक्स्मात नजरेला पडलेला मोहरमच्या वेळेला (वय सहा वगैरे) तीन दिवस तापाने आजारी होते. खेळताना अचानक बॉल बाजूच्यांच्या बागेत गेला आणि रडाण्याचा आवाज आला म्हणून पुढे जावून बागेला लागून असलेल्या त्यांच्या खोलीचा पडदा सारून पाहिला. तर सर्व बायका, जोरजोरात छाती पिटून ओरडत होत्या. आजही इतक्या वर्षांनी आठवतय. पुढे तो प्रकार काय ते नंतर कळले. पण एकंदरीत , मोहरम प्रकाराची भितीच वाटते.
माझ्या मित्र मैत्रीणींमध्ये, फजाला(पठाण), मेहमूद(पठाण), वसिफा(कोकणी),इरफान(कोकणी), कासिम(कोकणी) वगैरे. नावावरूनच पठाण का कोकणी का बोहरी असा थोडाफार फरक कळायचा.
मोहरमच्या संध्याकाळी कळायच कोण , शहीद झालय वगैरे( परत कामवाल्या बायां चर्चा करत).
ईदच्या वेळी, त्यांचा शीर्खुर्मा बर्याच घरातून यायचा , मी , पप्पा खायचे. पण माझी सोवळं ओवळं पाळणारी आजी मात्र खाय्ची नाही. आई आजीला घाबरूम नाही खायची. दिवसभर मुस्लिम मैत्रीणीशी गप्पा मारणारी आजी, त्यांच्याकडच काहीच खायची नाही. ईदला , कॉमन बागेतच त्यांच्या पंगती असत. मोठाली पत्र्यासारखी दिसणारी ताटं , आणि गोलाकार बसून एकत्र जेवणारी माणस बघून कमाल वाटायची.
कारण मी अगदी लहानपणी सुद्धा विचार करायचे, हे असे उष्ट्ट कसे खातात?
खरे तर, ईदच्या वेळी ते रक्ताचे पाट नाही बघवायाचे. अगदी मागेच बागेत प्रत्येक जण बकरी कापायचे... मी, त्यावेळी खास्फूस वाली होते. घरीच कोणी बनवत खात नसत.
पण बर्या मटण वगैरे खाणार्या नॉन मुस्लिम मित्र मैत्रीणींना सुद्धा ते बघून त्रास होतो असे एकलेय.
त्या आठवणी जागा झाल्या...
सई, माहोल उभा केलास
सई, माहोल उभा केलास डोळ्यासमोर.. खुप छान वर्णन अन तुझ्या आठवणी.. आमच्याइथेहि एकच आहे सलिम अन त्याच कुटुंब.. ईदला त्याच्याकडुन आंम्हा सगळ्यांना शीरखुर्मा येतेच येते.
छान वर्णन अन प्रतिसाद सुद्धा.
छान वर्णन अन प्रतिसाद सुद्धा.
फारच छान लिहिलंयस मी या
फारच छान लिहिलंयस मी या सर्वाची साक्षिदार आहे. फक्त मला आईचे पोस्ट्मास्तर नाही आठवत. बाकी सगळं आठवतंय. मशिदीतली अजाण रोज ऐकून ऐकून मला आणि माझ्या धाकट्या चुलत भावाला पाठ झाली होती. त्यामुळे ती सुरू झाली की तो आणि मी त्यांच्या बरोबर म्हणायचो "अल्लाहु अकबर अल्लाह..' पुढचे आठवत नाही... आमच्या खाली राहणारे भोरी होते त्यामुळे मुस्लिम मुस्लिमांच्यात ही थोडा फरक असतो हे तेव्हा कळायचे नाही. आम्हाला सगळे सारखेच. रमजान काका तर आम्ही व्हेज होतो म्हणून नेहमी म्हणायचे की तुम्ही खाटखूट खात असता तर रमजान काकीचे हात खाल्ले असते पण तुमच्यासाठी तिला मसूर बिर्याणी बनवायला सांगतो.
रमजान काका नेहमी पांढरे स्वच्छ कपडे घालायचे ढगळी विजार आणि वर सदरा आणि पांढरी टोपी. त्यांच्या कानात नेहमी अत्तराचा बोळा असे, त्याला सतत बोट लावून ते त्याचा वास घेत. आम्ही चिल्लर भोवती दिसलो की तो बोळा काढून आमच्या उलट्या हातावर फिरवून वास घ्यायला लावायचे. तो त्यांच्या कानातला बोळा आमच्या हातावर फिरायचा त्या चं आम्हाला काहीही वाटायचं नाही.
छान लिहीलय,शिरखुर्मा आवडता
छान लिहीलय,शिरखुर्मा आवडता आहे.त्याचा दरवाळणारा वास,त्याची ती तुपट चव ,मधूनच येनारे ड्रायफ्रुट्स.मस्त.
अलिकडे मित्रांशी कॉन्टॅक्ट कमी झाल्यामुळे हे फारसे अनुभवता येत नाही.
