Submitted by माउ on 25 March, 2019 - 21:23
पहाटे पहाटे तुझी याद येते तुझा भास होतो जसा गारवा
अजूनी तमाच्या रित्या ओंजळीतुन तुझा स्पर्श वाहे जसा चांदवा
तुझ्या पावलांचे ठसे शोधताना कुठे स्वप्न गेले कळेना मला
सुन्या अंतरी फक्त दाटून आहे तुझा श्वास गंधीत श्वासातला..
मला ध्यास होता अनावर नभाचा नभाला मनाचे कुठे आकळे ?
उरे वेदनाही अशी सोनवर्खी जसे ऊन सांजेमधे विरघळे...
किती दूर तू अन किती दूर मी पण कुठे पाळती अंतरे आर्जवे
तुला साद देते निसटत्या क्षणाला मनी लाउनी आसवांचे दिवे..
कधी केशरी होउनी शुभ्र आकाश घालू पहाते धरेला मिठी
असा सोहळा पाहुनी चित्रगंधी तुझी सावली गाठते शेवटी..
-रसिका
०२/२३/२०१९
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुर्रेखच....
सुर्रेखच....
क्या बात है! सुमंदारमाला
क्या बात है! सुमंदारमाला वृत्तात तुम्ही इतक्या सहज लिहिता की पुलंच्या भाषेत ते वृत्त नसून तुमची वृत्ती आहे. मागे पण तुमची एक सुमंदारमालातली कविता अशीच भावली होती. शिवाय शब्दांची योजना खूप सुंदर. 'वेदनाही अशी सोनवर्खी' - क्या बात!
Khup khup dhanyawad!
Khup khup dhanyawad!
छान! फक्त तो याद शब्द ज ss
छान! फक्त तो याद शब्द ज ss रा खटकतो आहे! सय बसेल का मीटर मधे?
असा सोहळा पाहुनी चित्रगंधी तुझी सावली गाठते शेवटी - इथेही अर्धवट सोडल्या सारखे नाही का वाटत? सावली गाठते शेवटी म्हणजे काय?
काही वेगळी शब्द योजना करुन पहा ना .......
मला ध्यास होता अनावर नभाचा नभाला मनाचे कुठे आकळे ?
उरे वेदनाही अशी सोनवर्खी जसे ऊन सांजेमधे विरघळे... ही द्विपदी खूप आवडली.
फक्त तो याद शब्द ज ss रा
फक्त तो याद शब्द ज ss रा खटकतो आहे> खरंय..मलाही वाटलं तसं पण सय बसत नाही..बघते विचार करून.
सावली गाठते शेवटी म्हणजे काय? म्हणजे तो खरच आला आहे असे वाटते...बदल करून बघते.
झी सावली गाठते शेवटी - इथेही
झी सावली गाठते शेवटी - इथेही अर्धवट सोडल्या सारखे नाही का वाटत? सावली गाठते शेवटी म्हणजे काय? >> मला असं वाटलं की ह्याचा अन्वय "(मी) शेवटी तुझी सावली गाठते" असा आहे. इथे कर्ता 'मी' आहे, सावली नाही. सावली कर्ता धरला तर वाक्य अर्धवट वाटते, कारण सावली ही काय्/कुणाला गाठते ह्याचा अर्थबोध होत नाही. पण बर्याच वाक्यांमध्ये 'मी' हे सर्वनाम अध्याहृत असते त्याप्रमाणे ते इथे असावे, त्यामुळे मला तरी काही बदल करायची गरज वाटत नाही. 'याद' शब्द मात्र बदलला तरी चालेल. 'याद येते' हे जरा खटकतंय हे खरं.
पहाटे पहाटे तुझ्या आठवाने
पहाटे पहाटे तुझ्या आठवाने तुझा भास होतो जसा गारवा
हे बरोबर होईल का ? कृपया, सांगावे.
धन्यवाद.
कसल भारी जमलंय !! खूप खूप
कसल भारी जमलंय !! खूप खूप आवडलं
अजूनी तमाच्या रित्या ओंजळीतुन तुझा स्पर्श वाहे जसा चांदवा
किती दूर तू अन किती दूर मी पण कुठे पाळती अंतरे आर्जवे
तुला साद देते निसटत्या क्षणाला मनी लाउनी आसवांचे दिवे..
आणि
उरे वेदनाही अशी सोनवर्खी जसे ऊन सांजेमधे विरघळे...
हे विशेष आवडलं ! अफलातूनच झाली आहे
सुमंदारमाला वृत्तात तुम्ही इतक्या सहज लिहिता की पुलंच्या भाषेत ते वृत्त नसून तुमची वृत्ती आहे>> एकदम पटलंय +९९९
'मी' तुझी सावली गाठते..म्हणजे
पण कवयित्रीच्या मते.......असा सोहळा पाहुनी चित्रगंधी - तो(च) आला आहे असे वाटते..................!
( म्हणजे एकतर तो येईल अथवा ही जाईल.......दोघं भेटले म्हणजे झालं!)
असो.... जैसी सोच वैसा अनुभव!
पहाटे पहाटे तुझ्या आठवाने
पहाटे पहाटे तुझ्या आठवाने तुझा भास होतो जसा गारवा> वृत्ताप्रमाणे बरोबर आहे...विचार करून बघते...
सर्वांचे खूप खूप आभार!
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
पहाटे पहाते मला जाग आली...
पहाटे पहाते मला जाग आली... आठवण झाली. सहजसुंदर कविता आहे.
मात्र जसा गारवा, जसा चांदवा हे अधांतरी लोंबळताहेत असे वाटते.
पहाटे पहाटे तुझी येतसे सय
पहाटे पहाटे तुझी येतसे सय
तुझी आठवण ही पहाटे पहाटे
तुझ्या आठवांनी पहाटे पहाटे असा भास होतो जसा गारवा
( म्हणजे एकतर तो येईल अथवा ही
( म्हणजे एकतर तो येईल अथवा ही जाईल.......दोघं भेटले म्हणजे झालं!) Happy >> हा हा हा!
अगदी भारी!!! मस्तच!!!
अगदी भारी!!! मस्तच!!!
हाहाहा...धन्यवाद!
हाहाहा...धन्यवाद!
याद शब्दाऐवजी काही दुसरा विचार बघते
वाह् व्वा! खूप सुंदर!
वाह् व्वा! खूप सुंदर!
>>>उरे वेदनाही अशी सोनवर्खी जसे ऊन सांजेमधे विरघळे>>>क्या बात है!
पहिल्या दोन ओळी मी अश्या वाचून पाहिल्या,
पहाटे पहाटे तुझा भास होतो जसा आणतो शिर्शिरी गारवा
तमाच्या रित्या ओंजळीतून श्यामल,तुझा स्पर्श वाहे जसा चांदवा
लिहीत रहा,शुभेच्छा!
जसे ऊन सांजेमधे विरघळे...
जसे ऊन सांजेमधे विरघळे...