सौंदर्य पाहुनिया, मी मंत्रमुग्ध झालो
ते अग्निकुंड होते, मी भस्मसात झालो
इश्कात मी बुडालो, बदनाम खूप झालो
बदनाम जाहलो पण, मी नामवंत झालो
जालिम तिच्या अदा अन् विभ्रम किती निराळे
घायाळ फक्त मी ना, सारेच लुब्ध झालो
अभिमान फेकुनी मी, आशाळभूत झालो
दारातला तिच्या मी, लाचार श्वान झालो
आयुष्य उधळले मी, सारे तिच्याच पायी
वणव्यात वासनेच्या, मी बेचिराख झालो
जयश्री अंबासकर
हे "व्हॅलेंटाईन डे" स्पेशल जॅकेट ! दोन खिसे सुद्धा आहेत हं 

ही मागची बाजू

हा क्लोज-अप

सांज उतरती ओली
का लावुन हुरहुर जाते
मन गाभा-यात कशाचे
काहूर पेटवुन जाते
अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी कौले
कुठल्या जन्मीचे ऋण
संन्यस्त घरांच्या भिंती
निथळती, गळती संथ
गतवैभव स्मरुनी सारे
ढाळती आसवे मंद
काळोखाचा विळखा मग
अधिकच काळा होतो
वाटते निसटले सारे
अन् जीव घाबरा होतो
उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत जावा
जगण्याचा अर्थ निराळा
जयश्री अंबासकर