वळूया!
Submitted by नीधप on 9 January, 2016 - 10:54
प्लॅस्टिकचं हृदय,
प्लॅस्टिकचेच भळभळणारे रक्त,
दोन शब्द विंदांचे, दोन शब्द पाडगावकरांचे,
एक कल्पना शांताबाईंची, एक यमक गदिमांचे,
अजून काही ह्याचे, तजून काही त्याचे
दुनियेभरचे तरल फरल फोटो
सगळा स्टॉक डब्यात व्यवस्थित भरून ठेवलाय.
सिच्युएशन, मूड, ऑडियन्सचा अंदाज घेऊन
तुपावर बेसन भाजून..
हमखास डोळ्यातून पाणी, हृदयातून हुंकार,
घशातून उसासा, अजून कुठूनतरी अजून काहीतरी
काढायला लावणारे
काव्यबोळे वळायला घ्यायला हवेत..
या.. वळा चार काव्यबोळे..
तुमचेही हात लागूद्यात..
मराठी नेटजगताचं वर्हाड मोठं, भिंत मोठी..
सर्वांना पुरायला हवेत.
आणि बेदाण्यासारखा फोटो खोचायला विसरू नका
विषय: