ग्रीष्म
Submitted by संतोष वाटपाडे on 28 December, 2014 - 03:02
नाले नद्या थांबल्या वाहणार्या तळी आटली सर्व रानातली
जाळीप्रमाणे सभोवार नक्षी दिसू लागली गर्द पानांतली...
झाडे झळा खात होती उन्हाच्या तरी शांततेने उभे राहिली
खोडातुनी डिंक केवीलवाणा निघाला जसा झेलण्या काहिली..
भेगाडल्या पावट्या श्वापदांच्या नदीतीर ओसाड झाल्यावरी
गाळामध्ये झोपल्या रानगायी मऊ गाळ फ़ासून अंगावरी...
फ़ेर्या नभी घालती कैक घारी शिकारीस शोधावया धावती
निष्पर्ण झाडांतली पाखरेही घरातून हाका कुणा मारती..
घामेजली कातळे तापलेली किनार्य़ावरी शोधती सावल्या
टाळायला ऊन बेफाम त्यांनी शिराभोवती झावळ्या बांधल्या...
ओठावरी जीभ रेंगाळणारी हळूवार बाहेर डोकावली
शब्दखुणा: