ख्वाडा
गावोगावच्या डोंगरदऱ्या, माळरानावर मेंढरं चरत राहतात. पाठीमागं घोडं, बैलगाडीवर संसाराच गाठोडं घेऊन 'धनगरडे' चालत असतात. संध्याकाळी एखाद्या पाण्याच्या रानात मुक्काम ठोकतात. वाऱ्या-कावदानात चुल पेटवली जाते. धगधगता निखारा पेटलेल्या भुकेल्या विझवत राहतो. चांदण्या राती थकलेले जीव गारगार झोपतात. मग पुन्हा सकाळी चारणीला मेंढरं घेऊन पाडा पुढच्या गावाला चालत राहतो.
मेंढपाळांचं हे रोजचं आयुष्य. पिढी दरपिढी चारणीचा रुळलेला रस्ता. याच रस्त्यावर कित्येक खाचखळगे, काटेकुटे, दगडधोंडे लागतात. असाच एक रापलेला दगड रस्त्याच्या मधोमध येतो आणि आख्ख्या पाड्याला 'ख्वाडा' घालुन जातो.