मेतकुट जमलं !!

Submitted by किरण भिडे on 26 July, 2018 - 01:33

’’आई, अगं केवढ्या पुरणपोळ्या केल्या आहेस या ?अख्ख्या बिल्डिंगला वाटायच्यात की काय ?’’

‘‘गप रे! समोरच्या मेनन काकूंकडे द्यायच्यात यातल्या दहा. त्यांचा मुलगा सूनपण येणारेत आज त्यांच्याकडे. उद्या चार शाळेत पण घेऊन जाईन. स्टाफरूममध्ये परवाच विचारत होते, भिडे मॅडम बर्‍याच दिवसात पुरणपोळ्या नाही खाल्ल्या तुमच्या हातच्या.‘‘

‘‘आई अगं तुला लोक चढवतात हरभर्‍याच्या झाडावर आणि तू पण किलो किलोच्या पुरणपोळ्यांचा घाट घातलास.  धन्य आहे तुझी.  आपल्या पुरत्या करायच्या तर.....’’

माझं वाक्य अर्ध तोडत, ’’असू दे रे. तेवढ्याच चार जणांच्या तोंडी लागतात.’’ असं म्हणून आईने विषय संपवला.

आमच्या घरातील हा नेहमीचा संवाद. समोरची पार्टी मी, माझे बाबा किंवा माझा भाऊ अशी कोणीही. आणि आम्हांला खमकेपणाने पुरून उरणारी आमची आई. आई कुठलाही पदार्थ करणार म्हणजे दोन गोष्टी ठरलेल्या. एक तो उत्तमच होणार आणि दुसरी तो चार घरात वाटला जाणार. या वाटल्या जाण्यावरून आम्ही आईची कितीही चेष्टा केली तरी तिला त्याचा काहीही फरक पडायचा नाही आणि ती तिचं पदार्थ करण्याचं आणि वाटण्याचं काम पूर्वीच्याच जोमाने करत राहायची. या वाटण्यावरून मी तिला अनेकदा चिडवायचो ’’आई तू हॉटेलच का नाही काढत एखादं? भरपूर जणांना खायला घालायची हौस भागेल तुझी एकदम.’’ असं मी म्हणताच ’’अरे हॉटेलात पैसे देऊन माणसं येतात खायला... हिच्या वाटण्याच्या स्वभावानुसार हिने हॉटेल नाही, अन्नछत्र उघडावं.’’ अशी माझ्या भावाने तिची टर उडवावी आणि आईने शांत राहावं हे ही नेहमीचंच.

जर माझ्या मित्रांनी मला, माधवबाग आयुर्वेदिक कार्डिऍक हॉस्पिटल्स व क्लिनिक्सच्या दैनंदिन कामातून बाजूला होण्याचा सल्ला दिला नसता तर हे असंच चालू राहिलं असतं. वास्तविक माझा आणि वैद्यकीय क्षेत्राचा काहीही संबंध नव्हता. शिक्षणाने मी इंजिनिअर आणि एम.बी.ए. अगदी ठरवून बायोलॉजी न घेतलेला. पण शेवटी गेलो वैद्यकिय व्यवसायात. म्हणजे कोणतीही शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसताना त्या क्षेत्रात कामाला झोकून देण्याची माझी परंपरा मी तेव्हा सुरू केली आणि पुढे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण नसतानाही हॉटेलचा व्यवसाय सुरू करून ती चालू ठेवली. असो.

