राधे... ९. रंगुनि रंगात साऱ्या...
अन तोही दिवस आठवतो राधे,...
रंगपंचमीचा दिवस होता तो. सकाळीच माईने मला ओवाळले, तिलक लावला, नंदबाबांनी गुलाल लावला गालाला आणि रंगीत करून टाकला सारा दिवस. त्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो अन सगळ्या गोपांनी घेरून टाकलं. नुसती धमाल सुरू झाली.
सगळे एकमेकांना रंगवत यमुनेतीरी आलो. तर तू अन तुझ्या सख्याही तिथे आलेलात, नेहमी प्रमाणे पाणी भरायला. पण आज तुम्हाला घाई नव्हती. तू पुढे झालीस, मला हळूच गुलाल लाऊन उलटी वळलीस. पण मी असा सोडणार नव्हतोच तुला. मीही गुलाल उधळला. सगळेच गोपही रंग उडवू लागले. लाल, निळा, गुलाबी, केशरी सारे रंग एकमेकांत रंगू लागले.