नाले नद्या थांबल्या वाहणार्या तळी आटली सर्व रानातली
जाळीप्रमाणे सभोवार नक्षी दिसू लागली गर्द पानांतली...
झाडे झळा खात होती उन्हाच्या तरी शांततेने उभे राहिली
खोडातुनी डिंक केवीलवाणा निघाला जसा झेलण्या काहिली..
भेगाडल्या पावट्या श्वापदांच्या नदीतीर ओसाड झाल्यावरी
गाळामध्ये झोपल्या रानगायी मऊ गाळ फ़ासून अंगावरी...
फ़ेर्या नभी घालती कैक घारी शिकारीस शोधावया धावती
निष्पर्ण झाडांतली पाखरेही घरातून हाका कुणा मारती..
घामेजली कातळे तापलेली किनार्य़ावरी शोधती सावल्या
टाळायला ऊन बेफाम त्यांनी शिराभोवती झावळ्या बांधल्या...
ओठावरी जीभ रेंगाळणारी हळूवार बाहेर डोकावली
लागेल आतातरी ओल थोडी जशी त्याच स्पर्शास सोकावली..
अस्वस्थशा काडक्या वाळलेल्या चुरा होउनी पांगलेली फ़ुले
ढेपाळल्या पायवाटा उन्हाने जणू धैर्य त्यांचे खचू लागले..
अव्यक्त अदृश्य नैराश्य सारे सभोवार जेव्हा रुळू लागले
रानातले रंग चारी दिशांचे स्मशानापरी आढळू लागले...
अंधार व्हावा पुन्हा एकदाचा मिळायास थोडातरी गारवा
नादात या एकटा बैसलेला उदासीन झाडावरी पारवा...
ग्रीष्मातले तापणे अंबराचे धरेला किती भोग भोगायचे
झाकून डोळे कळा सोसताना सदा का निखार्यात चालायचे...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
अतिशय आवडली! चित्र उभं राहिलं
अतिशय आवडली! चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर एकदम! सुंदरच! निसर्गाचं वर्णन करण्याचा तुमचा हातखंडा जाणवतोच!
धन्यवाद महोदय.....
धन्यवाद महोदय.....
सुंदर.. चित्रदर्शी!!
सुंदर.. चित्रदर्शी!!