डॉ. रोहित साने यांच्याबरोबर माधवबागचा संचालक म्हणून काम करायला लागून मला १० वर्ष झाली. या काळात महाराष्ट्रभरात माधवबागचा विस्तार दोन हॉस्पिटल्स, १३० क्लिनिक्सचे जाळे, या सर्वांना लागणारी १५०हून औषधे तयार करणार्‍या दोन फॅक्टरीज् असा झाला. माधवबागच्या परिवारात गेल्या वर्षभरात दाखल झालेले माझे मित्र योगेश वालावलकर, मिलिंद सरदार, राजू उपासनी, अजय सावंत हे माधवबागचे कामकाज चोखपणे सांभाळत आहेत. अगदी माझ्याहून जास्त ! हे मला दिसत होतं. त्यांच्याशी बोलताना त्यांचा उत्साह, व्यवसायाची समज, लोकांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती हे सगळं मला जाणवून, एक दिवस मी माधवबागच्या दैनंदिन कामातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आठवड्यातून फक्त दोन दिवस मी माधवबागसाठी द्यावेत असं ठरल्यावर माझ्या हातात अचानक खूप वेळ आला. रॉबर्ट कियोसाकीने दाखवलेलं ‘रिटायर यंग रिटायर रिच’ हे स्वप्न अंशत: पुरं झालं होतं. मी ठरवलं की तो वेळ सत्कारणी लावायचा. गेली अनेक वर्ष माझ्या मनामध्ये आकार घेत असलेल्या हॉटेल या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचं मी ठरवलं. एम.बी.ए. करताना झालेल्या पुण्याच्या रहिवासात तिथली बहुतेक हॉटेल्स, विशेषतः मराठी पदार्थ देणारी तर हमखास धुंडाळून झाली होती. पुण्याच्या हॉटेलातच काय पण लग्न मुंजीच्या मंगल कार्यालयातही मिळणार्‍या मराठी जेवणावर मी सॉलिड खूश होतो. असं काहीतरी ठाण्यात करावं असं माझ्या मनात आलं. ठाण्यात लोकसंख्येच्या मानाने मराठी हॉटेल खूपच कमी, म्हणजे अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत, असं माझ्या लक्षात आलं होतं. आजूबाजूला थाई, मेक्सिकन, इटालियन एवढंच काय व्हिएतनामी जेवणाची हॉटेल बघून जमाना प्रादेशिक जेवणाचा आहे हे मी ताडलं. झालं. कंपनीचं नाव ठरलं... ‘रिजनल फूड’ ! लगेच त्याचं ट्रेडमार्क रजिस्टर करून टाकलं. मराठी पदार्थाचं हॉटेल चालू करायचं पण ‘हटके’ काहीतरी करायचं असा ध्यास लागला होता. आईबाबांशी बोलून त्यांना या संकल्पनेत सामील करून घेतलं. त्यांच्यासाठी तर ही स्वप्नपूर्तीच[ स्वप्न पूर्ण होणे] होती. पण आई होती पुण्यात, हॉटेल उघडायचं ठाण्यात. आता प्रश्‍न होता की एवढे सगळे पदार्थ बनवणार कोण? हे सगळं मॅनेज कसं होणार? मला तर त्यातला शून्य अनुभव होता. यावर विचार सुरु असताना डोळ्यासमोर नाव आलं सनी पावसकरचं. आमच्या माधवबाग खोपोली हॉस्पिटलचं किचन हा उत्तमप्रकारे सांभाळत होता. तरुण, पेशाने स्वत: शेफ, कोकणातला असल्याने तेथील पदार्थांचे बाळकडूच त्याला मिळाले असणार... हे त्याचे सगळेच गुण या प्रकारचे हॉटेल काढण्यासाठी चपखलपणे जुळणारे होते. माधवबाग किचनच्या सर्व व्यवस्थांच्या नियोजनाची  घडी चोख बसवून आता दुसरं काही करता येईल का? या विचारात तो होता. त्याला मी विचारलं, मराठी पदार्थांचे हॉटेल काढता येणं शक्य आहे का रे बाबा? त्यानेही ते आव्हान स्वीकारलं. माझं स्वप्न होतं की पंजाबी, चायनीज हॉटेलात जशी मेन्यूमध्ये पदार्थांची यादी असते तशी आपल्या हॉटेलात मराठी पदार्थांची असावी. साधारणपणे मराठी पदार्थ म्हटले की बहुतेक करून मिसळ, बटाटेवडा, पिठलं भाकरी, दोनचार उपवासाचे पदार्थ या पलीकडे हॉटेल्स जात नाहीत आणि जेवणाची थाळी मिळणार्‍या रेस्टॉरंट्समध्येही त्यांचाच मेनू आपल्याला स्वीकारावा लागतो. आपल्याला निवडीला विशेष वाव असत नाही. ’मराठी पदार्थांचे भरपूर वैविध्य असलेले हॉटेल’ हे माझं स्वप्न पुरं करण्याचा सनीने मग पणच केला. जेवणात थाळी आणि अ - ला - कार्ट (म्हणजे मेनूतले हवे ते पदार्थ निवडून मागवण्याची सोय) असा बेत ठरला. पण अजून पदार्थांची यादी बनली नव्हती. मग एक दिवस आई बाबा पुण्याहून माझ्याकडे आले होते.  त्यांच्याबरोबर मी, सनी ने बसून आम्हाला सर्वांना माहिती असणाऱ्या मराठी पदार्थांची यादी बनवायला घेतली.  आधी न्याहारी च्या पदार्थांची यादी केली. केळ्याची धिरडी, थालीपीठ, पोह्याचे प्रकार, उप्पीट वगैरे. मग पक्वान्नांची यादी काढली. अगदी रस शेवयांचा पण त्यात समावेश केला. श्रीखंडही विकतच्या नव्हे तर टांगलेल्या चक्क्याचं करायचं ठरलं. पुरणपोळी, गूळपोळी तर आईचं हातखंडा पदार्थच !

