'मेतकुट जमलं!' हा लेख हॉटेल सुरु करतानाचे अनुभव आणि सुरु झाल्यावर पहिल्या काही दिवसांमधले अनुभव यावर आधारित होता. 'अंतर्नाद' मासिकाचे संपादक श्री भानू काळे यांनी हा प्रवास जवळून पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या आग्रहाने तो लेख मी 'अंतर्नाद' साठी लिहिला होता. खालील लेख लोकसत्ता च्या आरती कदम यांनी हॉटेल सुरु झाल्यावर साधारण दोन वर्षांनी माझ्याकडून लिहून घेतला. चतुरंग पुरवणीत हा लेख यापूर्वी म्हणजे २०१७ जानेवारीत येऊन गेलाय. 'मायबोली' च्या वाचकांसाठी पुनश्च देत आहे...
’’आई, अगं केवढ्या पुरणपोळ्या केल्या आहेस या ?अख्ख्या बिल्डिंगला वाटायच्यात की काय ?’’
‘‘गप रे! समोरच्या मेनन काकूंकडे द्यायच्यात यातल्या दहा. त्यांचा मुलगा सूनपण येणारेत आज त्यांच्याकडे. उद्या चार शाळेत पण घेऊन जाईन. स्टाफरूममध्ये परवाच विचारत होते, भिडे मॅडम बर्याच दिवसात पुरणपोळ्या नाही खाल्ल्या तुमच्या हातच्या.‘‘
‘‘आई अगं तुला लोक चढवतात हरभर्याच्या झाडावर आणि तू पण किलो किलोच्या पुरणपोळ्यांचा घाट घातलास. धन्य आहे तुझी. आपल्या पुरत्या करायच्या तर.....’’
माझं वाक्य अर्ध तोडत, ’’असू दे रे. तेवढ्याच चार जणांच्या तोंडी लागतात.’’ असं म्हणून आईने विषय संपवला.