आईशप्पथ सिम्बा, ईदच्या
आईशप्पथ सिम्बा, ईदच्या धड्यानं लेखाला चारचाँद लागले! मला होता हा धडा ती दोन चित्रं तर लगेच ठळक आठवली. थँक्यु सो मच _/\_
सर्वांचे मनापासून आभार छान वाटलं सगळ्यांचे प्रतिसाद वाचून.
दक्षिणा, तूसुद्धा भर घाल तुझ्या आठवणींची.
वाह काय भारी लिहिले आहे.
वाह काय भारी लिहिले आहे. कोल्हापूर आहेच तसे! फार आवडला लेख. खूप आठवणी जाग्या झाल्या.
छान लिहिलय सई. मला कोणी
छान लिहिलय सई. मला कोणी मुस्लिम मित्र-मैत्रिणी नाहीत किंवा शेजारी पण नाहीत त्यामुळे हे सगळे मला नविनच आहे.
एक शंका आहे. इदचा चंद्र दिसतो म्हणजे नक्की काय? तो तर रोजच दिसतो मग हा नकी कोणत्या दिवशीचा चंद्र?
प्रतिपदेचा चंद्रमा... म्हणजे
प्रतिपदेचा चंद्रमा... म्हणजे इद का चांद.
अमेरिकेत राहिलेल्या एका
अमेरिकेत राहिलेल्या एका मुस्लिम गृहस्थानी ८०/८५ च्या सुमारे त्यांच्या आठवणीतला कोल्हापूर, तिथले हिन्दू-मुस्लिम इत्यादीवर जाहीर कार्यक्रम करून ९० मिनिटांची कॅसेट केली होती. त्या कार्यक्रमाला पु. ल. अध्यक्ष म्हणून होते. खूप छान होती माहिती. त्यातल्या काही ठळक घटना आठवतात.
१. एकाद्या हिन्दूने धन्दा काढला तर तो महादेवाच्या पिंडीवर फुले वहायचा आणि मग पीराला चादर चढवायचा. तोच एकाद्या मुसलमानाने धन्दा काढला तर तेच, फक्त क्रम उलटा असायचा.
२. मुस्लिम लिग तयार झाली तेव्हा एक मुस्लिम माणूस दुसर्याला म्हणाला, 'अरे एक शंकराचे लिंग आहे ना, मग परत मुस्लिम लिंग वेगळे का?'
फार साधा / सोप्पा काळ असावा तो..
(छान लिहिते आहेस)..
छान लिहलयस !
छान लिहलयस !
* चिनुक्स, बालभारती
* चिनुक्स, बालभारती पुस्तकातील हे ss असल्याने प्रताधिकाराचा भंग होणार नाही नसे वाटते, तरीही माबो धोरणाचा भंग होत असल्यास कळवावे.
<<
लव्करच बालभार्ती बदलण्यात येईल.
प्रतिपदेचा चंद्रमा... म्हणजे
प्रतिपदेचा चंद्रमा... म्हणजे इद का चांद. >>> ओके. धन्यवाद नानाकळा
फार साधा / सोप्पा काळ असावा
फार साधा / सोप्पा काळ असावा तो..
(छान लिहिते आहेस)..>> धन्यवाद आणि असं आता मागं वळून बघताना वाटतंय तरी. असतीलही तेव्हाही काही ताण, पण ते दैनंदिन आयुष्यात रिफ्लेक्ट होत नसावेत. आता आम्ही तिथे रहात नाही, तरी आजसुद्धा वातावरणात फारसा फरक झाला असेल असं वाटत नाही. छोट्या गावाशहरांमध्ये, मोठ्या शहरांच्या छोट्या भागांमध्ये असंच असेल.
पुनश्च सर्वांना धन्यवाद.
सई
नताशा, थोडंसं आश्चर्य वाटलं. अर्थात असं क्वचित होत असेल. माझ्या सुदैवानं हा आनंद शाळा कॉलेजातही मिळालाय. वर्गात रेश्मा बागवान माझी बेंचमेट होती. आमची आई कधीच शनिवारी सकाळचा डबा द्यायची नाही, पण भूक रग्गड लागायची. तर रेश्माची आई शनिवारी न चुकता आम्हा दोघींना पुरेसे होतील असे साजुक तुपावर भाजलेले ब्रेडचे खरपूस स्लाईस द्यायची डब्यात कॉलेजातली मैत्रिण सीमा पटवेगारची आई तर सगळ्याच ग्रुपचे खूप लाड करायची.
खरं आहे सई तरी... मी पूर्वी
खरं आहे सई तरी... मी पूर्वी सावंतवाडीत होतो तेव्हा एकही बुरका रस्त्यावर बघितला नव्हता... आता कधी तिकडून जात असलो तर १०/१२ बुरके रस्त्यावर दिसतात... मला पहिल्यांदा वाटलं की आपली 'आठवण' दगा देतेय. पण बर्याच मित्रांचा हाच अनुभव आहे.. कोल्हापूर बद्दल माहित नाही.
प्रभावी वर्णन . माझ्या
प्रभावी वर्णन . माझ्या सारख्या इदची जास्त माहीती नसलेल्याही प्रत्यक्ष अनुभव आल्या सारखे वाटले .
Pages