मग जेवणात विविध भाज्या, आमट्या, भाताचे प्रकार, ताकाचे प्रकार, कोशिंबिरी, पापड, कुरडया वगैरे वगैरे. यादी खूपच मोठी झाली. खूप मजा आली या पदार्थांची यादी बनवताना. मराठी जेवणात केवढं वैविध्य आहे याची खात्रीच पटली. हे पदार्थ चांगल्या पद्धतीने बनवता आले तर लोकांच्या नक्की पसंतीस पडतील असा विश्‍वास आम्हा सगळ्यांना आला.

या सगळ्यासाठी हॉटेल केवढं मोठं लागेल? इन्टेरियर, किचन इक्विपमेंटचा खर्च किती येईल? याचे आडाखे बांधले. इकडून तिकडून पैशाची तजवीज केली. माझा भाऊ अतुलपण मला पार्टनर म्हणून जॉईन झाला.

एवढं सगळं झालं तरी अजून रेस्टॉरंटचे नाव ठरत नव्हतं. असं काहीतरी नाव हवं होतं ज्याचं ट्रेडमार्क रजिस्टर झालं नव्हतं. खूप जणांशी बोलत होतो. लोकही खूप नाव सुचवीत होते. पण ऐकताक्षणी क्लिक व्हावं असं नाव समोर येत नव्हतं. आमच्या कमर्शिअल आर्टिस्ट मित्र महेश खरे यांनी तर ‘आडवा हात’,  ‘मारा ताव‘ सारखी नावं पण सुचवून पाहिली. शेवटी तर असं झालं की जागाही निश्‍चित झाली, इन्टेरियरचं काम कोणाला द्यावं हे ठरलं, मेनूकार्ड वगैरेचं डिझाइन चालू झालं तरी नाव सुचेना. अगदी रात्री झोपेतसुद्धा मी नावाचा विचार करू लागलो. कुठलाही शब्द आवडला की मी माझ्या वहीत तो लिहून ठेवायचो. असाच एकदा मेनू वाचता वाचता तूप - मेतकूट - भात हा पदार्थ वाचला. वाटलं मेतकूट हे नाव कसं वाटेल? लगेच शब्द लिहून घेतला. असे ४-५ शब्द फायनल असे काढले आणि त्यातल्या मेतकूट शब्दाला ’मेतकूट जमणं’ या अर्थानेही वापरता येतं हे लक्षात आलं. नाव एकदमच ब्राम्हणी वाटतंय का याचा विचार चार जणांबरोबर बोलून अंदाज घेतला. सनी ला तर  हेच नाव बरं वाटलं. झालं नाव ठरलं ’मेतकूट.’ हे नाव आणि पदार्थांची यादी बनवताना लक्षात आलं की आपले पदार्थ सगळे कोकणातले आहेत. मेतकूट म्हणजे विविध गोष्टींची मिसळण ! त्या नावाप्रमाणेच खाद्यपदार्थ पण महाराष्ट्रातल्या सर्व प्रांतातले एकत्र आणले तर? कल्पना सगळ्यांनाच आवडली. त्यानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्‍चिम महाराष्ट्रातले पण पदार्थ मेनूत समाविष्ट करायचे असं ठरलं. एवढंच नाही तर रेस्टॉरंटच्या आतल्या भिंतीवर त्या त्या प्रदेशातल्या प्रसिद्ध गोष्टी, माणसं, ठिकाणं अशा सगळ्याच हाताने काढलेल्या चित्रांचं कोलाज तयार करून लावायचा प्लान पण झाला. सुदैवाने मनात काही आलं की ते पुरं करायला खरेंसारखी माणसं बरोबर होती. मेतकूट नावाची कॅलिग्राफी विनायक वाघकडून करून घेतली. आशिष दळवीने हवी ती सर्व चित्र काढून दिली. तरुण मंडळी किंवा अमराठी लोकांना मराठी पदार्थांबद्दल (४ सोडले तर) विशेष माहिती नसणार हे ताडून आम्ही त्या मराठी पदार्थांबद्दल माहिती संकलित करायला सुरुवात केली. मकरंद जोशी, खरे यांनी स्वत: पदार्थांबद्दल लिखाणाचं काम केलं. असं करता करता मेतकूट अंतर्बाह्य सजून गेलं. त्याचं मार्केटिंग कसं करावं याच्या ब्रेन स्ट्रोमिंग सेशन्स झाली. अगदी पाठीला बोर्ड लावून फिरणार्‍या माणसापासून खाद्यजत्रा भरवण्यापर्यंत विविध पर्याय चर्चिले गेले. उद्घाटनाला कुठल्या सेलिब्रेटीला आणावं का यावर खूप खल झाला. शेवटी बजेटचा विचार करता सामान्य ग्राहकच आपला सेलिब्रेटी यावर आमचं एकमत झालं. अजून एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आमच्यात खूप चर्चा झाली आणि तो म्हणजे हॉटेल ए.सी. असावं की नाही? माझं मत ट्रेडिशनल मराठी हॉटेलचा जो बाज असतो त्याच्या एकदम विरुद्ध म्हणजे मस्त इन्टेरियर असलेलं, ए.सी. रेस्टॉरंट करावं असं होतं. पण ए.सी. रेस्टॉरंट असण्याचे काही तोटे, जसे लोकांचं बाहेरूनच हे हॉटेल ए.सी. आहे म्हणजे महागडं असणार असं होणारं मत... हॉटेलचे इलेक्ट्रिसीटी बिलामुळे वाढणारे ओव्हरहेडस् असे काही होते. पण सर्वानुमते शेवटी ए.सी. ठेवावाच असंच मत पडलं आणि रेस्टॉरंट छान गारेगार झालं.

