पहाट सारी गारठली आहे
सारं जग साखरझोपेत आहे
मी मात्र जागीच आहे
कारण तुझी थाप नाहीये..
चहाचा घोट घेत आहे
पहिला घेतला दुसरा उतरत नाहीये
कारण दुसरा घोट तुझा आहे
आणि तु सोबतीला नहीये..
रस्त्यावरुन चालत आहे
रिमझिम पावसात भिजत आहे
या भिजण्याला अर्थ नाहीये
कारण तुझी ऊब नाहीये..
कॉलेज चा कट्टा दिसत आहे
मित्र-मैत्रिणी जमले आहेत
त्या गप्पांमध्ये आता रस नाहीये
कारण तुझा आवाज नाहीये..
ती बघ आपली टपरी आली
गरमागरम भजी खुणावत आहे
त्या भज्यांना आता चव नाहीये
कारण घास भरवायला तु नाहीये..
सहवास तुझा
हृदयाला श्वासा ची ओढ,
वसुधेला अंबराची जोड,
फुलपाखरा परागाचे वेड,
दिवस रात्रीचा प्रणय खेळ,
तसाच काही सहवास तुझा....
सागरास जशी मिळावी सरिता,
गुंफुनी शब्दे व्हावी कविता,
पावसाविना हा निसर्ग रिता,
केशव नसता निरर्थक गीता,
तसाच काही सहवास तुझा....
मातीत मिसळावे अत्तराचे कण,
भेट तुझी जणू मंतरलेले क्षण,
मधाळ वाणी शब्दांची विण,
जुन्या पुस्तकी जपलेली खुण,
तसाच काही सहवास तुझा.....
@गजानन बाठे
विद्यापीठाच्या तिच्या छोटेखानी क्वार्टरचे कुलूप उघडून मेधा आत आली. कपडे बदलून कॉफीचा एक मग घेऊन ती तिच्या स्टडी मध्ये आली. पण आज तिचं मन कामात लागणार नव्हतं. मग तशीच उठून बाल्कनी मध्ये जाऊन उभी राहिली. अजूनही संधीप्रकाश होता पण दूरवर विद्यापीठातील काही इमारतींचे दिवे हळूहळू लुकलुकयाला लागले होते. अशा कातर वातावरणात तिचे मन उदासीने आणखीनच भरून गेले. खरेतर आज तिच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केल्याबद्दल मिळणारा भारतातील मानाचा भटनागर पुरस्कार तिला मिळणार अशी ई-मेल तिला आज सकाळीच मिळाली होती.