वळेसार

वळेसार

Submitted by सत्यजित on 28 December, 2014 - 15:20

पारिजात निवडुन घे
किंवा बकुळ घे वेचुन
अबोलीचा गजरा घाल
वा चाफा माळ खोचून

हळुवार वेणीशी खेळताना
तुटले केस वेचुन घे
नखाने जमिन उकरताना
अंगणभर नाचुन घे

डोळ्यांचा मनाशी
चालला असतो लपंडाव
धप्पा देत मन कधी
कधी मनावर येतो डाव

पदराच्या शेवाला कितीदा
भर भर पडतो पिळ
स्पंदनाच्या ताला वर
श्वासांची घुमते शीळ

मावळतीला कलता उन्हं
मोत्यांची नयनी धार
अलगद साजण येतो मागुन
श्वासात भिनतो वळेसार

- सत्यजित.

Subscribe to RSS - वळेसार