हॉटेलचे साईन एज (मुख्य बोर्ड किंवा पाटी) बनवताना खर्‍यांनी इतर काही डिझाईन न वापरता, मेतकूटमध्ये मिळणार असलेल्या पदार्थांच्या नावांचेच कोलाज बनवले. जणू हॉटेलचे मेनुकार्डच बोर्डवर लावले आहे. इन्टेरियरचं काम चालू असताना रस्त्यावरून जाणारी येणारी लोकं त्या पाटीकडे बघत वाचत थांबायची. नजरानजर झाली तर छानसं हसून उत्तम चाललंय या अर्थाची खूण करून जायची. काही थांबून कधी चालू होणार हॉटेल अशी चौकशी करायचे. माहोल तर चांगला बनत होता. हॉटेल चालू व्हायच्या ४-५ दिवस आधी आम्ही ’आता सुब्रमण्यम चोपणार पुरणपोळी, शहा खाणार उकडीचे मोदक, शर्मा तुटून पडणार अळूवडीवर...’ अशा प्रकारच्या मजकुराचा एक फ्लेक्स बनवून बाहेर लावला. त्याच अर्थाचा एक व्हॉटस ऍप मेसेज बनवून ओळखीच्या लोकांना पाठवला. त्यांच्या त्यावर छान प्रतिक्रियाही आल्या. एकंदर आम्हांला हे सर्व करताना खूप मजा येत होती. हॉटेल चालू होण्याच्या एक दिवस आधी अजून एक मेसेज व्हॉटस ऍपवर टाकायचे ठरलं. खरेंच्या बरोबर चर्चा करून त्यामध्ये आपल्या पदार्थांचा उल्लेख व आपल्या संकल्पनेचे वेगळेपण असावे असं ठरलं. त्यानुसार खरेंनी एक संवादात्मक मेसेज तयार करून व्हॉटस् ऍपवर पाठवला. मी तो माझ्या मित्रांना, माझ्या बायकोने तिच्या काही ग्रुप्सवर शेअर केला.

