पहाटे पहाटे तुझी याद येते ( सुमंदारमाला)
पहाटे पहाटे तुझी याद येते तुझा भास होतो जसा गारवा
अजूनी तमाच्या रित्या ओंजळीतुन तुझा स्पर्श वाहे जसा चांदवा
तुझ्या पावलांचे ठसे शोधताना कुठे स्वप्न गेले कळेना मला
सुन्या अंतरी फक्त दाटून आहे तुझा श्वास गंधीत श्वासातला..
मला ध्यास होता अनावर नभाचा नभाला मनाचे कुठे आकळे ?
उरे वेदनाही अशी सोनवर्खी जसे ऊन सांजेमधे विरघळे...
किती दूर तू अन किती दूर मी पण कुठे पाळती अंतरे आर्जवे
तुला साद देते निसटत्या क्षणाला मनी लाउनी आसवांचे दिवे..
कधी केशरी होउनी शुभ्र आकाश घालू पहाते धरेला मिठी
असा सोहळा पाहुनी चित्रगंधी तुझी सावली गाठते शेवटी..