ठरल्याप्रमाणे १ जानेवारीला आई-बाबा आणि त्यांचे मामा-मामी अशा ज्येष्ठांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन झालं. सकाळी ८ वा. उद्घाटन झाल्यावर ९.३० पर्यंत कोणीच आलं नाही. ९.३० वा. मराठे नावाच्या, ठाण्याच्या माजी महापौरांच्या पत्नी आल्या आणि त्यांनी कौतुकाने पाव किलो श्रीखंड घेतलं आणि आमची बोहनी केली. त्यानंतर मात्र कोणी येईना. वाटलं, की लोकांना कळलंय की नाही रेस्टॉरन्ट चालू झालंय ते? त्यामुळे खरेंना सांगून तातडीने एक फ्लेक्स बनवून घेतला.  ’आजपासून रेस्टॉरंट चालू झाले आहे’ असं त्यावर लिहिलं . ते वाचून तरी लोक येतील असं वाटलं पण १०.३० पर्यंत शुकशुकाट. मग मी आईबाबा, मामा-मामींना घेऊन घरी आलो. म्हटलं दुपारी पुन्हा जाऊ.  जेवायला घालू मामा-मामीला आणि मग ते जातील. घरी थोडा आराम करून १२च्या सुमाराला आम्ही परत हॉटेलवर गेलो. तुरळक गर्दी बघून थोडा जिवात जीव आला. आई-बाबा, मामा-मामीला एका टेबलावर बसवून त्यांची ऑर्डर घ्यायला लागलो. तोवर रेस्टॉरंटमधली सातही टेबलं भरली. आई-बाबा, मामा-मामींवर इथून उठून तिथे बस असं करता करता शेवटी उभं राहण्याची वेळ आली. हळूहळू पार्सल्सची बाहेर उभं राहून वाट बघणार्‍यांची गर्दी एवढी वाढली की आम्हांला तिथे उभं राहणं अशक्य झालं. तेवढ्यात माझे एक डोंबिवलीचे स्नेही विवेक जोशी हे सपत्नीक माझं अभिनंदन करायला मुद्दाम डोंबिवलीहून आले. ते पण बाहेर आमच्याबरोबर गर्दीत उभे. जेवणाची वेळ सरून चालली. कधी जागा होणार आणि कधी मी माझ्या पाहुण्यांना जेवायला घालणार? एकदम अवघड परिस्थिती! शेवटी निर्णय घेतला. बाबांच्या कानात सांगितलं. ’’जवळच एक उडप्याचं रेस्टॉरंट आहे. पाहुण्यांना घेऊन तिथे जा म्हणजे त्यांचं वेळेत जेवण होईल.’’ पाहुणे नाही नाही करत होते. पण बळेच त्यांना पाठवलं आणि मी गर्दीला सामोरा जायला सज्ज झालो.

पहिलाच दिवस असल्यामुळे कॉम्प्युटर वापराचा सराव नव्हता, पाणी पुरत नव्हतं, कुठच्या टेबलवर कोणी बसावं याला काही धरबंध नव्हता. गर्दी झाल्यामुळे आत बसायला जागा नव्हती, त्यामुळे पार्सल घेणार्‍यांची गर्दी वाढली, त्यांना पदार्थ बनवून देताना आत बसलेल्यांना उशीर व्हायला लागला. पार्सल्स चुकायला लागली. मध्येच कॉम्प्युटरने असहकार पुकारल्यामुळे बिल हाताने बनवायला लागले. आधी एकटा मी, मग बाबा, मुग्धा, सनीचे दोन काका आम्ही सगळेच त्या गोंधळाचा एक भाग बनून गेलो. सनी तर आता किचन मध्ये कशी बॅटींग करत होता त्यालाच ठाऊक.

आता आठवताना मजा वाटते. पण तेव्हाचा मनस्ताप जबरदस्त होता. मनस्ताप याचा की दैव देतं आणि कर्म नेतं असं व्हायला नको. एवढी गर्दी झाली आहे पण त्यांना सर्विस देता आली नाही तर ते नाराज होऊन परतून जातील असं वाटत होतं. तसं घडलंही लगेचच तिसर्‍या ते चौथ्या दिवशी. एक मोठा ग्रुप बाहेर खूप वेळ वाट बघत होता. त्यांनी थाळी आहे ना असं विचारून खात्री करून घेतली. पण नेमके ते जेव्हा आत जाऊन बसले तेव्हा थाळीतले काही पदार्थ संपले होते. त्यांना तसं सांगितल्यावर ते एकदम चिडले त्यांना अ - ला - कार्ट मधले पदार्थ मागवा, थाळीसारखंच तुम्हांला करून देतो असं समजावून सांगितलं. पण ते तडकून उठून गेले. ते बाहेर जाताना, मी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते त्या मन:स्थितीत नव्हते. मी समजू शकलो. पोटात भूक असताना माणसाचा मेंदू शांत राहणे शक्य नाही. मला पण वाईट वाटलं. पण नंतर त्या लोकांनी मिसळ पाव नावाच्या फेसबूक पेजवर आमच्यावर राग व्यक्त केला. तसे करताना थोडासा सत्यापलापही  केला. मला त्याचं विशेष वाटलं नाही. कारण व्हॉटस ऍप आणि फेसबुक हे दोन्ही सोशल मिडीया आहेत. व्हॉटस ऍपवर अनपेक्षितपणे लोकांकडून आपली एवढी जाहिरात होऊ शकते तर फेसबुकवरून कधी बदनामीही होऊ शकते ही जवळच्या बर्‍याच जणांची भिती रास्त होती. पण माझा एक विश्‍वास होता. ज्या प्रेमानी अपेक्षेने लोकांनी व्हॉटस ऍपचा मेसेज फॉरवर्ड केला ते पाहता फेसबुकवरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो निगेटिव्ह मेसेज पोचला तरी लोकं आपल्याला एक संधी नक्की देतील आणि सुदैवाने तसंच झालं. रेस्टॉरंटच्या गर्दीवर त्याचा काहीच परिणाम न होता. ती वाढतच राहिली.

व्हॉटस ऍपच्या मेसेजने तर कहर मांडला होता. ऑस्ट्रेलियात शिकायला गेलेला मुलगा आपल्या ठाण्यातल्या आईवडिलांना फोन करून सांगत होता मेतकूटला जा. अमेरिका, कॅनडातून मला अभिनंदनाचे फोन येत होते. इतकंच कशाला गुहागर आणि राजापूरहून सुद्धा आगे बढो या अर्थाचे फोन आले. एका दिवशी संध्याकाळी एक माणूस आला. आत फिरून त्याने रेस्टॉरंट पूर्ण बघितलं. त्याचा खाण्याचा इरादा नव्हता. मी तशी चौकशी केली तर मला म्हणाला मी काही फोटो काढू का हो आतून? म्हटलं, का नाही? जरूर काढा. त्याने मनसोक्त फोटो काढले इन्टेरियरचे आणि जाताना म्हणाला, ’’मला हा मेसेज आला आणि बरोबर विचारणा ही झाली की खरंच असं हॉटेल अस्तित्वात आहे का ते चेक करून ये. आता त्यांना फोटो पाठवून कळवतो की खरंच असं हॉटेल ठाण्यात चालू झालं आहे.’’ असं काही ऐकलं की माझाच माझ्या कानांवर विश्‍वास बसायचा नाही. एवढं कौतुक व्हावं असं खरंच काही घडलंय का आपल्या हातून?

लोकांचा अलोट प्रतिसाद आणि लहान जागा हे समीकरण व्यस्त असल्याचे पहिल्यापासूनच लक्षात येऊ लागलं होतं. आम्ही आलेल्या जवळजवळ सर्वांकडून लेखी प्रतिक्रिया घेत होतो. त्यात ऐशी टक्के लोक ’मोठी जागा हवी’ असं लिहत होते. लोकांना जेवणासाठी एकेक दिडदिड तास वाट पाहायला लागायची याचे आम्हांला वाईट वाटायचे. शेवटी येणार्‍या मंडळींचे ’खूप वाट पाहायला लागते बुवा. नको जाऊया.’ असे नकारात्मक मत व्हायच्या आधीच आम्ही एक आणखी धाडसी पाऊल टाकले. आत्ताच्या जागेपासूनच हाकेच्या अंतरावर दुसरी जागा बघितली. जवळजवळ अडीचपट आसनक्षमता असलेली ही भाड्याची जागा घेऊन ’मेतकूट’चे पुढचे पाऊल अधिक ऐसपैस जागेत पडले. नव्या जागीही लोकांनी उदंड प्रेम व प्रतिसाद दिला.

एकदा एक मद्रासी कुटुंब जेवायला आलेले. त्यांना बघून, मनातल्या मनात अमराठी लोकांना अस्सल मराठी पदार्थ खायला घालण्याचा आपला उद्देश सफल झाल्याचं समाधान झालं. पण जाताना त्या बाई जे बोलल्या ते ऐकून मी अंतर्मुख झालो. ’’आम्ही चेंबूरहून खास इथे आलो. आम्हांला महाराष्ट्रीयन जेवण आवडतं. पण मिळतच नाही कुठे. सगळीकडे पाहावं तिकडे उडपी आणि पंजाबी. आमच्या भागात काढा एखादं हॉटेल.’’ मी संकोचून त्यांना म्हंटल की आमचं कसलं कौतुक? खरंतर पंजाबी, उडपी लोकांनी त्यांच्या राज्याबाहेर सर्वत्र जाऊन त्यांचे खाद्यपदार्थ खाण्याची सर्वांना सवय लावली. त्यांचं कौतुक करायला हवं. यावर त्याही म्हणाल्या, ’’ खरं आहे. महाराष्ट्रात, मुंबईत सर्वत्र मराठीच पदार्थाची हॉटेल्स हवीत. इतर पदार्थांच्या हॉटेलचे अप्रूप वाटायला हवे. त्याऐवजी आम्हांला मराठी पदार्थ मिळणार्‍या हॉटेलचे वाटते आहे ही आश्‍चर्याची बाब आहे.’’

खरंच ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे की उडपी, पंजाबी, चायनीज लोकांनी येऊन आपल्या शहरातल्या मोक्याच्या जागा व्यापल्यात. महाराष्ट्रातूनच मराठी हॉटेल चालू केल्याचं एवढं कौतुक? मग उडप्याचं आणि पंजाब्याचं किती कौतुक व्हायला हवं ज्यांनी जगभरात त्यांची हॉटेल्स चालू करून तेथील लोकांना त्यांची चटक लावली. वाटलं लोकांनी आपलं कौतुक करून शांत बसण्यापेक्षा या यशाने स्फूर्ती घेऊन अशी हॉटेल्स ठिकठिकाणी चालू व्हावीत. अशी कॉपी झालेली आणि आणि अशी स्पर्धा वाढलेली मला आवडेल. या निमित्ताने मी सर्व उद्योजकांना सांगू इच्छितो की आपल्याकडे जबरदस्त अशी खाद्यसंस्कृती आहे, पदार्थांमध्ये विविधता आहे, लोकांना त्याची जाण आहे. आवड आहे, पैसे देण्याची तयारी आहे. पुढे येऊया आणि सर्वांना ही महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती उपलब्ध करून देऊया.

‘मेतकूट’च्या लहानशा यशाच्या निमित्ताने हे थोडेसं चिंतन...
सनी आणि माझी झी 24 तास वर झालेली मुलाखत : https://www.youtube.com/watch?v=ETu_8KuMaTA

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे वाह....छान च लिहिलंय... मी जेवलेय मेतकूट मध्ये... माझ्या कझिन ला केळवणाचं जेवायला नेलेलं.. तिला ही आवडलं होतं जेवण खूप...
तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा... पुढच्या वेळेस येईन तेव्हा पॉसीबल असेल तर भेटू नक्की....

खूप मनापासून अभिनंदन... तुमचा मेन्यू पहिला आता ऑनलाईन... मस्तच वाटला.. मराठी नावाखाली इंग्लिश मध्ये पण त्या पदार्थात काय आहे ते संक्षिप्त मध्ये लिहिलंय ते फार आवडलं.. नॉन मराठी लोकांना समजेल लगेच त्या वरून.. आणि प्रत्येक पदार्थासमोर त्याचा छोटा फोटो असेल तर फारच छान.... पण बहुतेक खूप जागा लागेल फोटो टाकले तर... आणि पुण्यामध्ये आहे का याची ब्रँच??

किरण

मी तुझा वालचंदचा दोस्त...मी मिसळपाववर सुद्धा आहे. मिसळपाववरचा लेख वाचूनच मी तुझ्या हॉटेलात जेवलो होतो. खूप छान..!!

मला माहीत नव्हते की हे हॉटेल तुझे आहे. आता परत येतो... Wink

खूप शुभेच्छा Happy
ठाण्यात आल्यावर नक्की येईन.

नमस्कार. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून तरी पुण्याशी आमचे 'मेतकुट' जुळलेले नाही. पण रामेच्छा असेल तर लवकरच नक्की एखादी शाखा पुण्यात उघडुया. पण तसं बघायला गेलं तर पुणेकरांना काय मराठी जेवणाला तोटा नाहीये. दुर्वांकुर, श्रेयस, जनसेवा, आशा आणि कोण कोण ...अशा ठिकाणी मेतकुट सुरु करायला हवं जिथे मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे पहिली पसंती अशा ठिकाणाला...

अरे वा, पुनस्च हे काही लिहीता आले नाही पण त्याच्या गट ग चे मेसेज तुमचे आले होते. मला काही जमले नाही तेव्हा. मी दोन्ही मेतकुटात जेवले आहे. मेन्यु मस्त पण ते थाळीवाले अगदी अगदी लहान व विदाउट एसी आहे . वर्किंग लोकांना लं च साठी जरा एसी असले तर बरे वाट्ते. टिप टॉप बघा ठाण्यातले. तश्या सारखे. त्याच्या अर्धे पाव साइज ने पण चालेल. एक मराठी बोलणारी मराठी लुक्सची साडी वाली होस्टेस पण छान शोभेल. तुमचे एक आउटलेट जर विविआना मॉल फुड कोर्ट मध्ये निघाले तर मी नक्की जेवेन तिथे. तिथे मला माझ्या आ वडीचे काही मिळत नाही. भगत ताराचंद वगैरे पिट्स आहे.

एक लो सॉल्ट नो शुगर पथ्याची थाळी ( ज्येना स्पेशल) व पु ण्यात मिळते तशी उपासाची थाळी पण लैभारी.

तुम्हाला खूप शुभेच्छा.

नमस्कार किरण सर ...खूप वर्षांनी Happy
मी माधवबाग ला होते job la . छान वाटलं भेटून पुन्हा. मेतकूट ला नेहमीच जातो माझ्या घराच्या बाजूलाच आहे. Happy

ठाण्यातील मैत्रिणींकडून 'मेतकूट'विषयी चांगले अभिप्राय ऐकले आहेत! तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

'मेतकूट' सुरू झालं तेव्हापासून ठाण्यातल्या मित्रमंडळींच्या ग्रूपवर वगैरे त्याची चर्चा असायचीच.

एकदा हैद्राबादहून एक जवळचे नातेवाईक आले होते. त्यांनी तिथे मेतकूटबद्दल ऐकलं होतं, त्यांना घेऊन एकदा जेवायला आलो होतो. पाहुणे एकदम खूश झाले होते जेवणावर.

माझा मुलगा तुमच्या स्नॅक्स विभागातल्या तिखटा-मिठाच्या पुर्‍या आणि डांगर खाल्ल्यापासून डांगर फॅन क्लबात सामिल झालेला आहे. नाहीतर तोवर घरी नेहमी केल्या जाणार्‍या डांगराला तो हातही लावायचा नाही. Lol

व्हिव्हियाना फूड कोर्टात एक शाखा असावी हे अमांनी सुचवलेलं एकदम पटलेलं आहे. यावर नक्की विचार करावा.

अभिनंदन.
पुण्यात नक्की उघडा. भरगच्च थाळीचे भरपूर हॉटेल्स आहेत पुण्यात पण तुमच्यासारखे स्नॅक्स/ अ -ला - कार्ट नाही. बरोबर मुले आणि ज्ये.ना. असतील तर एवढी मोठी थाळी जात नाही ( आणि पैसे वसूल होत नाहीत Wink ) म्हणून पंजाबी/ईतर खाल्ले जाते.

पुण्यात नक्की उघडा. भरगच्च थाळीचे भरपूर हॉटेल्स आहेत पुण्यात पण तुमच्यासारखे स्नॅक्स/ अ -ला - कार्ट नाही. बरोबर मुले आणि ज्ये.ना. असतील तर एवढी मोठी थाळी जात नाही ( आणि पैसे वसूल होत नाहीत Wink ) म्हणून पंजाबी/ईतर खाल्ले जाते.+११११

वा! सुरेख! ठाण्यात येणे झाले तर नक्कीच भेट देऊ. तुम्हाला खूप सार्‍या शुभेच्छा. आणी सर्व मराठी- अमराठी लोकांचे प्रेम तुम्हाला सतत लाभो.